Skip to main content

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी...

ती आणि तो

"ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी.

गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते.

दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे.

तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघांनीही घरच्यांची समजुत घालावी. तिने त्याला असे कितीतरीदा बोलुन दाखवले होते. पण तो अतिशय निश्चल असायचा.

तो घरी गेला की कधीच तिचा फोन उचलत नसे. तेवढे दिवस ती त्याच्या मित्रांकडुन त्याच्याशी संपर्क साधत असे. परत आला की त्याचं वागणं बदलायचं. थोड्या दिवसांनी पुर्वपदावर यायचा. तिला पहिल्याप्रथम त्याचं हे वागणं जरा विचित्र च वाटलं. पण नंतर मात्र तिने "खुप रागवत असतील आई बाबा, त्याचं टेंशन येत असेल बिचार्याला" असं म्हणून स्वतःचीच समजुन काढली..

तिने घरच्यांच्या वारंवार वाढत असलेल्या दबावा बद्दल सांगितले की तो तिला विश्वासात घेऊन तिच्याशीच लग्न करण्याचे वचन देत असे. आई बाबांची अतिशय लाडकी असल्याने त्यांची समजुत घालता येईल याचा तिला विश्वास होता. त्यामुळे ती निर्धास्त होती...स्थळं आली की त्यांना कसे कलटवायचे हे ही त्याने तिला शिकवले होते. हळूहळू तिने सगळ्या स्थळांना नकार दिला...अशातच दोघांचीही जवळीक वाढु लागली होती.

आता मात्र तिच्यावरचं घरच्यांचं दडपण वाढु लागलं. तिला आई बाबांनी मारहाणही केली..पण प्रेमाखातर हे ही असे मानुन ती परत गप्प राहीली. घरच्यांचं दडपण शिगेला पोच्ले होते. ती कुठल्याच मुलाला होकार देत नव्हती आणि आतातर तिच्या वयाची मुलेही मिळेनाशी झाली होती. आई बाबांना तिच्या आयुष्याची काळजी लागुन राहीली होती. त्यातच बाबांची तब्येत खराब झाली आणि तिला घरी यावे लागले. नशिबाने तिच्या लग्नाचा विषय कुणीही काढला नाही.

तिने मुंबईत परत आल्यावर त्याला सगळी परिस्थिती सांगितली.पण तो मात्र नेहेमीप्रमाणेच निश्चल.. त्याला लग्नाबद्दल बोललं की काही नं काही कारण काढुन नाटकं करणं चालुच..नेहेमी सांगायचा की मी घरी आपल्याविषयी बोलायला जातोय आणि पूर्णतः बदलुन यायचा..

इकडे आई बाबांचे प्रेम,त्यांची चिंता, त्यांचा आग्रह, आणि दुसरीकडे तो..त्याचं प्रेम, त्यांनी घेतलेल्या प्रेमाच्या शपथा, त्याने तिची वेळप्रसंगी घेतलेली काळजी, ती आनंदात रहावी म्हणून केलेले प्रयत्न.. या अश्या मानसिक आणि शारिरीक त्रासाने ती अगदी अर्धी होऊन गेली होती.

शेवटी तिने शहानिशा करण्याचा निर्णय घेतला. तिला कळले की अख्ख्या दोन वर्षांपासुन त्याने लग्नाबद्दल एकही शब्द काढला नव्ह्ता. आणि त्याच्या घरचे लोक त्याच्यासाठी आनंदात स्थळं शोधत होते..आणि वरुन त्याने "तिचा साखरपुडा झालाय" असं घरी सांगितले होते. तिला हे ऐकुन तर काही सुचेनासेच झाले..आपल्यावर निस्सीम प्रेम करणारा मनुष्य हाच का असा तिला प्रश्न पडला. आपण कुठे कमी पडलो असे वाटुन तिला रडु आवरेनासे झाले.

तिने त्याला फोन केले, भेटायचा प्रयत्न केला पण तो कुठे गायब झाला कुणास ठाऊक? तिने त्याच्या मित्रा कडुन त्याला समजवायचा प्रयत्न केला पण काही फ़ायदा झाला नाही. त्याने तिच्या सगळ्या ईमेल्स तिच्या अकाऊंट मध्ये जाऊन उडवुन टाकल्या. तिच्याशी आणि त्याच्याशी मैत्री किंवा ओळख असणार्या सगळ्या लोकांशी संबन्ध तोडुन टाकले...आपला फोन नंबर बदलवुन टाकला.

आता असेल तो मोकळा...कुणा दुसर्या सावजाच्या शोधात...

Comments

  1. प्रेम अंधळं असतं असं म्हणतात.. असावं.. पण इतकं नाही की त्या अंधारात आपणच दुखाच्या गर्तेत कोसळत जावं. प्रेमभावनेत दुखावलेल्या, दुरावलेल्या आणि निराशेच्या अंधकार गर्तेत कोसळणाऱ्या त्या प्रत्येक 'तिला' आणि 'त्याला' सुध्दा डोळे उघडे ठेवुन वावरण्याची गरज आहे.

    प्रेमातील अंधळेपण हे एकमेकांचा विश्वास अनुभवण्यासाठी असावे, एकमेकांचा विश्वास घात करण्यासाठी नव्हे.

    कुणाचा का असेना, अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.. एकाचे किंवा एकीचे जरी डोळे उघडले तरी भरुन पावले, नाही का?

    ReplyDelete
  2. खरंय अनिकेत..
    प्रतिसादाकरीता धन्यवाद...

    ReplyDelete
  3. एकाचे तरी डॊळॆ उघडले तरी पुरे! जो पर्यंत अशा भोळसट मुली आहेत तो पर्यंत अशा शार्क्सचं नक्कीच फावणार.
    आमच्या सारखे साधे सरळ लोकं , प्रेम केल्यावर लग्न करणारे फारच कमी . काय अनिकेत बरोबर नां?

    ReplyDelete
  4. महेंद्रजी अश्या मुलींना काही तोटा नाही..त्यांना इतकं उत्तम रितीने फ़सवल्या जातं की सगळ्या आयुष्याचं नुकसान होऊन बसतं..यात मुलींचा काही दोष नाही असे नाही...
    आणि एखादं असं उदाहरण समोर आलं की आपण याबाबतीत काहीच करु शकत नाही याचं वाईट वाटतं...
    प्रतिसादाकरीता मनापासुन धन्यवाद! :)

    ReplyDelete
  5. @मुग्धा: हॅलो.. सुर फक्त मुलंच फसवतात मुलींना असाच चालला आहे.. मला वाटतं उलट बाजुने सुध्दा हे सत्य आहे आपलं क्लिअर केले बाकी काही नाही

    @महेंद्र: अगदी खरं बोललात. हातात आगीचा जाळ घेउन शोधलं तरी अशी लोकं बोटावर मोजण्याइतकेच सापडतील :-)

    ReplyDelete
  6. अनिकेत, ते ओघाने आलंच..
    मुलाने मुलीला फ़सवलं काय..किंवा मुलीने मुलाला फ़सवलं काय..हे उदाहरण मुलीचं आहे एवढंच..
    मुळ मुद्दा प्रेमात पडलेल्यांच्या आंधळेपणाचा आहे. :)

    ReplyDelete
  7. नाही, ते झालेच.. फक्त तो ओघ बदाबदा कोसळणाऱ्या धबधब्यासारखा असावा हलकेच वाहणाऱ्या ओहोळासारखा नाही म्हणुन मी आपला मुद्दा अधीक अस्प्ष्ट केला गं..

    ReplyDelete
  8. प्रेमात विश्वास महत्वाचा आहे पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. हि मर्यादारेखा जरा ओळखता आली तर असे *धक्के* बसणार नाहीत :D
    माझे तर पहिल्यापासून हेच मत आहे कि जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला आयुष्याचा साठीदार म्हणवत असाल तर दोघानाही एकमेकांबद्दलच्या सगळ्या गोष्टी माहित हव्यात. किंवा माहित करून घेण्याची अक्कल असावी...

    ReplyDelete
  9. कहानी में ट्विस्ट!
    अगं, सद्य स्तिथिला तरी तो चुकला आहे हे सत्य आहे असे दिसते पण त्याने तिच्यावर खरे प्रेम केले हे पण दिसते. त्याने असे वागायला काही कारण असू शकते. मला तर वाटते की त्याला त्याची चुक कलून जाइल आणि तो परत तिच्याकडे वापस येइल कारण तिने त्याच्यावर जीवापाड प्रेम केलेले दिसते... म्हणतात ना, खरे प्रेम नेहमी जिंकते! तिची खरी सत्व परीक्षा चालू आहे असे वाटते...

    ReplyDelete
  10. अगदी.....विश्वास महत्वाचा...आणि प्रत्येक गोष्टीची पडताळणी करणे महत्वाचे...
    प्रतिसादाकरीता मनापासुन आभार...

    ReplyDelete
  11. डोळसपणे प्रेम करावे हेच खरं..... मग तो मुलगा असो वा मुलगी.

    ReplyDelete
  12. तुझ्या ब्लॉग वरची ही पोस्ट अचानक वाचायला मिळाली. वाईट वाटलं वाचुन, कुठंतरी वाचलेलं एक वाक्य आठवलं ... "एक मुलगी जेव्हा एका मुलाच्या ह्रदयावर डोकं ठेवते तेव्हा मला खुप हसु येतं, कारण त्या मुलीला डोकं नसतं आणि त्या मुलाला ह्रदय ! "
    सगळेच असे असतात असं ही नव्हे, प्रेमाखातर कशाचीही पर्वा न करणारे ही या जगात असतात.

    -अजय

    ReplyDelete
  13. आज पहिल्यांदा तुझा blog वाचला. बाकी सगळ्या post वर सावकाश comments देईनच, pan ह्या post चा vishay जरा जास्तच लागला मनाला. May be becoz सध्या गेल्या 2-३ महिन्यात मी असे तीन चार किस्से पाहिले आहेत. अश्याच subject वर blog पण टाकला आहे. खूप वाईट वाटत मनाला हे असं काही ऐकलं किंवा पाहिलं कि. प्रेम, इतकी नितांत सुंदर भावना, पण त्याचासुद्धा बाजार मांडतात हे लोक.

    - Amruta

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे