तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे.
तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;)
काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे?
मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट.
संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित्रीकरण केले आहे. अगदी वास्तवासारखे.
प्रकाश राज म्हणजे तामिळसेल्वन आणि मोहनलाल म्हणजे आनंदन, त्यांची मैत्री, तामिळसेल्वन ची ओघवती भाषा, कविता आणि जनतेला उद्देशून केलेली भाषणे हे केवळ अनुभवण्यासारखे आहे. एखादा व्यक्ती त्याच्या पात्राशी किती समरस होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रकाश राज. त्यांनी मोठ्या ताकदीने तामिळ सेल्वन उभा केला आहे. आनंदन म्हणजे एमजीआर, वास्तविकतेत खूप मोठे व्यक्तिमत्व पण मोहनलाल नी खूप छान भूमिका केली आहे. आपला जीवश्च कंठश्च मित्र आपल्या आधी देवाघरी गेल्याचे दुःख, जनतेसमोर नं आणता मनात ठेवून पुढची वाटचाल करणे हे खरंतर किती कठीण आहे, पण तामिळ सेल्वन कसे सगळे सांभाळून घेतो आणि हळूहळू गेलेल्या नेत्याची जागा घेतो हे ही छान दाखवले आहे.
मोठे होण्याकरता तेवढा त्यागही जरुरी आहे, दोन्ही नेत्यांच्या आयुष्यात आलेली वादळे, आणि ती त्यांनी केवढ्या ताकदीने पार केली हे बघतांना अंगावर शहारे येतात. नेतृत्व, भाषेवरचे प्रभुत्व, जनतेवर असलेले प्रेम, आपण करत असलेल्या कामावर श्रध्दा अश्या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
ऐश्वर्याचा हा पहिला चित्रपट, थोडी नवखी वाटतेही ती पण तिचा वावर हवा हवासा वाटतो हे मात्र खरे. रेवती आणि तब्बू यांनी अप्रतिम अभिनय केलाय. मला रेवती खूप आवडली, तिच्या भूमिकेला खूप फुटेज नाही मिळाले पण तरीही मस्त अभिनय केलाय, नवर्याच्या लार्जर दॅन लाईफ प्रतिमेला सांभाळून सगळे घर ताकदीने उभे करणारी रेवती मनाला भावून जाते. तेच आपल्या प्रिय व्यक्तीच्या खांद्याला खांदा लावून, तेवढ्याच ताकदीने त्याच्यासोबत लढणाऱ्या तब्बूची पण कमाल वाटते. आजच्या फेमिनिसम च्या काळात ह्या बायकांनी एकाच व्यक्तीसोबत कसा संसार केला ते ही एकदम आयडियल असा..हे कोडेच आहे.
गौतमी आनंदन ची बायको असते आणि ऐश्वर्या पहिली बायको. सगळी नाती अतिशय कॉम्पलेक्स अशी पण तरीही प्रत्येकाच्या भूमिकेला दाद द्यावी वाटते.
नरमुगये हे गाणं ए आर रहमान चं मास्टरपीस आहे. माझं आवडतं गाणं..
उन्नोड नान इरुंध ओव्वोरु मणिथुलियूम
मरणंपडकईलियूम मरकाध कणमणीये ( हे ऐकायलाच हवे )
आपल्या प्रेयसी करता याएवढी उत्कट कविता मी आजवर ऐकली नाही.
नुकत्याच एका कार्यक्रमात अरविंद स्वामी (रोजा चित्रपटाचा हिरो ) नी म्हंटलेल्या ह्या चार ओळी मनात घर करून आहेत. इथे लिंक देतेय :)
https://youtu.be/v7l5Pr4ufPY
मला चित्रपट खूप लवकर संपल्यासारखा वाटला. It kept me longing for something more. बहुदा यातच चित्रपटाचे यश आहे.
कुठे बघता येईल? - ऍमेझॉन प्राईम वर :) सबटायटल्स सकट
Comments
Post a Comment