Wednesday, January 30, 2019

दाक्षिणात्य खाद्य संस्कृती - पोंगलजरा उशिराच का होईना, मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. अख्खा महाराष्ट्र जिथे मकर संक्रमण आणि उत्तरायण अनुभवत असतो तिथे थोड्या दूरवर ;) म्हणजे आपल्या तामिळनाडूमध्ये कापण्या सुरु झाल्या असतात आणि पोंगल चा सण अगदी दिवाळीसारखा थाटामाटात साजरा केला जातो. उसाचे ढीग, ओल्या हळदीचे धांडे आणि शेतातून नुकताच आलेला भात यासगळ्यांनी मन आणि घर अगदी भरून जातं. पोंगल म्हणजे तामिळ लोकांची दिवाळी असे म्हणायला  हरकत नाही. दिवाळी हे लोक अगदी एकंच दिवस साजरा करतात. पण पोंगल मात्र ४ दिवसांचा असतो. भोगी , थई पोंगल, माटू पोंगल, काणूम पोंगल असे चार दिवस सगळीकडे सुट्टी असते, सगळे आपापल्या गावी जातात म्हणजे चेन्नई हुन. तर असा हा पोंगल. पोंगल हे खरेतर एका पदार्थाचे नाव आहे. पोंग म्हणजे उतू जाणे. उतू जाणे म्हणजे समृद्धीचे लक्षण मानले जाते आणि पोंगल करतांना वरचे फेसाळलेले पाणी उतू जाऊ देतात पोंगल च्या दिवशी आणि पोंगालो पोंगल असे म्हणतात. मार्गळी महिना संपून थई महिना सुरु झाला म्हणूनही पोंगल ला थई पोंगल असे म्हणतात. भोगी च्या दिवशी सकाळी भयंकर धूर होता आकाशात,  जुन्या वस्तू जाळून घर स्वच्छ केल्या जाते ह्या दिवशी  अगदी पहाटे ४ वाजता लहान मुले ढोल बडवत सगळ्यांना उठवत  रस्त्यावरून आपला ताफा घेऊन जातात. पोंगल च्या दिवशी लागणारे  सगळे सामान  भोगीच्या दिवशी बाजारात दिसू लागते.
आदल्या दिवशीच्या तयारी बद्दल तामिळ लोकांचे मला अतिशय कौतुक आहे. पोंगल च्या दिवशी मोठाल्या रांगोळ्या प्रत्येक दारासमोर काढल्या जातात ते ही आदल्या रात्रीच जेणेकरून सकाळी फ्रेश रांगोळी तयार. दुसऱ्या दिवशी त्यात पुन्हा वेळ घालवण्याची गरज नाही. अजून एक म्हणजे घरात देवासमोर काढल्या जाणारी रांगोळी तांदुळाच्या पिठाची असते, रात्रीच काढून ठेवली की ती सकाळपर्यंत फरशीवर वाळून तयार असते म्हणजे पुन्हा वेळ वाचला.  तामिळ लोकांचे  पहाटेच्या प्रहरावर अतिशय प्रेम आहे. सकाळी लवकर उठणे आणि कामे भराभर आटपणे यात त्यांचा हातखंडा आहे. पोंगल च्या दिवशी सकाळी ७ पर्यंत पूजा आटोपून ही मंडळी निवांत जेऊन सगळ्यांकडे आशिर्वादाला जाऊन पण १ वाजता वामकुक्षी ला घरी येऊ शकते. ज्यांना ऑफिस आहे ते पूजा, जेवण आटोपून अगदी ट्रेन पकडून सुध्दा ऑफिस ला जाऊ शकतात. वक्तशीरपणा आणि वेळेचा सदुपयोग ह्या दोन गोष्टी तामिळ लोकांकडून अगदी शिकण्यासारख्या आहेत.
पोंगल म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी हळद नं घालता. आता ती शिजवण्यासाठी वेगळ्या पद्धती आहेत. कालच्या पोंगल मध्ये मला उकळी आणायचीच होती म्हणून माझ्याकडे असलेल्या एका पितळेच्या कळशी ला ओली हळद बांधली, त्याला चंदनाचे बोट लावले, ओट्यावर रांगोळी काढली, हळद कुंकू वाहिले,मागे ऊस लावला, पूजा केली,आणि मग मध्ये पाणी घातले, भाजलेली मुगाची डाळ आणि तांदूळ वरून घातले. थोडी उकळी फुटली की खूप मोठ्या मनाने भरपूर गुळ घातला, ४ चमचे साजूक तूप घातले आणि शिजू दिले. शिजत असताना फेस येतो त्याला पाहून पोंगालो पोंगल असे म्हणतात. तशी समृद्धी नेहेमी असावी सगळ्यांकडे अशी प्रार्थना करतात.
वेन पोंगल म्हणजे खारा पोंगल, मुगाची हळद नं घालता  खिचडी करायची त्यात शिजतांना मीठ  टाकायचे, आणि शिजल्यावर, वरून  तुपाची, कढीपत्ता, हिंग, मिरे, किसलेले आले  घालून फोडणी घालायची, वरून छान तळलेले काजू पण घालता येतात. वेन पोंगल  सोबत सांबर आणि मेदुवडा हे कॉम्बिनेशन आहे.
पूजा करताना वेतलई ( विड्याची पाने ), पाककु (सुपारी), पु ( फुले), पळम ( केळी ) आणि नारळ यांचे फार महत्व आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सगळे देवासमोर ठेऊन सगळ्यांकडे अशीच समृद्धी चिरंतन राहू दे अशी प्रार्थना केली आणि सगळ्यांनी शक्करई पोंगल चा फडशा पाडला.
पोंगल साठी कळशी तयार 

 पूजेची तयारी 
मेदुवडा 

ओली हळद 

वडे पोंगल नैवेद्य 

मागच्या  वर्षीची कोलम (रांगोळी)
Thursday, December 20, 2018

दाक्षिणात्य खाद्य संस्कृती - रसम

चेन्नई मध्ये यावर्षी जास्त पाऊस झाला नाही. त्यावर्षी खूप थंडी असते त्यावर्षी पाऊस नसतोच असे आहे. एवढी थंडी मला तरी १० वर्षात पहिल्यांदाच जाणवली. थंडी आणि आर्द्रता सोबत असल्याने डोके सुन्न झाल्यासारखे वाटते आणि त्यावर एकाच उपाय घरोघरी वापरल्या जातो तो म्हणजे "रसम". मिरे, धने, जिरे , हिंग, लसूण टाकून केलेले आंबटगोड पण झणझणीत रसम म्हणजे या थंडीच्या दिवसात हवे हवेसे वाटते. त्याबरोबर मस्तपैकी गुरगुट्या भात आणि पापड म्हणजे अगदी स्वर्गसुख. रसम हे अनेक प्रकारे केल्या जाते. प्रत्येक घरची जवळपास पद्धत वेगळी असते. मी माझ्या यजमानांकडून  रसम शिकलेय. अप्रतिम रसम करतात ते आणि त्यांनी मला लगेच शिकवलेही. एकदम पाण्यासारखा  पातळ पण अतिशय गुणी असा हा पदार्थ माझ्या सगळ्यात आवडता आहे. आमच्या घरी कोणालाही सर्दी, ताप, खोकला झाला की रसम अगदी लगेच मदतीला धावून येते. औषधी गुणधर्म आणि अफलातून चव यांचा उत्तम मेळ म्हणजे रसम. सार म्हणजे रसम नव्हे. कर्नाटकात केले जाणारे सारू आणि आंध्रात केले जाणारे पूलसु हे सगळे सारखेच जरी वाटत असले तरी त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आजी मसालेभाताबरोबर जे सार करायची ते आणि रसम यांचा दूरदूरवर काहीही संबंध नाही. हे काय पाण्यालाच तर फोडणी द्यायची असते, पाणीच तर आहे ते म्हणणाऱ्या असंख्य लोकांना "एकदा तामिळ पध्धतीचे रसम करून दाखवा बघू असे म्हणावेसे वाटते." कारण एवढ्या वर्षानंतर आताशा मला छान रसम जमायला लागले आहे असे सगळे म्हणतात स्पेशली माझे सासरे.
टमाटर रसम, वेप्पम पू रसम ( कडुलिंबाच्या फुलाचे रसम), अननस रसम, पुंडू ( लसूण ) रसम, इंजि (आले) रसम,
कांदाथीपली ( लेंडी पिपरी) रसम , जिरे रसम, मांगा ( आंबा ) रसम, इलूमिची ( निंबू) रसम , शेवग्याच्या शेंगांचे रसम अश्या अनेक प्रकारे रसम केल्या जाते आणि प्रत्येकाचा वेगळा गुणधर्म आहे.
आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो कि Milagatawny असे सूप असते ते म्हणजे मिलागू तन्नी ( पेपर रसम) असते हे विशेष सांगावे वाटते.
आज थंडी आहे आणि सगळ्यांचे घसे खराब मग मस्तपैकी पुंडू ( लसूण) रसम केले.

 थोडीशी उडिद डाळ, मिरे, लाल मिरच्या, हिंग, लसूण, धने, जिरे  मस्तपैकी भाजून घेणे. त्याचा खमंग वास सुटतो. खूप करपट नाही, अगदी सौम्य भाजायचे. गैस बंद करून, एका मिक्सर च्या भांड्यात काढायचे थंड झाले कि त्याचे पावडर करून घेऊन काढून ठेवायचे. २ टमाटर मिक्सर मधून काढून घ्यायचे, थोडे पाणी टाकायचे मिक्सर मध्ये वाटताना. इकडे गरम पाण्यात चिंच भिजू टाकायची, भरपूर पाण्यात निंबाएवढा गोळा. खूप कोळ घट्ट होऊ देऊ नये, साधारण आंबट असावा. एका पातेल्यात हे चिंचेचे पाणी, टमाटर चे पाणी उकळायला घ्यावे, त्यात वरून हिंग, हळद टाकावी, हळद अँटिसेप्टिक असते म्हणून मी हटकून टाकते नाहीतर रंग पण येत नाही रसम ला. त्यात लसूण पाकळ्या ठेचून टाकाव्या, गोडलिंब ( कढीपत्ता) टाकावा, कोथिंबीर चिरून टाकावी, आणि मस्तपैकी एक उकळी येऊ द्यावी. एक उकळी आली की घरच्यांना एव्हाना कळून चुकते कि "रसम हो रहा है"
मग आपला मिक्सर मधला वाटलेला मसाला टाकावा. मीठ टाकावे आणि अजून थोडे स्पाईसी हवे असेल तर मिरीपूड टाकावी. बस्स एक दोन  उकळ्या आल्या की गैस बंद करावा. वरून फोडणी मी शक्यतो देत नाही पण तरीही द्यायची असेल तर थोड्या तेलात, लाल मिरच्या, गोडलिंब, हिंग आणि मोहरी ची फोडणी करावी. रसम वरून घालावी. हे साधे रसम झाले पुंडू रसम.

परपु रसम 
चिंच वरणाच्या पाण्यात भिजू घालायची आणि पुढील कृती वरच्याप्रमाणे

मिलागू रसम 
वरची कृती तीच पण त्यात मिरे जास्त प्रमाणात टाकायचे.

इलूमिची रसम 
यामध्ये चिंचेचा कोळ न वापरता पाण्यात निंबू पिळून ते पाणी वापरतात. बाकी कृती तीच. निंबाचा फ्लेवर मस्त लागतो बाकी मसाल्यासोबत

वेपम पु ( कडुनिंबाच्या फुलाचे रसम)
कडुनिंबाची फुले तुपात जराशी भाजून घ्यायची. वरील कृती करून एक उकळी आली की हि फुले रसम मध्ये टाकायची. मसाला वाटून टाकायचा आणि २ उकळ्या फुटू द्यायच्या. असे हे कडुनिंबाच्या फुलाचे रसम. उन्हाळ्यात केला जाणारा हा प्रकार पोटासाठी थंड असतो. तसेही रसम पाचनकारक

कांदाथीपली ( लेंडी पिपरी) रसम
कांदाथीपली म्हणजे लेंडी पिपरी, घरच्या घरी आपल्याजवळ इतके गुणकारी पदार्थ असतात की आपल्याला बाहेरच्या औषधींची गरजच नसते खरेतर. सर्दी, खोकला यावर रामबाण उपाय म्हणजे कांदाथीपली रसम. उडिद डाळ, मिरे, लाल मिरच्या, हिंग, लसूण, धने, जिरे आणि अगदी २ कांदाथीपली भाजून घेणे आणि वरची कृती करणे. गरम गरम कांदाथीपली रसम नी एकदम सर्दी पडसे कमी होते.

अननस रसम 
सगळी कृती करून झाल्यावर फ्लेवर साठी अननसाच्या फोडी टाकायच्या. थोडा फॅन्सी पण मस्त प्रकार.

नेल्लिका रसम ( आवळ्याचे रसम) 
रसम मसाला करत असतांना त्यात आवळ्याची( आवळे धुवून त्यांच्या बिया काढून टाकायच्या आणि उभे काप करायचे, मिक्सर मधून पेस्ट करून घ्यायची) पेस्ट टाकावी आणि वरील कृती करावी . ज्यांना आवळे आवडत नाही त्यांच्यासाठी नेल्लिका रसम मस्त आहे.

आंबा ( मांगा ) रसम 
कैरी धुवून घेऊन, त्याच्या फोडी वरण करतांना प्रेशर कुक, करायच्या. चिंच नं वापरता, हे पातळ वरणाचे पाणी वापरायचे रसम करतांना. उन्हाळ्यात करायचे रसम आहे हे. पेवंदि आंबा पण चालतो याकरता.

तर असे हे औषधीसारखे गुणकारी रसम. माझा आणि माझ्याकडच्या सगळ्यांचा अतिशय आवडता पदार्थ. मला सूप करण्यापेक्षा रसम सोपी आणि जास्त जवळचे वाटते. भारतीय खाद्यसंस्कृती अतिशय समृद्ध आहे. इतके वेगळे पदार्थ वापरून एकाच पदार्थ करता येतो हे किती वाखाणण्याजोगे आहे. प्रत्येक ऋतूनुसार रसम मध्ये वेगवेगळ्या वस्तू वापरता येतात.
उन्हं जास्त झाले की वेपम पु रसम, किंवा मांगा रसम, थंडी पडली की  पुंडू रसम, किंवा  कांदाथीपली रसम.
घसा बसला सर्दी झाली की मिलागू ( पेप्पर) रसम. This is my go-to option for a simple meal.


 सांबार वडा नं खाता इकडे रसम वडा खायची पद्धत आहे. मऊ  मेदुवडा मस्त सोक करत ठेवायचा रसम मध्ये आणि मग खायचा अशी सुंदर चव लागते कि काय सांगू .

माझ्या बहिणीकडे पार्टीसाठी हे स्टार्टर ठेवले होते आणि लोकांना खूप आवडला प्रकार.


एकदम व्हर्सेटाइल पदार्थ - रसम. आवडल्यास जरूर करून बघा.

Tuesday, December 11, 2018

डिशवॉशर बद्दल बोलू कौतुके


डिशवॉशर बद्दल बोलू कौतुके

मग आता डिशवॉशर घेतलाय का? काय फायदा सगळी भांडी धुवूनच तर लावावी लागतात वगैरे दूषणे देऊन माझ्या घरी एकदाचे डिशवॉशर चे आगमन झाले. बरेचसे कुतूहल आणि आपण घेतलाय खरा पण भारतीय भांड्यांकरता वापरता येईल का हे काही प्रश्न मला सतत भेडावत होते. चांगले ६-७ महिने अभ्यास करून मी ब्रँड ठरवला होता आणि अगदी वापरूनही पहिला डिशवॉशर मनातल्या मनात म्हणा ना ;).
काल पुलं च्या अपूर्वाई पुस्तकात इंग्लिश माणसाबद्दल बरेच वाचले. अतिशय सुंदर वर्णन आणि त्यात त्या काळातल्या लंडन च्या जीवनशैलीमध्ये त्यांनी अत्याधुनिक उपकरणांचा केलेला उल्लेख थोडा सुखावह होता. सुखावह असण्यास कारण हे  की  ५० वर्षानंतर का होईना माझ्यासारखी सर्वसामान्य भारतीय गृहिणी डिशवॉशर सारखे अत्याधुनिक उपकरण घेऊ शकते. आणि वापरही करते बऱ्यापैकी. मेट्रो किंवा ट्यूब  बद्दल हि बरेच काही लिहिले होते, इतक्यात चेन्नई मध्ये मेट्रो साठी खणलेल्या भुयाराजवळून बस गेल्याने एक भयंकर खड्डा पडला रस्त्याला, त्यामुळे भारताची प्रगती गृहिणींनी केलेल्या उपकरणांच्या वापरावर अवलंबून नाही हे मला खटकन लक्षात आले :)
डिशवॉशर आता वापरून २ ते २.५ वर्षे झालीत. एकूण अतिशय छान उपकरण आहे. बरेचशी भांडी मी त्यात सर्रास घासायला टाकत असते. आता आमचा छोटासा फूड डिलिव्हरी चा एक उद्योग पण सुरु झालाय, त्यात काम करतांना खूपभांडी घासायला होतात. मग डिशवॉशर माझा एक महत्वाचा टीम मेंबर आहे हे मात्र नक्की.
डिशवॉशर घेतांना थोडी काळजी घेतली कि पुढे काही त्रास होत नाही हा माझा अनुभव


- ब्रँड

  • भारतात बरेच ब्रॅण्ड्स आहेत डिशवॉशर चे म्हणजे एलजी, बॉश, सिमेन्स, आय एफ बी, पण मला सर्विसच्या दृष्टीने बघितले तर बॉश एकदम उत्तम आहे. एका फोनवर तमाम टेक्निशियन मंडळी हजर असते प्रॉब्लेम सॉल्व करायला. अजून प्रॉब्लेम काही आला नाही पण मी २ दा छान सर्व्हिस करून घेतली आहे. एकदा ते येऊन सगळं समजावून सांगतात की आपण उपकरण वापरायला मोकळे. बॉश ब्रँड अगदी उत्तम.

- कुठली भांडी वापरावीत

  •  स्टील ची, काचेची, मातीची भांडी, क्रॉकरी, फूड ग्रेड प्लास्टिक वगैरे अगदी बिन्दास्त धुवून निघते. प्लास्टिक चा वापर मी टाळतेच शक्यतो पण तरीही.
  •  स्टील चे मोठाले ( ५ किलो) पर्यंत चे डबे सुध्दा मी घासायला टाकते वेळ पडेल तशी. दुधाची , चहाची वगैरे सगळ्या प्रकारे अगदी खराब झालेली भांडी सुध्दा मी धुवायला टाकते. असंख्य कप, बश्या, वाट्या, चमचे, प्लेट्स , तेल तुपाची भांडी, मुलीचा डबा, बाबाचे डबे सगळं सगळं.

- हाताने घासायची भांडी / साबण सोडा

  •  एवढे घासूनही प्रसंगी असतातच भांडी घासायची हे मनात पक्कं करून घेणे महत्वाचे आहे. 
  •  कढया पण घालता येतात पण त्या अलुमिनियम च्या असल्याने लख्ख निघत नाहीत. गाळण्या पण हातानेच धुतलेल्या बऱ्या प्लास्टिक च्या असतील तर. 
  • पण बाकीच्या भांड्यांना बाईची गरज नाही हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. 
  • फिनिश म्हणून ब्रँड येतो त्याच्या टैबलेट्स, सॉल्ट आणि रिन्स एड अश्या तीन गोष्टी लागतात. त्या आपल्या नेहेमीच्या विम आणि बाई च्या खर्चाच्या निम्मा खर्चात मिळतात. चालतात ही भरपूर. पाणी कमी लागते. आणि स्वच्छ भांडी, स्टरलाईज झालेली... अजून काय हवे.

देवाचे पात्र, समया, निरंजन वगैरे हातांनीच घासून टाकते तरीही..अजून काही डिशवॉशर नाही वापरत त्याकरता.
'पण ओव्हरऑल १००% मार्क या उपकरणाला.. बाय बाय खरकटी भांडी आणि हॅलो डिशवॉशर.


Tuesday, July 11, 2017

अविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी
मागच्या आठवड्यात द ग्रेट गॅटस्बी नॉवेल वाचायला घेतलं. खूप उत्सुकता होती मला. पुस्तकाची सुरुवात खूप साधी पण आत ओढून घेणारी वाटली. पुस्तक सुरु करण्या आधीची प्रस्तावना तर भन्नाट. स्कॉट फित्झगेराल्ड हा लेखक आहे द ग्रेट गॅटस्बी या पुस्तकाचा. १०० वर्षांपूर्वी लिहिलेलं पुस्तक, एक खिळवून ठेवणारं कथानक. जे गॅटस्बी, या अतिशय गूढ अभिव्यक्ती असलेल्या माणसाभोवती रेखाटलेलं. निक कारावे, हा या पुस्तकाचा नरेटर, वॉल स्ट्रीट च्या एका कंपनीत काम करत असतो. तो इस्ट एग या शहरात राहायला आल्यावर त्याच्याबाजूलाच असणाऱ्या मोठ्या, अवाढव्य बंगल्याशी त्याची ओळख होते. आणि हळूहळू त्या बंगल्या च्या मालकाशी म्हणजे  जे गॅटस्बी, या व्यक्तीशी झालेली अगदी साधी ओळख त्याचं आयुष्य कसं बदलून टाकते याचे निक नीच घेतलेला मागोवा म्हणजे हे पुस्तक.
स्कॉट फित्झगेराल्ड यांची भाषा ओघवती आहे. १०० वर्षानंतरही त्यांनी वर्णन केलेल्या अमेरिकेशी आपण समरस होऊ शकतो, इतके की आपणच इस्ट एग मध्ये आहोत असे वाटते. जे गॅटस्बी, आणि त्याची व्यक्तीरेखा स्कॉट नी अतिशय छान उभी केली आहे. त्याची राहणी, त्याचा भूतकाळ, त्याची डेझी (म्हणजे निक करावे ची चुलत बहीण) हे सगळे पुस्तक वाचून ३ दिवस झाले तरीही डोळ्यासमोर तसे च्या तसे उभे राहतात.
जे गॅटस्बी उमदा ऑक्सफर्ड मध्ये शिकलेला माणूस, सध्या एक खूप मोठा व्यापारी, सगळे शनिवार रविवार खूप मोठया पार्टीस देणारा पण स्वतः अतिशय कोरडा राहणार.. निक एक असा एकमेव व्यक्ती असतो ज्याला गॅटस्बी ने पार्टी चं खास निमंत्रण दिलं असतं. भव्य पार्टी मध्ये निक आणि जॉर्डन पोचतात आणि त्यांना कळतं कि जे ह्या सगळ्या पार्टीस डेसी, निक ची चुलत बहीण यावी म्हणून देत असतो. जे आणि डेसी याचं प्रेम.. जे वेळेवर पोहचू नं शकल्याने डेसी नी स्वतः च टॉम बुखानान शी केलेलं लग्नं आणि नंतर ५ वर्षांनी जे गॅटस्बी नी त्याच शहरात, एक भव्य दिव्य बंगल्यात राहणं..डेसी ची रोज वाट बघणं, तिच्या डॉक वर असलेल्या निळ्या दिव्याला सतत पाहत राहणं सगळं अगदी एपिक.
जे ची निक ला किंवा कोणालाही बोलावंतांना "ओल्ड स्पोर्ट" म्हणण्याची लकब तर अतिशय दिलखेचक आहे.
गॅटस्बी ची पार्श्वभूमी खूप दरिद्री आणि वाईट्ट दाखवली आहे, पण जे ला नेहेमीच एक मोठा माणूस व्हायचं असतं, त्याला नियती साथ देतेही. पण डेसी काही त्याला मिळत नाही, डेसी मिळावी म्हणून केलेला खटाटोप पुस्तकात मांडला आहे.
आजकालच्या पुस्तकांसारखा कोठेही चिप वल्गर असा भाग अख्ख्या पुस्तकात नाही. सगळं अगदी तरलतेने मांडण्यात स्कॉट फित्झगेराल्ड नी अगदी बाजी मारली. १५० पानांच्या पुस्तकात एखाद्या व्यक्ती बद्दल वाचकाला इतकं काही सांगून जाणे म्हणजे एकदम किमया आहे. जादू केल्यासारखे आपण पानावरुन पान वाचत जातो आणि पुस्तकाचा शेवट कसा होतो हे कळतही नाही.

चित्रपट पाहण्यासारखा आहे, पण पहिले पुस्तक वाचन केले तर बरे. मला लिओनार्डो गॅटस्बी च्या भूमिकेत प्रचंड आवडला. तसा तो जॉर्डन बेलफोर्ड च्या भूमिकेतही आवडलाच आणि टायटॅनिक च्या जॅक मधेही. ही भूमिका अगदी लक्षात राहण्यासारखी. बाकी सगळी कास्ट त्या त्या ठिकाणी छानच आहे. इतक्या सुंदर पुस्तकाला एकदम न्याय दिल्यासारखा आहे हा चित्रपट.
काही काही वाक्य मी कदाचित आयुष्यात विसरणार नाही.

“So we beat on, boats against the current, borne back ceaselessly into the past.” ...


“Let us learn to show our friendship for a man when he is alive and not after he is dead.” 

This was so profound. 


“There are only the pursued, the pursuing, the busy and the tired.” 


“Reserving judgements is a matter of infinite hope.” 


“Life starts all over again when it gets crisp in the fall.” 

“I am one of the few honest people that I have ever known.” 

“Life is much more successfully looked at from a single window.”


बस बाकी वाचनीय आहेत. 

Monday, June 19, 2017

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया.
रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते.
तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्नानंतर च्या सुरुवातीला आमच्या घरासमोर मीच रांगोळी घालायची सकाळी उठल्या उठल्या... थोडे वर्षांनी ते बंद झाले कारण फ्लॅट सारख्या घरात शिफ्ट झालो.  त्यानंतर च्या घरात मात्र मी माझी ही  रांगोळी घालायची इच्छा मनमुराद पुरवली.
आमच्या ह्या फ्लॅट च्या समोर पण एक मावशी येऊन सुंदर रांगोळी काढून जातात सकाळी सकाळी.
ही पुली कोलम म्हणजे ठिपक्यांची रांगोळी आहे ७ ते १ असे ठिपके . अपार्टमेंट समोर काढलेली रांगोळी 
दक्षिण भारतात शैव आणि वैष्णव हे दोन भेद आहेत. शैव लोकांकडे वेगळी रांगोळी घातल्या जाते, वैष्णवांकडे वेगळी. शैव ब्राम्हण लोक म्हणजे अय्यर आणि वैष्णव म्हणजे अय्यंगार. आता का आणि कसे हे भेद निर्माण झाले याकरता विश्वरूपम सारखा एखादा चित्रपट बघायला लागेल. पण जास्त करून हा भेद अजूनही लोक पाळतात. खाणे, राहणीमान एकूणच दोन्ही गटात ब्राम्हण असण्याखेरीज काहीच सारखे नसते म्हंटले तरी चालेल. तर... रांगोळी सुध्दा दोन वेगळ्या प्रकारात घातली जाते.
- सिक्कु अथवा पुली कोलम ( ठिपक्यांची रांगोळी)
हा रांगोळीचा अतिशय साधा प्रकार आहे आणि बऱ्याच अय्यर आणि ब्राह्मणेतर समाजात ही रांगोळी काढल्या जाते. ठिपक्यांची रांगोळी लहानपणीपासून मला येते त्यामुळे काही कठीण गेले नाही पण..... आपल्याकडे कसे ठिपके जोडल्या जातात रांगोळीने, इथे सिक्कु किंवा पुली कोलम काढतांना ठिपके वगळल्या जातात.
ही पण ठिपक्यांची रांगोळी 
- पडी कोलम (म्हणजे रेघांनी काढलेली रांगोळी)
पडी कोलम मध्ये मधला चौकोन आधी काढून घेऊन त्याभोवती रांगोळी काढली जाते. मुख्यतः या रांगोळीत कमळ,शंख, चक्र, गदा अश्या वैष्णव संप्रदायात खूप मानल्या जाणाऱ्या खुणांचा वापर केल्या जातो. दारावर पडी कोलम दिसली की समजावे अयंगार घर आहे ;)
शुक्रवारी पुली कोलम काढू नये असे म्हणतात.
अजूनही पूजा वगैरे असली कि चेन्नई आणि बाकी तामिळनाडू मध्ये तांदुळाच्या पिठाला भिजवून, त्या ओल्या पिठाची रांगोळी काढली जाते. मला अजून ते काही जमले नाही. घरांमध्ये देवासमोरही तांदुळाच्या ओल्या पीठानेच रांगोळी काढली जाते. आपल्याकडे अशी एकदम पांढरी रांगोळी सहसा घातल्या जात नाही. अगदी एखादे  बोट लावतोच  कुंकवाचे. इथे मात्र नाही घालत कुंकू. मग मी ही साधीच घालते रांगोळी. कुंकू वगैरे नाही घालत.रस्त्यावरून चालतांना एका दारावरची रांगोळी

फ्री हॅन्ड पण अयंगार टाईप रांगोळी (अशी रांगोळी माझ्या आजे सासूबाईंकडे काढली जाते) 

आमच्याकडे कामाला येणाऱ्या कामाक्षी ने दिवाळीला काढलेली रांगोळी 

कपालेश्वर मंदिरात नव्या वर्षानिमित्त काढलेली मोठ्ठीजात रांगोळी
पडी कोलम अयंगार स्पेशल, रेघांनी काढलेली रांगोळी 


पडी कोलम 


पडी कोलाम 


पुली कोलम

पुली कोलम 


पुली कोलम
मार्गशीर्ष महिन्यात रांगोळीची स्पर्धा असते. सगळ्या मंदिरांच्या जवळ असलेल्या अग्रहारासमोर (म्हणजे वस्तीत) दोन्हीकडून सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. सकाळी म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर (४ -६) या वेळेत. तिरुवल्लीकेंनी, मैलापुर या अनेक मंदिरे असलेल्या भागात तर सकाळी रांगोळ्या बघायला जायची मजा असते.
हे दृश्य मला इतके आवडले,की डोळे मिटताच समोर येते, mychennai च्या फेसबुक पेज वरून साभार. आजूबाजूची घरे म्हणजे देवळासमोर च्या आग्रहाराचा भाग आहे 

एक मामी (इथे लग्न झालेल्या सगळ्या बायकांना मामी संबोधतात) मडीसार (पारंपरिक साडी) मध्ये रांगोळी घालतांना 
रांगोळी आणि तामिळनाडू हे समीकरण अगदी घट्ट आहे. चेन्नई अजूनही आधुनिकतेच्या थोडी दूरच आहे, अजूनही इथे सगळे सण समारंभ अतिशय निगुतीने साजरा केल्या जातात. चेन्नई ची सकाळ म्हणजे सडा, रांगोळी, फिल्टर कॉफी, हातात हिंदू पेपर आणि सुप्रभातम.

Monday, June 5, 2017

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा


दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा. 
आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक नाही असे कधी होत नाही तसेच दाक्षिणात्य घरांमध्ये दोश्याचे आहे. धिरडे हा प्रकार माझी आजी करायची आणि आई पण करायची. पण धिरडे आणि दोस्यात खूप फरक आहे. 
इथे दोसा म्हणजे एक टिफिन आयटम आहे, म्हणजे सकाळी नाश्त्याकरता आणि रात्रीच्या अगदी लाईट जेवणासाठी दोसा खाल्ल्या जातो. 
महाराष्ट्रात मसाला दोसा फार प्रचलित आहे. पण दाक्षिणात्य घरांमध्ये मसाला फार कमी केल्या जातो. आणि बाहेर खातांना सहसा मसाला दोसा मागवल्या जात नाही. 
दोस्याचे पीठ हे एक तंत्र आहे. कारण त्यामागे बरीच मेहनत लागते आणि बरीचशी पूर्व तयारी पण. पीठाकरता अख्खे पांढरे उडीद वापरले जातात आणि इडली चा तांदूळ. इडली चा तांदूळ जरा लठ्ठ असतो. एकदा दोस्याचे पीठ केले की मला एक आठवडा पुरतं आणि संपूर्ण आठवड्याचा सकाळचा नाश्ता डोश्याच्या पिठानीच करता येतो. 
मिक्सर मधून भिजवलेले डाळ आणि तांदूळ काढता येतात पण त्या पिठाला ग्राइंडर सारखी चव येत नाही. म्हणून सगळ्या दाक्षिणात्य घरांत ग्राइंडर हे अतिशय महत्वाचे उपकरण आहे. ९९% दाक्षिणात्यांच्या घरात ग्राइंडर असतेच असते. हे ग्राइंडर म्हणजे दगडाचं जातं. २ लिटर, ३ लिटर, ४ लिटर आणि १० लिटर अश्या साईज मध्ये ग्राइंडर बाजारात मिळते. हे ग्राइंडर म्हंजे २ तिकोनी दगड किंवा गोल दगड, जे खालच्या गोल दगडावर घासल्या जातात. घासल्या जातांना मध्ये तांदूळ आणि डाळ वाटल्या जाते , असे करून  दोस्याच्या पीठाला योग्य ती कन्सिस्टन्सी येते. पूर्वी हातानी केल्या जाणारी हि गोष्ट आता बरीच ऑटोमेटेड झाली आहे. 
वेट ग्राइंडर 

पूर्वीचे ग्राइंडर 

दोस्याला पूर्व तयारी लागते ती अशी: 
रविवारी सकाळी ४ मापं इडली तांदूळ आणि १ माप उडीद डाळ वेगवेगळी भिजू घालायची, उडीद डाळीत थोडे मेथी दाणे टाकावे भिजत घालतांना (म्हणजे पीठ छान हलकं होतं ). रविवारी संध्याकाळी तांदूळ आणि डाळ दोन्ही वेगवेगळे वाटून घ्यावे. आणि मग मिक्स करावे. डोश्याचे पीठ मिक्स करून छान झाकून ठेवले की सोमवारी सकाळी मस्त फुगून येते. अश्या फुगलेल्या पिठात पाणी नं घालता, मीठ घालून मिक्स करावे. ह्या पिठाच्या इडल्या मस्त होतात. 
ताज्या पिठाच्या इडल्या छान होतात म्हणून आठवड्याचा पहिला दिवस इडली हा नाश्ता. दुसऱ्या दिवशी डोसे, तिसऱ्या दिवशी उत्तप्पे, चौथ्या दिवशी कल डोसे, पाचव्या दिवशी अप्पे, हा क्रम असतो. हा क्रम मी ठरवलेला नाहीये. डोसा पिठाच्या आम्बटपणावरून हे पदार्थ ठरवता येतात. ह्या पिठाची फार काळजी घ्यावी लागते. जर पीठ जास्त दिवस टिकवायचे असेल तर थोडेच पीठ काढून ठेवून बाकीचे फ्रिज मध्ये ठेवता येते. 
फ्रिज मध्ये ठेवल्याने कधीही आठवडाभर दोसे करता येतात. डोस्याचे बरेच प्रकार करता येतात. साधा दोसा, पोडी दोसा, एग दोसा, कल दोसा, तुपाचा दोसा म्हणजे घी रोस्ट, मसाला दोसा हे त्यात मुख्य प्रकार. कृष्णवी करता दोसा म्हणजे प्राणप्रिय खाद्यपदार्थ आहे. ती दिवसभर दोस्यावर राहू शकते. तिच्या स्पेशल दोस्याचे नाव आहे मोरू मोरू डोसा म्हणजे क्रिस्पी दोसा ;) 

पोडी दोसा: 
प्रत्येक दाक्षिणात्य घरात परुप्पू पोडी म्हणजे लाल मिरच्या, तूर डाळ,उडीद डाळ, चणे डाळ घालून तयार केलेली पूड असते. दोसा तव्यावर घातला कि त्यावर ही पूड भुरकवायची आणि वरून मस्तं तिळाचे (हो तिळाचेच) तेल घालायचे. मस्तपैकी पोडी दोसा तयार. इकडे दोस्यावर घालण्याकरता नल्ल येन्नाई (म्हणजे चांगले तेल, म्हणजेच तिळाचे तेल) वापरतात. 


घी रोस्ट: 
नॉर्मल दोसा करतांना तिळाचे तेल नं घालता तूप घातले की घी रोस्ट दोसा तयार होतो. थोडा अजून लाल होऊ द्यायचा आणि छानपैकी फोल्ड करायचा. घी रोस्ट ची चव अफलातून लागते. एग दोसा: 
साधा दोश्याचं पीठ तव्यावर फिरवलं की लगेच एक अंडं फोडून त्यावर घालायचं, थोडं शिजलं की उलथायचं. अंड्याचा दोसा अतिशय पौष्टिक आहे असं माझं मत आहे. खूप काही सोबतीला नसलं तरी हा दोसा बराच पोटभरीचा होतो. 


कल दोसा: 
नॉन वेज सोबत खाण्यास एकदम मस्त असे स्पॉंजी छोटे दोसे छान लागतात. कल म्हणजे तवा. ह्या दोस्याला करतांना वरून झाकणी ठेवतात. म्हणजे उलथायची गरज नसते. छोटे दोसे दिसायलाही छान आणि करायला ही सोपे आहेत. हा प्रकार कर्नाटकातून इकडे आला आहे. 


चीज दोसा: 
साध्या दोस्यावरून मोझरेल्ला चीज खिसुन टाकले की गरम तव्यामुळे चीज वितळते आणि दोस्यावर पसरते. चीज दोसा बच्चेकंपनीला आवडणारा असा आहे. एरवी कृष्णवी दोसा चीज ला लावून सुध्दा खाते. 

मसाला दोसा: 
दोसा आणि बटाटयाची भाजी, हे समीकरण माझे फार आवडते आहे. मसाला म्हणजे थोडा मऊसर असावा मग चटणी नसली तरी चालेल. 

दोस्याकरता स्पेशल टिप्स:
दोसा हा नॉन स्टिक वर नं करता, लोखंडी तव्यावर करावा म्हणजे त्याला छान रंग येतो.
peacock कलर्स.कॉम वरून घेतलेला फोटो. अस्सल लोखंडी तवा! 
- माझ्याकडचा तवा इतका जाडजूड आहे की एका हाताने उचलता येत नाही ;) - आधी तवा छान सीजन करावा, तिळाचे तेल आणि कांद्याची फोड वापरावी. कांद्याच्या फोडीनी तेल तव्याला सगळ्या बाजूने लावावं आणि मग दोसे घालावे.
दोस्याचे पीठ जर फ्रिज मध्ये असेल तर अर्धा तास आधी काढून छान घोटून घ्यावे
- तवा खूप गरम झाला की दोसा होत नाही, म्हणून जास्तं गरम झाल्याची चाहूल लागताच, तव्यावर पाणी शिंपडावे आणि कांद्याच्या फोडीनी पाणी पसरवावे, असे केल्याने तेलही लागते तव्याला आणि पाणीही पुसल्या जाते.
- पीठ खूप आंबले तर थोडे दूध घालावे, त्याने पिठाचा आंबुसपणा कमी होतो.
- पीठ आंबवायला ठेवतांना मीठ घालू नये. पीठ आंबल्यावर मीठ घालावे.

तव्याला पीठ लागणे म्हणजे पीठ नीट आंबलेले नसणे. जर पीठ आंबले नसेल तरंच ते तव्याला लागणार आणि डोसा होणार नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यात तव्याचा काही प्रॉब्लेम नसतो पण आपण तव्याचाच प्रॉब्लेम आहे समजून नॉन स्टिक च्या मागे पडतो, इथेच मार्केटिंग ची कमाल दिसून येते. गेल्या १० वर्षात, मी छान दोसे करायला शिकली आहे असे माझे सासरे नेहेमी म्हणतात. एक मराठी मुलगी इतके छान दोसे करते याचे त्यांना फार कौतुक आहे. मुळात एका तामीळ घरात दोसे नं शिकता राहणे कठीणच होते, म्हणून पहिला पदार्थ मी आत्मसात केला तो हा. माझ्या नंणंदेने अगदी हात धरून शिकवला आहे मला दोसा, मी पण तिला फुलके शिकवले म्हणा ;)
टीप: सगळे फोटोस आंतरजालावरून..Tuesday, May 30, 2017

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती - मुरुक्कू

मुरुक्कू म्हणजे तांदळाच्या पिठाची केलेली चकली. हा माझ्या घरातल्या सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. थोडक्यात थोडे कुरुम कुरुम काहीही आवडणारे माझ्या घरचे गडी आहेत त्यात मग पापड, चिप्स, मुरुक्कू, अगदी फरसाणही चालून जातं. जेवतांना रोज पापड हवाच असा हट्ट आमच्याकडे रोज असतो आणि तो पूर्ण करावाच लागतो. तर दिंटीकल  वरून येतांना असेच एक मुरुक्कू चे गाव लागले त्याचे नाव "माणप्पारै ". इथले मुरुक्कू फारच फेमस आहेत म्हणून रस्त्याच्या कडेला थांबलो एका दुकानात. तिथे जवळपास १० प्रकारचे वेगवेगळे मुरुक्कू होते.एवढ्या प्रकारचे मुरुक्कू मी पहिल्यांदाच बघत होते. चकल्या जश्या आपण घरी करतो तसे मुरुक्कू ही करतात पण खूप वेळ लागतो आणि आजकाल सगळे दुकानात मिळत असल्याने दिवाळीशिवाय कुणी मुरुक्कू करायला धजत नाही. तर माणप्पारै या गावी हे मुरुक्कू अगदी स्वस्त, तेलविरहित मिळतात. माणप्पारै  बऱ्यापैकी कावेरी  नदीच्या तीरावर वसलेलं आहे. हे मुरुक्कू तांदळाचे केलेले असतात. तिथे पिकणारा तांदूळ आणि पिढ्यानपिढ्या मुरुक्कू करणारे कारागार हे तंत्र जुळले आहे त्यामुळेही ह्या पदार्थाला एक वेगळी चव असते. दुकानात पुदिना मुरुक्कू, वेल्ला (पांढरे) मुरुक्कू, रागी मुरुक्कू, कारम (तिखट) मुरुक्कू, अच्चपम (केरळ कडला पदार्थ) आणि बऱ्याच प्रकारचे मुरुक्कू रचून ठेवले होते. फ्रेशनेस ची हमी बाजूला बसलेल्या आणि भर दुपारी मुरुक्कू तळणाऱ्या मावशींना बघून लगेच मिळाली. दुपारच्या जेवणानंतर ३-४ तासांनी स्नॅक म्हणून मुरुक्कू खायला मजा येते सोबत छानपैकी फिल्टर कॉफी. 
मुरुक्कू करतांना 

तिखट मुरुक्कू, रागी मुरुक्कू आणि पुदिना मुरुक्कू 

अच्चपम 

मुरुक्कू मावशी - तळून झाल्यावर हे मुरुक्कू वेताच्या बास्केट मध्ये टाकतात आणि लगेच पॅक करतात.


साधे मुरुक्कू

वर्षोनुवर्षे तिरुचिरापल्ली च्या जवळ असणाऱ्या माणप्पारै या गावात आता बऱ्यापैकी ऑटोमेशन येऊन ठेपलं आहे आणि जवळपास १५० युनिट्स आहेत मुरुक्कू बनवायचे. प्रत्येक दुकानात जवळपास १२-१३ बायका आणि माणसें असतात काम करायला. माणप्पारै चे पाणीच या मुरुक्कूच्या उत्कृष्ट चवीचे कारण आहे असे बऱ्याच दुकानाचे मालक सांगतात, असेलही कदाचित कारण मी इतके छान मुरुक्कू कधीच खाल्ले नव्हते.
मुरुक्कू सोबत नन्नारी  (खस) सरबत खूप छान लागते, एवढ्या उन्हात कॉफी पिण्यापेक्षा छानपैकी नन्नारी सरबत प्यायलो आणि श्रीरंगम ला निघालो, श्रीरंगनाथन पेरुमाल यांच्या मंदिराकडे.

रेफ: http://www.thehindu.com/news/cities/Tiruchirapalli/%E2%80%98Manapparai-murukku%E2%80%99-still-in-great-demand/article16436372.ece


दाक्षिणात्य खाद्य संस्कृती - पोंगल

जरा उशिराच का होईना, मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. अख्खा महाराष्ट्र जिथे मकर संक्रमण आणि उत्तरायण अनुभवत असतो तिथे थोड्या दूरवर ;) म...