Skip to main content

नवाबाचे शहर आणि हैदराबाद

आपलीकडे सुट्टीच्या दिवसात मामाच्या गावाला जायचा प्रघात आहे, आता उद्या शाळा सुरु होतेय तेव्हा सुट्टीत काय काय केले हा प्रश्न सालाबादाप्रमाणे विचारला जाईलच म्हणून ही छोटी निबंधवजा पोस्ट :) 
यावेळी मामाच्या गावाला तर आम्ही गेलोच पण त्याहीपेक्षा exciting अश्या नवाबाच्या गावाला जायचा योग आला. कामानिमित्त हैदराबाद ला ६-७ महिने राहिले आहे, तेव्हा काही खूप प्रगत नव्हते शहर. एकच जागा होती पॅरॅडाईस. बावर्ची पण अगदी नवेच होते तेव्हा. आणि मी अगदी शहराबाहेर होते राहायला, त्यामुळे माझा शहराशी जास्त संबंध आलाच नाही. माझा पहिला जॉब असल्याने मला जास्त फटकता आले नाही तेव्हा. यावेळी मात्र हॉलिडे मूड मध्ये असल्याने बऱ्यापैकी फिरणे झाले. 

पहिला स्टॉप म्हणजे कामथ हॉटेल, आम्ही नामपल्ली रेल्वे स्टेशन ला उतरलो, सकाळची वेळ होती, ड्राइवर नी पिक अप केल्यावर, चहा प्यायला थांबलो कामथ ला, हॉटेल स्टेशन च्या अगदी जवळ आहे. चेन्नई च्या संगीता, सर्वना भवन ची सवय असलेलो आम्ही. चहा बोलावला, इडली, डोसा ऑर्डर केला. लगेच छानपैकी चहा, गरम इडल्या,परपु पोडी, गोडसर असा कानडी सांबार आणि दोन चटण्या आल्यापण टेबल वर. आमची दाक्षिणात्य मंडळी एकदम खुश झाली. सकाळचा चहा, कॉफी अश्या नाश्त्यासोबत घ्यायला काय मजा येते म्हणून सांगू. अशी सकाळ म्हणजे माझी खूप आवडती सकाळ आहे. ह्यासगळ्यासोबत संपूर्ण दिवस माझा असावा आणि हिंदू पेपर हाती असावा. अहाहा!!
कामथ चा ब्रेकफास्ट 


यावेळेला थोडे वेगळ्या ठिकाणी राहायचे ठरले. मी आजवर ताज ची हॉस्पिटॅलिटी अनुभवली नव्हती. फक्त ऐकून होते की हॉटेल्स खूप छान असतात. प्रॉपर्टीस मस्त असतात ताज च्या. आम्हाला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राहायचे होते म्हणून ताज बंजारा ला उतरलो. शहराच्या मध्यभागी एवढी शांत आणि सुंदर जागा असेल असे मला वाटलेही नव्हते. विशेष म्हणजे हे हॉटेल थोडे उंचावर आहे रस्त्याच्या लेवल पासून. सतत समुद्रसपाटीला राहून असल्याने मला थोडेही उंच भाग आवडतात. चेन्नईला शहरात फार काही अनेकमजली इमारती नाहीयेत. सगळी हॉटेल्स पण फार फार तर ६ मजली. त्यामुळे शहरातच उंचावर असे हॉटेल ही थोडी नवलाई. आत जाताच चेकिन वगैरे आटपून तयार झालो, ब्रेकफास्ट तर झालाच होता. पण आम्ही कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मिस केला म्हणून हॉटेल कडून ४-५ चोकोलेट्स, पेस्ट्रीस आणि मूस चा एक प्रकार पाठवण्यात आला. So thoughtful...


दुसरा स्टॉप होता माडीनागुडा. माझ्या चुलत बहिणीकडे जायचे होते, जाता जाता हैदराबाद हे बरेच प्रगत शहर झाले असल्याचे सगळीकडे दिसले. मेट्रो ने सगळ्या शहराला जवळ आणले आहे. शहरात रस्त्याच्या दुतर्फा भली मोठी दुकाने आणि मॉल्स. विशेष म्हणजे या सगळ्या दुकानात गर्दी पण दिसत होती, आजकालच्या शॉपिंग अँप्स काळात लोक दुकानात जाऊन एवढे शॉपिंग करतात  याचे मला जरा कौतुक वाटले. प्रत्येक मेट्रो स्टेशन च्या exit जवळ एक मॉल हे प्रकरण काही माझ्या मध्यमवर्गी मनाला पटले नाही. चेन्नई शहर भारतातल्या हे चार प्रमुख शहरांपैकी एक आहे, पण अजूनही इथे एवढे मॉलीकरण झाले नाही हे नक्की. अजूनही जुनी दुकाने तशीच चालतात. त्यांना मेट्रो च्या बांधकामाच्या आड पडून टाकले नाही. यात समाधान मानावे की प्रगती नाही झाली म्हणून वाईट वाटावे या द्वंद्वात आम्ही ताईकडे पोचलो देखील. ताईकडे एकदम कडक बेत होता. पन्हं हे स्वागत पेय होते. त्यानंतर पनीर ची भाजी, भिंडी ची भाजी, कोहळ्याची कोशिंबीर, वरण, भात, ताक, आंब्याचा रस, गुलाबजाम आणि पाहुणे दाक्षिणात्य असल्याने दही भात. माझे तर भेटीनेच पोट भरले. बाकी दोघेही हैदराबाद मध्ये घरचे जेवण मिळाले त्यामुळे सुखावले. तिथून निघालो तर मध्ये भेटीगाठी घेत घेत ९.०० वाजले. दोघांनाही खूप भूक लागली होती. ताज ला रात्री पोचेपर्यंत रात्रीचे १०. ०० वाजून गेलेले. ताज ला दोन रेस्टॉरंट्स आहेत. कबाब ए बहार आणि वॉटरसाईड कॅफे. कबाब ए बहार चे सेटिंग तळ्याच्या अगदी जवळ आहे पण भर मे महिन्यात एवढे गरम होते की बाहेर बसण्याचा विचार करणे पण कठीण होते. रूमवर त्यांनी जेवण पाठवले पण आणि कबाब छानच होते. सगळं प्लॅटर मस्तं होतं. मेन कोर्स बिर्याणी पण एकदम लाजवाब. चेन्नई ला दम बिर्याणी अशी फार कमी मिळते, आमच्या दोन्ही बिर्याणी प्रेमींना हैद्राबादी दम बिर्याणी बद्दल विशेष प्रेम आहे. पॅरॅडाईस पेक्षा पण ही बिर्याणी खूप छान होती हे मात्र नक्की.
बिर्याणी आणि क्रीम ऑफ काहीतरी सूप 


दुसऱ्या दिवशी आम्ही नांदेड ला माझ्या दादाकडे जाणार होतो. सकाळी ब्रेकफास्ट पण बाहेरच केला. इथे मात्र प्रकर्षाने मला जाणवले ते म्हणजे शहराच्या बाहेर हायवे वर असणाऱ्या हॉटेल्स ची कमी. हैदराबाद पासून ३ तासावर पहिले हॉटेल लागले तिथेपण टॉयलेट ची सोय बरी नव्हती. हॉटेल चे नाव बहुदा मंत्रा. चहा च्या कप चा आकार एकदम नगण्य, चहा नं पिलेलाच बरा असे वाटून गेले. दुपारच्या टळटळत्या उन्हात नांदेडला पोचलो. वहिनी ने जेवणाची सगळी तयारी करून ठेवली होती. मराठवाडा स्टाईल वांग्याची दाण्याचा कूट टाकून रस्सा भाजी, कोशिंबीर, वरण, भात, दहीभात आणि गरम गरम पोळ्या, सोबत श्रीखंड असा बेत होता. नंतर केलेली मँगो मस्तानी तर मी आयुष्यात कधी विसरणार नाही. आपल्या आप्तेष्टांकडे गेल्यानेच अर्धे पोट भरते आणि त्यावरून हे असे साग्रसंगीत जेवण. मन भरून येते. दोन्ही घरे माझ्या माहेरची असल्याने जावईबापू एकदम खुश होते. पाय निघता निघत नव्हता, पण परत यायचे होते म्हणून निघालो. रात्री १२ वाजता ताज ला परत पोचलो. त्यादिवशी मात्र रात्री कोणीच जेवले नाही कारण एकतर खूप गर्मीत केलेला प्रवास आणि दुपारचे जेवण. :)
मँगो मस्तानी 


तिसऱ्या दिवशी थोडे बाहेर जायचा चान्स होता. सकाळी वॉटरसाईड कॅफे मध्ये बुफे ब्रेकफास्ट होता. मला असे बुफे ब्रेकफास्ट आवडतात. बरेच नवीन पदार्थ पाहायला मिळतात. उग्गानी म्हणजे मुरमुऱ्याचा उपमा, डाळीचे वडे हे दोन नवे आयटम्स होते. बाकी इडली, डोसा, वगैरे नेहेमीचे. पुरी भाजी लाईव्ह काउंटर वर होती आणि एक्दम घरच्यासारखी..मजा आगया.. तेलविरहित पुऱ्या म्हणजे एकदम झकास. फिल्टर कॉफी मात्र सुपर सुमार होती.

वॉटरसाईड कॅफे 

चेन्नई शिवाय कुठेही कॉफी प्यायचे धाडस करू नये असे मला सतत वाटत आले आहे. तयार होऊन कुठल्याशा मॉल मध्ये जायचे ठरले, माझी बहीण तिच्या लेकासोबत येणार होती. त्याला अव्हेंजर एन्ड गेम बघायचा होता. त्या थेटर चे नाव होते प्ले हाऊस. थेटर मध्ये खेळायला बरीच जागा होती.. हे थोडे नवीन होते आमच्याकरता. तिथून निघालो तर भुकेचीच वेळ झाली होती. मी नं जेवता क्रीम स्टोन चे आईस्क्रीम खाल्ले. ह्या नव्या नव्या फूड चेन्स मुळे आपल्याला सगळीकडे सारखे खायला तर मिळते पण त्या त्या ठिकाणची खाद्य संस्कृती जपल्या जात नाही असे मला वाटते.

बिर्ला मंदिर, बिर्ला मुसीएम लेकीला दाखवायचे होते. संध्याकाळची वेळ, गर्मी थोडी कमी होत आली होती. संग्रहालय खूप छान आहे, प्लॅनेटोरियम बघायचे होते पण वेळेअभावी जाता आलेच नाही. येता येता पर्ल मार्केट बघितले आणि खरेदीही केली. हैदराबाद मे जाके मोती नही लिये तो क्या किया ;).
इराणी चहा 

- सार्वी हॉटेल बंजारा हिल्स, मध्ये खाल्लेली बिर्याणी पण छान होती. तिथून घेतलेला इराणी चहा अजून मनात घर करून आहे.
- निघायच्या आधी कराची बेकरी मधून बरीच खरेदी केली. मी मूळ दुकानाची जागा कधीच बघितली नव्हती. खूप मोठे आणि प्रशस्त दुकान आहे ते. सर्व्हिस ठीकच. 
- ग्रँड स्वीट्स, अड्यार आनंद भवन, कृष्णा स्वीट्स अश्या दुकानांना सोकावल्यामुळे आम्हाला एकदम देशी घी स्वीट्स घायचेच होते हैदराबाद वरून..मग काय गाडी पुल्ला रेड्डी स्वीट्स कडे वळवली. पुथारेकुलु म्हणजे पेपर स्वीट तिथे एकदम फेमस आहे. तिथे गोंगुरा लोणचे आणि बरेच काही घेऊन निघालो. सर्व्हिस यथातथाच होती हे आवर्जून सांगावे वाटते. दूरवरून येणारे लोक सर्व्हिस साठीपण  येतात हे पुल्ला रेड्डी चे लोक विसरलेले दिसले. एक साधे हास्य पण नाही. :( 
- चारमिनार च्या आजूबाजूने एक चक्कर मारली, वेळेअभावी इथली खाद्यसंस्कृती नाही बघता आली. पुन्हा कधीतरी..
पुल्ला रेड्डी स्वीट्स 


ताज मध्ये त्या दिवशी केलेला डिनर मात्र खूप छान होता. बरीच ट्रिप संपत आली होती, म्हणून थोडे रिलॅक्स होतो.. आणि त्यांची सर्व्हिस खूपच छान होती. रूम सर्व्हिस साठी दिलेला ऑर्डर पुरेल कि नाही म्हणून शेफ नी दोन सेट पाव पाठवले, बटर रोस्टेड.. पुन्हा विचारपूस पण केली की तुम्हाला जेवण पुरले की नाही. निघतांना आम्ही दोन अप्रिसिएशन नोट्स लिहून ठेवल्या, म्हणून एक चॉकलेट्स चा बॉक्स गिफ्ट मिळाला. माझी लेक जाम खुश झाली. तिचा पाय निघता निघत नव्हता. ट्रेन मध्ये जेवायला पोळ्या आणि डाळ तडका ऑर्डर केला होता निघताना. व्यवथितपणे पॅक करून त्यात सॅलड ठेवून ताज नी आमची पाठवणी केली.. जातांना सगळे फ्रंट डेस्क चे लोक लॉबीत सोडायला हजर :) आपले लोक आपले हॉटेल असे वाटून गेले. 
बाहेरगावी एकदम घरच्यासारखा अनुभव ताज मध्ये आला. अजून माणसाला हवे काय असते ?



बाल्कनितुन दिसणारे हैदराबाद शहर 

























Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटा...

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...