जरा उशिराच का होईना, मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. अख्खा महाराष्ट्र जिथे मकर संक्रमण आणि उत्तरायण अनुभवत असतो तिथे थोड्या दूरवर ;) म्हणजे आपल्या तामिळनाडूमध्ये कापण्या सुरु झाल्या असतात आणि पोंगल चा सण अगदी दिवाळीसारखा थाटामाटात साजरा केला जातो. उसाचे ढीग, ओल्या हळदीचे धांडे आणि शेतातून नुकताच आलेला भात यासगळ्यांनी मन आणि घर अगदी भरून जातं. पोंगल म्हणजे तामिळ लोकांची दिवाळी असे म्हणायला हरकत नाही. दिवाळी हे लोक अगदी एकंच दिवस साजरा करतात. पण पोंगल मात्र ४ दिवसांचा असतो. भोगी , थई पोंगल, माटू पोंगल, काणूम पोंगल असे चार दिवस सगळीकडे सुट्टी असते, सगळे आपापल्या गावी जातात म्हणजे चेन्नई हुन. तर असा हा पोंगल. पोंगल हे खरेतर एका पदार्थाचे नाव आहे. पोंग म्हणजे उतू जाणे. उतू जाणे म्हणजे समृद्धीचे लक्षण मानले जाते आणि पोंगल करतांना वरचे फेसाळलेले पाणी उतू जाऊ देतात पोंगल च्या दिवशी आणि पोंगालो पोंगल असे म्हणतात. मार्गळी महिना संपून थई महिना सुरु झाला म्हणूनही पोंगल ला थई पोंगल असे म्हणतात. भोगी च्या दिवशी सकाळी भयंकर धूर होता आकाशात, जुन्या वस्तू जाळून घर स्वच्छ केल्या जाते ह्या दिवशी अगदी पहाटे ४ वाजता लहान मुले ढोल बडवत सगळ्यांना उठवत रस्त्यावरून आपला ताफा घेऊन जातात. पोंगल च्या दिवशी लागणारे सगळे सामान भोगीच्या दिवशी बाजारात दिसू लागते.
आदल्या दिवशीच्या तयारी बद्दल तामिळ लोकांचे मला अतिशय कौतुक आहे. पोंगल च्या दिवशी मोठाल्या रांगोळ्या प्रत्येक दारासमोर काढल्या जातात ते ही आदल्या रात्रीच जेणेकरून सकाळी फ्रेश रांगोळी तयार. दुसऱ्या दिवशी त्यात पुन्हा वेळ घालवण्याची गरज नाही. अजून एक म्हणजे घरात देवासमोर काढल्या जाणारी रांगोळी तांदुळाच्या पिठाची असते, रात्रीच काढून ठेवली की ती सकाळपर्यंत फरशीवर वाळून तयार असते म्हणजे पुन्हा वेळ वाचला. तामिळ लोकांचे पहाटेच्या प्रहरावर अतिशय प्रेम आहे. सकाळी लवकर उठणे आणि कामे भराभर आटपणे यात त्यांचा हातखंडा आहे. पोंगल च्या दिवशी सकाळी ७ पर्यंत पूजा आटोपून ही मंडळी निवांत जेऊन सगळ्यांकडे आशिर्वादाला जाऊन पण १ वाजता वामकुक्षी ला घरी येऊ शकते. ज्यांना ऑफिस आहे ते पूजा, जेवण आटोपून अगदी ट्रेन पकडून सुध्दा ऑफिस ला जाऊ शकतात. वक्तशीरपणा आणि वेळेचा सदुपयोग ह्या दोन गोष्टी तामिळ लोकांकडून अगदी शिकण्यासारख्या आहेत.
पोंगल म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी हळद नं घालता. आता ती शिजवण्यासाठी वेगळ्या पद्धती आहेत. कालच्या पोंगल मध्ये मला उकळी आणायचीच होती म्हणून माझ्याकडे असलेल्या एका पितळेच्या कळशी ला ओली हळद बांधली, त्याला चंदनाचे बोट लावले, ओट्यावर रांगोळी काढली, हळद कुंकू वाहिले,मागे ऊस लावला, पूजा केली,आणि मग मध्ये पाणी घातले, भाजलेली मुगाची डाळ आणि तांदूळ वरून घातले. थोडी उकळी फुटली की खूप मोठ्या मनाने भरपूर गुळ घातला, ४ चमचे साजूक तूप घातले आणि शिजू दिले. शिजत असताना फेस येतो त्याला पाहून पोंगालो पोंगल असे म्हणतात. तशी समृद्धी नेहेमी असावी सगळ्यांकडे अशी प्रार्थना करतात.
वेन पोंगल म्हणजे खारा पोंगल, मुगाची हळद नं घालता खिचडी करायची त्यात शिजतांना मीठ टाकायचे, आणि शिजल्यावर, वरून तुपाची, कढीपत्ता, हिंग, मिरे, किसलेले आले घालून फोडणी घालायची, वरून छान तळलेले काजू पण घालता येतात. वेन पोंगल सोबत सांबर आणि मेदुवडा हे कॉम्बिनेशन आहे.
पूजा करताना वेतलई ( विड्याची पाने ), पाककु (सुपारी), पु ( फुले), पळम ( केळी ) आणि नारळ यांचे फार महत्व आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सगळे देवासमोर ठेऊन सगळ्यांकडे अशीच समृद्धी चिरंतन राहू दे अशी प्रार्थना केली आणि सगळ्यांनी शक्करई पोंगल चा फडशा पाडला.
|
पोंगल साठी कळशी तयार |
|
पूजेची तयारी |
|
मेदुवडा |
|
ओली हळद |
|
वडे पोंगल नैवेद्य |
|
मागच्या वर्षीची कोलम (रांगोळी)
|
Comments
Post a Comment