Skip to main content

आईचा वाढदिवस!!

रोज पहाटे उठून आई पहिले पोळ्या करायची.भात वरणाचा कुकर लावून आमच्या चहा दुधाची व्यवस्था करायची.तिचा वावर झोपेतही जाणवायचा.तिच्या हातातल्या बांगड्य़ांची किणकीण मनाला मोहून घ्यायची. चहा झाल्यावर लगेच अंघोळीला जाऊन सोहळ्यानिशी देवासाठी पाणी भरायची.मग पूजा चालू होत असे.पुजा करायच्या आधी ओट्यावरच भाजी चिरून पटकन फोडणी घालत असे.मग पूजेत बसली की मला गॅस बंद करायला लावत असे..

९.३० च्या बस ने सेमिनरी हिल्स हून गांधीबाग ला ऑफिसला जायचे असायचे आणि त्याआधी हा सगळा खटाटॊप. "देवा, आज अशीच पुजा आटपली तुमची" हे तिचे आरती झाल्यावरचे वाक्य आणि कितीही लवकर उठलं तरीही पुजा मात्र घाईतच होते गं मुग्धा असं ती नेहमी मला म्हणत असे.

संध्याकाळी घरी आल्यावर थोडावेळ बसून नीट हातपाय धुऊन दिवा लावणे,शुभंकरोती म्हणणे आणि मग स्वयंपाकाला लागणे हा तिचा नित्याचा कार्यक्रम.

सणावारी तर तिचा उत्साह आणि मेहनत कळस गाठायची.सगळं साग्रसंगीत झालं पाहिजे हा तिचा सतत आग्रह असायचा.मग काय आषाढी एकादशी,गुरुपौर्णिमा, नागपंचमी, श्रावण सोमवार, गणपती, देवीचं नवरात्र सगळे सण थाटात व्हायचे.आषाढी एकादशीला साबुदाण्याची उसळ, बटाट्याची भाजी, कांदाच कीस, शेंगदाण्याच्या कूटाची आमटी,कांदे नवमी ला मस्तापैकी कांदे भजे, नागपंचमी ला दीड, साखरभात वगैरे चा देवबाप्पाला नैवेद्य.

गणेश चतुर्थीला वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, पातळ्भाजी, काहीतरी गोड , मोदक असा सगळा नैवेद्य, देवीच्या नवरात्रात तर काही विचारायलाच नकॊ.पहिल्या दिवशी वडा पुरणाचा नैवेद्य असल्याने तिला अजिबात उसंत मिळत नसे.बरं नैवेद्य हॊईस्तोवर काही खायचे नाही ही ही एक मोठी शिक्षा...

अक्षय तृतीयेला वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, पातळ्भाजी, कुरडई, पापड, चिंचोणी चा नैवेद्य, ब्राम्हणाला जेवण वगैरे...चातुर्मासात एकच वेळा जेवणे हितकारक असते असं मी ही कुठेतरी वाचलंय.आईचा चातुर्मास म्हणता म्हणता षण्मास होत असे.कारण चातुर्मास संपल्यावर ब्राम्हणाला शिधा देऊन दक्षिणा देईपर्यंत ती एकच वेळा जेवत असे.त्याचं उद्यापन झाल्यावरही बरेचसे उपास.

नुसतं हेच नाही तर घरी येणाऱ्या जाणाऱ्याची काळजी, ऑफिसचे काम, आमच्या शाळा, अभ्यासं हे सगळे तिला करावे लागायचे.
हे सगळं अखंड २२ वर्षे चालल्यावर ती हळूहळू अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या अधीन झाली आणि आम्हाला सोडून गेली.
आज आईचा वाढदिवस. माझ्या मंगळागौरीच्या निमित्ताने आज मी ही तिच्यासारखाच पुरणासकट सगळा नैवेद्य केला. तिने चढलेला गड मी ही चढायला सुरुवात केलीय.तिच्या वाढदिवसाच्या दिवशी..

Comments

  1. जुने दिवस आठवले. अजुनही असंच चालतं आमच्या घरी. वडिलांचं वय ८४ झालं तरिही अगदी असेच उपास तापास सुरु असतात.

    ReplyDelete
  2. हो ना..सगळं पद्धतशीर करण्याचा अट्टहास. उपास तापास..कधी कधी वाटतं खरंच गरज आहे का या सगळ्याची?

    ReplyDelete
  3. Chan post. Shevat manala chataka lavoon gela.

    ReplyDelete
  4. Dhanyavad chakali (sorry i couldnt find your name on your blog).
    ashich blog le bhet det raha.:).

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटा...

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...