दहीवाली...

रस्त्यावरुन जाता जाता दिव्यांची रांग बघताना माझ्या मनात लहानपणापासुन मनात साठवुन ठेवलेले सगळे लोकं नकळत येतात...आणि थोड्या वेळाने अगदी नाहिसे होतात...मग पुन्हा कधितरि असेच आठ्वतात, म्हणुन आज त्यांच्याबद्दल लिहावं वाटतंय...काही लोकं उगाच आठ्वणीत राहतात...त्यापैकीच हे काही...
सगळ्यात पहीली आठ्वण ही आमच्या घरी येणार्या दहीवालीची तिला माझा विशेष लोभ होता.मी लहान असतांना आजीकडे रहायचे...पार सहावीपर्यंत.घरात मामा, मावशी, आजी आजोबा आणि मी असे पाच जणं असायचो. वाड्यात आजोबांचे दोन भाऊ आणि त्यांची मुले असे मिळुन आम्ही १५ जणं रहायचो...माझी आई या सगळ्या भावंडात मोठी असल्याने तिचं सगळ्यांच्या आधी लग्नं झालं...आणि मी झाले.घरी सगळ्या मामा मावश्य़ांपेक्षा लहान असल्याने माझे खुप लाड होत.घरात प्रत्येक येणार्या जाणार्याला माझं खुप कौतुक वाटायचं..दिसायलाही गुट्गुटीत होते(आजही आहे) त्यामुळे लोकांना माझा लोभ येणं साहजिकच होतं. अंगणात बरेच लोकं यायचे...दहीवाली, बोरंवाली, केळंवाली वगैरे..
तर..ही दहीवाली जरा म्हातारी होती.तिचं गाव होतं टवेपार..(भंडारा शहराजवळच आहे हे गाव) .ती तिथुन पायी यायची,डोक्यावर टोपलं घेऊन.१ रु ला पावशेर दही द्यायची...तिच्या टोपल्यात खुप सारं तणीस असायचं..आणि दोन मडके...काळ्या रंगाचे...एकात गोड दही आणि एकात आंबट..दही द्यायला ती शेर(माप) वापरायची...मडक्यातुन दही काढायला वापरायची तुटलेली पळी.
आमच्या घराला छपरी होती..ती अंगणात, छ्परीवरच्या कौलांच्या सावलीच्या बाहेर बसायची..आणि मी सावलीच्या आत."रानादेवी आणा तुमची वाटी" असं तिने म्हंटलं की माझी ठरलेली वाटी मी तिच्या समोर करत असे.त्यात साखर टाकुन खाण्यात काही औरच मजा होती ....मग मध्ये मध्ये ती माझ्यासाठी तिच्या शेतातली बोरं, करवंदं, तुरीच्या शॆंगा असा आव्वा पण आणायची....
दही मोजत असतांना मी कितीतरीदा तिला न्याहाळले आहे...
तिच्या हातात कुठ्ल्यातरी धातुचे कडे असायचे ,अगदी टिपीकल....पायात वहाणा...त्या वहाणांना दोन पटटे आणि एक अंगठा..त्यातुन दिसणारी थकलेली पाऊले...तिची उठा बसायची एक विशिष्ट लकब होती...डोक्यावर टोपले ठेवायला ती कापडाची गुंडाळी वापरत असे..अशीच गुडाळी मी कितीतरीदा करुन डोक्यावर ठेवुन पाहिली आहे... टोपलं उतरवतांना आणि चढवतांना तिला कुणाचा तरी आधार लागायचा....माझी उंची कमी असल्याने मी कधिच तिला मदत करु शकत नव्ह्ते...
तिचं ते हिरवं, जाड काठांचं लुगडं, मोठ्या चंदेरी काठाचं पोलकं...डोक्यावरचा पदर सावरण्याची पद्धत...हातातले कडे.. डोक्यावरचं टोपलं...तिच्या नकळत माझ्याशी बरेच काही बोलुन जात असे....
काल परवाच मामा म्हणाला की "दहीवाल्या आजीबाई वारल्या" तेव्हा आठ्वली...""बाई, दही वं" ही तिची दणदणीत हाक...

Comments

  1. खरंच कांही लोकं खरंच आठवणित रहातात अगदी आयुष्यभरासाठी.
    छान वाटलं वाचायला.. माझ्या लहान पणी एक पिसा बाई म्हणुन दहिवाली यायची ... तिची आठवण झाली आज..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

बाहुबली २