Skip to main content

मोठा पाऊस!!!

पाऊस झाला काल चेन्नईत..ऒफ़िस मधुन निघाले आणि मस्त शिरवा आला... पण काय माहीत जरा उदासच वाटत होती स्वारी...पावसाचे थेंब पडत होते गाडीच्या काचेवर पण ते खुप उदास वाटत होते...एरवी हसता खेळता येणारा पाऊस असा उदास पाहुन माझ्या लहानपणीच्या निखळ निरागस पावसाची आठवण आली...अगदी मनापासुन..
आज पाऊस पडत होता पण वेळेचं, वाहतुकीचं, लोकांचं भान असलेली मी अगदी रुक्षपणे त्याच्याकडॆ बघत होते... कदाचित हेच कारण असावं त्याच्या उदास असण्याचं..
लहानपणी अगदी आमच्यातलाच एक वाटणारा पाऊसही आता मोठा झाल्यासारखा वाटला...माझ्यासारखाच..!!
त्यालाही आज भान असल्या सारंखं वाटत होतं लोकांचं, वेळेचं..म्हणून लगेचंच थांबला...लोकांची गैरसोय होतेय हे बहुदा लक्षात आले असावे त्याच्या;)
लहानपणी किती मज्जा असायची नाही पावसाची...कागदाच्या होड्या आणि चिखलात खेळ....घरी आईने केलेले कांदे भजे...आणि टि.व्ही वरील..एखादा आवडता कार्यक्रम...
आता मात्र ए.सी ऒफ़ीस च्या चार भिंती बाहेरचे पावसाचे अस्तित्व...ऒफ़िसातुन सुटल्यावरच जाणवते...याचं एकमेव कारण म्हणजे काचबंद खिडक्या ...
पावसाचं आणि खिडकीचं ही काही नातं असावं कारण जेव्हा जेव्हा हा पाउस बरसतो तेव्हा तेव्हा खिडकी अजुनच आकर्षक वाटायला लागते..आणि खिडकीतुन बघताना...बरसणारा पाउस अजुनच मोहक वाटायला लागतो...
तसंच काहीतरी नातं पाणीपुरी, भजे, तपरीवरचा गरम चहा या मंडळींचं पावसाशी असावं...पाऊस सुरु असतांना यातील एखाद्या तरी गोष्टीचा आस्वाद घ्यावाच नाहीतर अगदी सुने सुने वाटायला लागते...
लहानपणीचा पावसाची भिजलेल्या मातीशी, कागदाच्या होडयांशी..चिखलाशी..आईच्या रागवण्याशी,फ़ारच गटटी होती..
आजकालचा मोठा पाऊस म्हणजे उनाड झालाय...
मातीचे रस्ते...अंगणे..हे सगळे नाहीशेच होत असल्याने मातीच्या सुवासाशी त्याचं काहीच नातं राहीलं नाहीए...
लहान मुलेही आताशा कागदाच्या होड्या वगैरे बनवत नाहीत..त्यामुळे..कागदाच्या होडीची खुप आठ्वण जरी येत असल तरी होडी मात्र त्याच्या भेटीला सहसा येत नाही....
चहाच्या टपरीशी, पाणीपुरीशी आणि भज्यांशी मात्र त्याची मैत्री टिकुन आहे....कधी कधी तो ही आठ्वत असेल...माझ्या सारखेच त्याचे बालपण....!!!!

Comments

  1. मृदुल मावशीJune 10, 2009 at 4:37 AM

    लिखाण आवडले....विशेषतः लहानपणीच्या पावसाचे वर्णन...
    आपण उदास असलो की पावसाचे उदास वाट्णे स्वाभाविक आहे...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक