Skip to main content

जगी सर्व सुखी.....

नु़कतीच एका मराठ्मोळ्या संकेतस्थळावर कुणीतरी लिहिलेली पोळी बद्द्लची व्यथा वाचली,आणि मला "जगी सर्व सुखी असा कोण आहे" हे रामदास स्वामींचे म्हणणे पुन्हा एकदा पटले(नेहमीच मी या त्यांच्या श्लोकाला पडताळुन पाहत असते. कुणीही कुठेतरी "मी खुप सुखी आहे" असं म्हणावं आणि त्यांचं हे म्हणणं थोडंतरी खॊटं ठरावं असा त्यामागचा माझा उद्देश असतो...)

खरंतर पॊळी भाजी वरण भात या पदार्थांनी मला "टाटा" करुन चार महीने झाले..
कुठ्ल्याही नववधुला अगदी लगेचच स्वय़ंपाक करता येणे अशी सासरी फ़ारशी अपेक्षा नसतेच..पण जेव्हा घरात दोघेच असतात तेव्हा मात्र त्या जेवणापायी झोप उडाल्याशिवाय राहत नाही..मग भात करायचा असो...किंवा पोळ्या...

माझेही अगदी असेच झाले...पण पोळीच्या बाबतीत न होता भाताच्या बाबतीत..आहे की नाही गम्मत?
मला भात करता येत नाही असं मुळीच नाही.पण तमिळ कुटुंबात आल्यावर इतक्या सगळ्या वेगवेगळ्या खाण्याच्या पद्धती पाहुन मला जे यायचे ते ही येईनासे झाले...अगदी भातासारख्या भातानेही फितुरि केली अरेरे
प्रत्येक भाज्यांचे वेगवेगळे प्रकार, तीन ते चार प्रकारचा रसम, चार पाच प्रकारचा सांबार, खुप सार्‍या प्रकारचे भात या सगळ्यांनी मी तर हादरुनच गेले होते.वरुन " मला रोज डब्बाच दे, बाहेरचं खाल्लं ना की पोटात गडबड होते" अशी नवरोबाची निर्वाणीची विनंती..बापरे!!

पण आता मैदानात उतरल्यावर माघार घेण्य़ात काहि अर्थ नव्हता....

पहीले तर मला सगळ्या भाज्यांचे प्रकार लक्षात घेणे आवश्यक होते आणि त्यासाठी भाज्यांची नावे.इकडच्या लोकांना विंग्रजी कळतं पण तरीही जरा फ़ील डोळा मारा यावा याकरीता भाज्यांची नावंही शिकावी असं ठरवलं.माझ्या सगळ्य़ात आवडत्या बटाट्यापासुन सुरुवात केली.मराठीत "बटाटा", हिंदीत "आलू" आणि तमिळ मधे ऊर्लकळंगल.बापरे....पहिल्याच बॉलवर गुगली टाकल्यावर फ़लंदाजाची कशी अवस्था होत असेल हे मला लगेचंच कळलं.

एवढ्या गॊंडस भाजीचं असं असुराच्या नावासारखं नाव ऐकुन तर माझे यापुढ्चे सगळेच प्लान बारगळतील असे वाटले पण तरीही मी आपला मराठी बाणा न सोडता मैदानात पाय रोवुन उभे राहण्याचा निर्धार केला.
बटाट्याचं तमिळ नाव खरंच कित्ती सोप्पं आहे अश्या आविर्भावात मी भाजी करायला घेतली.

बटाटे उकडायला कुकरच्या भांड्यात ठेवले,भात वरण करायला तांदुळ आणि डाळ धुवुन घेतले..आणि कुकर लावला.. इतक्यात "तु तांदूळ भिजु नाही घातलेस?कमीत कमी १५-२० मिनीटे तांदूळ भिजत घालत जा म्हणजे चांगले शिजतील.आपण पार बॉईल्ड राईस खातो ना" . इति नवरो... आता हे काय नविन? असे मनातल्या मनात म्हणत मी प्रश्नार्थक चिन्ह घेउन त्याच्यापुढे उभी राहीले.

आजवर कधीच भात लावतांना तांदुळ भिजवले नव्हते आणि तसं केल्याने सकाळच्या घाईचे २० मिनीटे वाया जाणार हा विचार करुनच मला चीड येत होती.पण "आलिया भोगासी.."म्हणुन त्या दिवशी उर्लकळंगल स्मित ची भाजी,थाडा(नं शिजलेला) भात आणि फोडणीचं वरण असं सगळं घेऊन आमची स्वारी ऑफ़िसात धावत पळत पोचली एकदाची...

डब्यात भात हा प्रकार मला तसा जरा नविनच होता.मी आयुष्यात कधी डब्यात भात नेला नाही.पण आता अगदी पर्याय नव्हता.सुरुवातीला दोन तीनदा पोळ्या न्यायचा प्रयत्न करुन मी पोटावर अत्याचार केले.पण नंतर मात्र भातापुढे माझा नाईलाज जाहला...

लंच च्या वेळी मी बटाट्याचं नक्की काय केलं होतं ते कुणालाच कळेना.कुणी म्हणे पोरियल आहे का? कुणी अजुन काही.भात बघुन तर प्रत्येक कलिग जमेल त्या सुचना देऊ लागला.
मला आईच्या हातच्या चिन्नोरच्या पट्कन शिजणार्‍या मऊ मऊ भाताची खुप आठवण आली..डोळ्यात एक दोन थेंबांनी हजेरीही लावली..पण शत्रुवर विजय मिळाल्याखेरिज डोळ्यातुन पाण्याचा टिपुसही येऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा केली असल्यामुळे..पाण्याचे थेंब गालावर नं ओघळताच परत गेले...स्मित

लगेचच एका हिंदी येणार्‍या कलिगला विचारलं "ही पोरियल काय भानगड आहे?" त्याने सुकी भाजी म्हणुन सांगितलं आणि माझ्या भाजीचं रुपडं सुक्या भाजीसारखंच दिसत होतं हे ऐकुन मला थोडं बरं वाटलं.मग त्यानीच डाळ टाकुन केलेल्या भाजीला "कुटू", सुक्या भाजीला "पोरियल" , चिंच टाकुन केलेल्या भाजीला किंवा रस्सा भाजीला "कोळंब" असे म्हणतात अशी माहिती पुरवली.हुश्श!! असं होय...मी केव्हढी घाबरले होते...असं मला मनातल्या मनात वाटले...

मग मी लगेचंच "पोरियल" असं गुगलुन पाहिलं तर काय समस्त तमिळ पाककृतीची संकेतस्थळं हात जोडुन गुगलवर उभी होती....आहा!! अशी ठंडक पडली म्हणून सांगु या दिलात...
मग काय? धडाधड पाककृतीचं प्रिंट आऊट घेउन घरी गेले...

रात्री जनरली मी दोसाच खातो असं म्हणत नवरों..नी माझी विकेटच उडवली.इथे मात्र मी आपले पोळीचे हत्यार वापरले.लगेचच गरमा गरम पोळ्या केल्या आणि सकाळी केलेल्या घॊळाला नलीफ़ाय केले..
पहीलाच दिवस असा गेला हे पाहुन मला रात्री नीट झोपही लागली नाही (भर परिक्षेतही मी रात्री मस्तं झोपा काढल्या आहेत...पण हे प्रकरण जरा भारी होतं;) )

दुसरे दिवशी सकाळी उठुन तांदुळ भिजत घातले....प्रिंट आऊटकडे बघुन टमाटर भाताची तयारी करायला लागले...
२ वाट्या तांदूळ,
२ टमाटर चिरुन त्यांची प्युरी करा वगैरे...तोवर माझा भात लावुन झाला होता..प्युरी करुन झाली आणि बघ्ते तर काय...भात आणि टमाटरची प्युरी एकत्रच शिजवा असं लिहिलं होतं...
अरे देवा!! म्हणजे आजही पुन्हा तसलाच घोळ....अरेरे मग काय...डब्ब्यात काही नं घेताच ऑफ़िसला प्रस्थान करावे लागले...

आता मात्र २ विकेट जाऊन खुपशे रन करायचे अशी अवस्था झाली होती..नवरो..ही "येईल गं हळुहळु" वरुन "मीच करतो उद्याचा स्वयंपाक" वर आला होता.आता मात्र मला खरंच वाईट वाटायला लागले होते.
तिसर्‍या दिवशी नवरो..ने छान पैकी वांग्याची फ़्राय भाजी, भात आणि सांबार केले आणि त्यादिवशीच्या डब्याचा प्रश्न सोडवला. रात्री मात्र मी पोळ्यांची कास अजिबात सोडली नाही.

अश्याप्रकारे हाश्श हुश्श करत एक दोन आठवडॆ गेले.दोन तीन आठवड्यानंतर मी सांबार करायला शिकले..साध्या भाताच्या पलिकडे चुकुनही पाहीले नाही.हळुहळु संकेतस्थळांवरील काही पाककृतीच मी करु शकते हे ध्यानात आले..आणि त्या दृष्टीने मी प्रिंट आऊट्स घ्यायला लागले..

बटाट्यानंतर कुठ्ल्याही भाजीच्या नावाच्या भानगडीत पडायचं नाही ह्याची शपथ घेतली..आणि भाज्यांच्या वेगवेगळ्या नावाचा अर्थ समजुन घेउन त्याला मराठी पदार्थात बसवायचा प्रयत्न केला...जसं कुटू म्हणजे "डाळभाजी", पोरियल म्हणजे सुकी भाजी वगैरे. तेव्हा कुठे आता मी जरा सरावलेय...

कठीण समयी मदतीला धावून येणार्या पॊळीची जागा आता शिष्ठ दोस्याने घेतली आहे...नवरो..नी"आज प्लीज तुझ्या हातच्या पोळ्या कर ना" अशी विनंती केली की च पोळ्या करते..(आपल्या पोळीला विशेष स्थान असावं म्हणुन डोळा मारा )

आज डब्ब्यात मोर कोळंब (कढी सारखं काहीतरी) , वांग्याची भाजी आणि साधा भात आणला होता..
लंच टाईम नंतर नवरो..चा फोन आला..म्हणाला आजचा मेनु एकदम फ़क्कड...पैकी च्या पैकी मार्क..तेव्हा आठ्वला पहिल्या दिवशीचा थाडा भात.आता मात्र डोळ्यात साठ्वुन ठेवलेल्या दोन थेंबांना मी वाट मोकळी करुन दिली.

Comments

  1. मस्त लिहिलंय.. जमलं बरं कां... ! शेवटी भात जमला की नाही ते नाही लिहिलंत?
    एवढा सगळा खटाटॊप करण्यापेक्षा ’ श्रीमंतांना’ पोळी भाजी खायला शिकवा .सोप्पं पडेल ! :) :)

    ReplyDelete
  2. पोळ्यांना तर पर्यायच नाहीए.....
    त्या नसत्या केल्या तर श्रीमंतांना उपाशीच रहावं लागलं असतं..:)
    साधा भात जमतो आता...बाकी प्रकारांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे...

    ReplyDelete
  3. चला...साधा भात तरी जमला एकदाचा...तोच महत्वाचा आहे राजांसाठी...राजांना म्हनाव त्यांची बायको भंडार्याची आहे...इतक्या लवकर हार मानणार नहीं....... :)
    मज्जा आली वाचून रानी... असच छान छान लिहित रहा...

    ReplyDelete
  4. Just Wonderful राणी साहेबा... गुलमोहर नी Page डेकोरेशन खुपच छान केले ... it just beautiful... अरे थांब ! पुढे वाचायचे बाकि आहे...

    ReplyDelete
  5. अगदीच तोंडाला पानी सुटले तुझे स्वयंपाकघर वाचून आणि नववधुची धांदल पाहून!
    मला खुप आवडले, मजा येते वाचताना...

    ReplyDelete
  6. इतके नाना प्रकारचे भात करतात.... पण पोळी बिलकूल नसते. कसे काय जमते?:) मज्जा आली वाचताना. आता तूही चवीने भात खायला व निगुतीने ते करायला शिकली असशील ना?
    पोस्ट छानच.

    ReplyDelete
  7. पोळि असते गं..नाही असे नाही पण इकडल्या वातावरणात पचत नाही..
    भाताचे प्रकार मात्र भरपूर आहेत..कृति टाकेन मी एखाद्या प्रकाराची..(मला तो प्रकार जमला तर ;) )
    प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!

    ReplyDelete
  8. हा हा हा.. मस्त जमला आहे लेख, मज्जा आली वाचुन.. पुढचे ही नविन नविन उद्योग ब्लॉग वर टाकत रहा

    ReplyDelete
  9. After reading ur article I remembered my days in Chennai.I faced the same problem right from language to food.But still I miss Chennai a lot..:-(

    ReplyDelete
  10. बाई गं..चेन्नई हे काही मिस करण्यासारखं प्रकरण नव्हे असंच मी तुला आधी म्हणाले असते पण काहिही झालं तरी माझं सासर आहे ते आता त्यामुळे मिसत जा :) प्रतिसादाकरीता धन्यवाद...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटा...

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...