३ दिवसात जवळपास १००० किमी चा पल्ला गाठत आम्ही चेन्नई ला परतणार होतो. कूर्ग वरून सरळ घरी नं येता, आम्ही केरळ ला जायचे ठरवले. मी १० वर्षांपासून तामिळ नाडू त राहते पण मी आजवर कधी केरळ ला गेले नव्हते. ऐकून आश्चर्य वाटेल पण माझ्या दोन अतिशय खास मैत्रिणी केरळ च्याच आहेत. वेळ यायला लागते कदाचित कुठेही जायची. कूर्ग वरून निघालो ते वटकरा या गावी जायला, आमचे खूप प्रिय मित्र श्रीजीत ह्यांचे तिथे घर आहे आणि अनायासे ते संपूर्ण कुटुंबासकट आपल्या गावी होते. सकाळी लवकर निघायचे ते जरा उशिराच निघालो. ब्रेकफास्ट केला तो कर्नाटकी कोळुकट्टइ (म्हणजे तांदुळाचे मुठिये) आणि छानसा सांबर, बटाट्याची भाजी आणि गरमागरम डोसे, गंगाधरन सरांच्या घरी हा मेनू होता. पद्मा मावशींनी म्हणजे गंगाधरन सरांच्या बायकोनीं सगळी सुंदर व्यवस्था केली होती. ५० वर्षे पद्मा मावशी घराची धुरा साम्भाळतायत. प्लांटेशन्स मध्ये आयुष्य खूप सोपे नसते कधी. कोणी येणार नाही, जाणार नाही, घर आणि एकटेपणा अशी बरीच वर्षे पद्मा मावशींनी गंगाधरन सरांसोबत काढली आहेत, त्यांना आम्ही गेल्याने फारच छान वाटले. त्यांनी केलेल्या कॉफी चा स्वाद अगदी वेगळा होता. निघतांना भरभरून काळीमिरी, विलायची, रोबस्टा कॉफी बीन्स, केळीचे २ मोठाले घड आणि ढेर सारा प्यार पॅक करून दिला. तुम्ही गेल्यावर घर सुनं होईल म्हणाल्या आणि मला एक्दम भरून आले. गंगाधरन सर जरा कामात होते, पटकन त्यांनाही कॉफी फॅक्टरीत भेटलो आणि निघालो. यामहीन्यात ते रिटायर होतायेत, पुन्हा जर कूर्ग ला गेलो तर ते नसणार हा विचार उगाचच मला हुरहूर लावून गेला.
केरळ मध्ये गावाकडचा भाग असा काही नाहीच असे म्हंटले तरी चालेल. आणि नॅशनल हायवे, स्टेट हायवे पण अगदी साधे एक लेन असलेलेच. कूर्ग- इरीटी - कुठूपराम्बा - वडकरा असा रस्ता आहे. केरळ हे अतिशय समृद्ध राज्य आहे. रस्त्याच्या दुतर्फ़ा मोठमोठाले बंगले, त्यांच्या आजूबाजूला नारळाची, रबराची झाडे, नव्हे एक छोटेखानी जंगलंच :). अतिशय नयनरम्य असा प्रदेश. हिरवीगार गर्द झाडी आणि त्यात सुंदर लाकूडकाम केलेली घरे, त्यांच्या बाल्कन्या. १०० किमीच्या रस्त्यात कुठेही शेती किंवा मोकळी जागा दिसली नाही. थंड पण थोडं दमट असे केरळ चे वातावरण होते. मला तर यायचेच होते केरळ ला. श्रीजित अण्णा मुळे यायला मिळाले :) त्या दिवशी माझा वाढदिवस होता. अण्णा आणि त्यांच्या घरच्यांनी बरेच पदार्थ करून ठेवले होते, आणि केकही आणला होता. माझा वाढदिवस एकदम अनोख्या पद्धतीने साजरा झाला यावर्षी :)
रात्र झाली, कोळीकोड गाठायचे ठरले, रस्त्यात छानपैकी पुन्हा जेवलो यावेळी मात्र मी लगेच दहीभात जवळ केला. पण बाकी नॉनव्हेज पब्लिक नि मात्र मीन पोलचिदू ( केळीच्या पानात स्टीम केलेले मासे) आणि लाल राईस वर ताव मारला. कोळीकोड अगदी २० किमी वर होते. एका छानश्या हॉटेल मध्ये बुकिंग केले होते. अगदी हायवे वर इतकी छान राहायची सोय असेल मला खरेच वाटले नव्हते. हॉटेल चं नाव होतं कॉपर फोलीया :)
बंगलो सोडायची वेळ, २ दिवसातच खूप छान वाटून दिले होते मला या जागेने. तिथून काही कलमा घेतल्या, आणि निघालो. हत्तीचं दर्शन काही झालंच नाही ह्या वेळेलाही.
कूर्ग वरून केरळ ला जायला एक रिजर्वड फॉरेस्ट पार करावे लागते. ते पार करतांना दुपारच्या जेवणाची वेळ टळून गेली होती. रस्त्यावर कुठेच काहीच दिसत नव्हते किर्रर्र झाडीशिवाय, एका ठिकाणी थांबलो, पळमपोली आणि चहा वर ताव मारला. केरळ मधला अगदी रस्त्याच्या कडेवरचा चहा सुध्दा फार छान होता. तिथूनच टॅपिओका चे चिप्स घेतले. टॅपिओका च्या चिप्स ची मला खूप प्रिय अशी आठवण आहे. माझी बहीण छकु, एकादशी चा उपास करायची, माझ्याकडे होती तेव्हा. दिवसभर ऑफीस करून आली की मस्तपैकी टॅपिओका चे चिप्स घेऊन यायची. मग चहा, गप्पा आणि हे चिप्स, फार मस्तं दिवस होते ते.
पळमपोली |
चहा |
पदार्थांपैकी मला ऊली पकोडा, एला अडाई फार फार आवडले. अडाई या खाद्यप्रकाराबद्दल मला विशेष प्रेम आहे ते पुन्हा एखादवेळी लिहेन.
सोर्स - गुगल |
सकाळी कोळीकोड चा ब्रेकफास्ट एकदम केरळ स्टाईल होता.
आपम, वाटण्याची करी, आणि चटणी... अगदी स्वर्ग. आपम वर माझं मनापासून प्रेम आहे. अगदी हलका फुलका पदार्थ. डोश्यासारखा ताठ नाही किंवा इडलीसारखा अगदी मऊपण नाही. आपम चं तामिळ आणि केरळ च्या खाद्यप्रकारात एक वेगळं मोलाचं स्थान आहे. नॉन वेज लोकांकरता मटण पाया आणि आपम याची सांगड जिभेच्या चोचल्यांचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. आमच्या इकडच्या स्वारींनी आपम आणि चिकन करी वर मस्तं हात जमवला. पुढचा टप्पा होता पालक्काड. आपल्या विद्या बालन चं पालक्काड. मला खूप आधीपासून ह्या जागेबद्दल अतिशय कुतूहल आहे. कदाचित आमचे पहिले घरमालक पालक्काड चे असल्याने. पालक्काड हे एक खूप शांत शहर आहे. तिथल्या जेवणाबद्दल मी बरेच ऐकून होते. दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती. मस्तपैकी कडल नावाच्या हॉटेल मध्ये थांबलो.
मत्ता राईस म्हणजे लाल भात. थोडे जाडे दाणे असलेला पण अतिशय पौष्टिक असा भात मला खाऊन बघायचा होता. पालक्काड भागाची हा भात म्हणजे खासियत आहे. बाजूला बऱ्याच भाज्यांची एक प्लेट होती. त्यात एक अतिशय इंटरेस्टिंग असा भाग होता. चटणीचे नाव होते संबंधी :) .कदाचित भाताबरोबर बाकीच्या भाज्यांचे संबंध जोडण्याचे काम ही चटणी करत असावी ;)
पोरियल, थीयल, संबंधी, आणि अजून काहीतरी, सांबर, रसम आणि मोर (म्हणजे ताकासहीत)
थोड्यावेळ थांबावे वाटले पण निघायचे होते. घरी परतायचे होते. बस्स आता पुढे ८० किमी वर कोईम्बतूर, सेलम, इरोड, चेन्नई म्हणजे आपल्याच प्रदेशात यायचे होते. तमिळनाडू म्हंजे घर, इथली हवा म्हणजे ओळखीची.. कोईम्बतूर गाठले.. आणि रस्त्यात मस्तपैकी अपने गांव की कॉफी प्यायलो.
पाण्याचा बंब :) आणि डीकॉशन |
रात्रीचे आठ वाजले होते, सेलम हायवे वर गाडीचा टायर फुटला, कोणालाही इजा झाली नाही पण एक वेगळा अनुभव होता हा. गाडीची स्टेपनी लावून, टायरच्या दुकानात आणून बदलेस्तोवर आम्ही रात्रीचे जेवण उरकले. सेलम मध्ये मस्तपैकी डोसा हाणला. पुढचा प्रवास कठीण होता कारण ऊलुंधूरपेट्टई पर्यंत एक लेन हायवे होता, ड्रायवर म्हणजे आमचे खलील अंकल जरा थकले होते. गप्पा सुरु केल्या जुन्या आणि बघता बघता चेंगलपेट ला आलो. एक मस्तपैकी कॉफी घेतली रात्री एक वाजता. That one was for the road and the fabulous journey of three states.
Comments
Post a Comment