मुरुक्कू म्हणजे तांदळाच्या पिठाची केलेली चकली. हा माझ्या घरातल्या सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. थोडक्यात थोडे कुरुम कुरुम काहीही आवडणारे माझ्या घरचे गडी आहेत त्यात मग पापड, चिप्स, मुरुक्कू, अगदी फरसाणही चालून जातं. जेवतांना रोज पापड हवाच असा हट्ट आमच्याकडे रोज असतो आणि तो पूर्ण करावाच लागतो. तर दिंटीकल वरून येतांना असेच एक मुरुक्कू चे गाव लागले त्याचे नाव "माणप्पारै ". इथले मुरुक्कू फारच फेमस आहेत म्हणून रस्त्याच्या कडेला थांबलो एका दुकानात. तिथे जवळपास १० प्रकारचे वेगवेगळे मुरुक्कू होते.एवढ्या प्रकारचे मुरुक्कू मी पहिल्यांदाच बघत होते. चकल्या जश्या आपण घरी करतो तसे मुरुक्कू ही करतात पण खूप वेळ लागतो आणि आजकाल सगळे दुकानात मिळत असल्याने दिवाळीशिवाय कुणी मुरुक्कू करायला धजत नाही. तर माणप्पारै या गावी हे मुरुक्कू अगदी स्वस्त, तेलविरहित मिळतात. माणप्पारै बऱ्यापैकी कावेरी नदीच्या तीरावर वसलेलं आहे. हे मुरुक्कू तांदळाचे केलेले असतात. तिथे पिकणारा तांदूळ आणि पिढ्यानपिढ्या मुरुक्कू करणारे कारागार हे तंत्र जुळले आहे त्यामुळेही ह्या पदार्थाला एक वेगळी चव असते. दुकानात पुदिना मुरुक्कू, वेल्ला (पांढरे) मुरुक्कू, रागी मुरुक्कू, कारम (तिखट) मुरुक्कू, अच्चपम (केरळ कडला पदार्थ) आणि बऱ्याच प्रकारचे मुरुक्कू रचून ठेवले होते. फ्रेशनेस ची हमी बाजूला बसलेल्या आणि भर दुपारी मुरुक्कू तळणाऱ्या मावशींना बघून लगेच मिळाली. दुपारच्या जेवणानंतर ३-४ तासांनी स्नॅक म्हणून मुरुक्कू खायला मजा येते सोबत छानपैकी फिल्टर कॉफी.
|
मुरुक्कू करतांना |
|
तिखट मुरुक्कू, रागी मुरुक्कू आणि पुदिना मुरुक्कू |
|
अच्चपम |
|
मुरुक्कू मावशी - तळून झाल्यावर हे मुरुक्कू वेताच्या बास्केट मध्ये टाकतात आणि लगेच पॅक करतात.
|
|
साधे मुरुक्कू
|
वर्षोनुवर्षे तिरुचिरापल्ली च्या जवळ असणाऱ्या माणप्पारै या गावात आता बऱ्यापैकी ऑटोमेशन येऊन ठेपलं आहे आणि जवळपास १५० युनिट्स आहेत मुरुक्कू बनवायचे. प्रत्येक दुकानात जवळपास १२-१३ बायका आणि माणसें असतात काम करायला. माणप्पारै चे पाणीच या मुरुक्कूच्या उत्कृष्ट चवीचे कारण आहे असे बऱ्याच दुकानाचे मालक सांगतात, असेलही कदाचित कारण मी इतके छान मुरुक्कू कधीच खाल्ले नव्हते.
मुरुक्कू सोबत नन्नारी (खस) सरबत खूप छान लागते, एवढ्या उन्हात कॉफी पिण्यापेक्षा छानपैकी नन्नारी सरबत प्यायलो आणि श्रीरंगम ला निघालो, श्रीरंगनाथन पेरुमाल यांच्या मंदिराकडे.
रेफ: http://www.thehindu.com/news/cities/Tiruchirapalli/%E2%80%98Manapparai-murukku%E2%80%99-still-in-great-demand/article16436372.ece
Comments
Post a Comment