Skip to main content

साहेबाचा बंगला आणि चिरतरुण कॉफी



होसूर - कूर्ग 
गुलमोहर 
खूप सुंदर असा रस्ता, आजूबाजूला गुलमोहराची झाडे, तेवढ्या गर्मीत आणि उन्हात दिमाखात आपली सुंदर लाल फुले घेऊन उभी असलेली. मजल दरमजल करत आणि वाट चुकत चुकत आम्ही कूर्ग ला पोचलो. खरेतर कूर्ग ला गेलोच नाही, कूर्ग ला बायपास करून टाटा ची कोटाबेट्टा कॉफी इस्टेट आहे, तिकडे निघालो. जसे जसे उंचावर जात होतो तसे तसे थंड वाटत होते. उंचावर येता येता गुलमोहराची साथ केव्हा सुटली कळालेच नाही. आजूबाजूला कॉफी ची झाडे आणि अधून मधून एखादे काळीमिरीच्या वेलाच्या मिठीत असल्यासारखे सिल्वर ओक चे झाड.  बस विराजपेट पासून सुरु झालेले हे कॉफी चे जंगल अगदी परतीच्या प्रवासात सुध्दा बहुतांशी सोबत होते. दुपारच्या टळटळत्या उन्हात सुध्दा ही झाडे एकदम छान टवटवीत दिसत होती. 


मन कसं असतं नं? थोडं काही नवीन दिसलं कि रमलं तिथेच. पण कॉफी इस्टेट मला काही नवीन नव्हती. मला फक्त पुन्हा पहिल्यासारखा आस्वाद घ्यायचा होता, ह्या सुंदर कॉफी आणि चहा नि लगडलेल्या भव्य डोंगरांचा.. त्यांची युगायुगांपासून सुरु असलेली साधना मला पुन्हा अनुभवायची होती. ह्या डोंगरांचा सतत सुरु असलेला "सोहम" चा जप मला ऐकायचा होता. आपण खूप दिवस कुणाला भेटायचं भेटायचं असं ठरवतो आणि मग अगदी अनायासे जशी भेट होते तसे काहीसे झाले माझे. 


इस्टेट मधली छोटी वाट
कोट्टाबेट्टा ही टाटा कॉफी ची  ७५-८० वर्षे जुनी कॉफी इस्टेट. प्रत्येक इस्टेट ला एक मोठा बंगला, तिथे येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी असे काहीसे पुष्कळश्या इस्टेट चे समीकरण असते. ही बंगल्यासारखी मोठाली घरे इंग्रजांनी बांधलेली आहेत मुळात. आपल्या भारतीय लोकांनीच त्याकरता कष्ट घेतले हे सांगणे नं लगे. पण साहेबाची चाणाक्षं दृष्टी मात्र वाखाणण्यासारखी आहे. प्रत्येक बंगल्याचे ठिकाण खूपच अभ्यास करून निवडले आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यातले सामान एकदम आर्टिस्टिक पद्धतीने तयार करून, बंगल्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सजवलेले आहे. ७ तासाचा प्रवास करून आम्ही जेव्हा ह्या इस्टेट मध्ये गेलो, मन गारेगार झाले. सुंदर बंगला, त्यातले सुंदर इंटिरियर आणि प्रत्येक हाकेला हजर होणारा  अतिशय कार्यक्षम आणि हॉस्पिटेबल नोकरदार वर्ग. सुट्टी म्हणजे अजून काय असते? ;) 
कोट्टाबेट्टा बंगलो 

बाहेरची बैठक 

आमची रूम 

२०० वर्षांपूर्वीचा डायनिंग टेबल
पोचल्या पोचल्या छानपैकी जेवण आधीच तयार ठेवले होते. पु.लं च्या अपूर्वाई पुस्तकात इंग्रजांच्या सवयी, खानपान याबद्दल अतिशय सुंदर वर्णने आहेत. नुकतंच अपूर्वाई वाचलं होतं, त्यात साहेबाला सगळ्यांसोबत जेवायला कसे आवडते आणि बुफे पद्धत याबाबतीतलं विश्लेषण मला बंगल्यातील खाण्याची तयारी बघून लगेच आठवले. 
२०० वर्षांपूर्वी चा १५ जण बसू शकतील असा डायनिंग टेबल बंगल्याच्या हॉल मध्ये होता. बाजूलाच छोटा गोल डायनिंग टेबल, जवळपास ४ लोक जेवू शकतील असा. एकाच डायनींग हॉल मध्ये जवळपास २० जणांची सोय होऊ शकेल अशी सुंदर व्यवस्था केली होती.  पाण्याचे ग्लास आणि पाणी भरून ठेवलेल्या काचेच्या बॉटल्स अगदी शिताफीने थोड्या उंच कॉर्नर टेबल वर ठेवल्या होत्या जेणेकरून छोट्या मंडळींचे हात लागू नये.  प्रत्येक खिडकीजवळ एखादे सुंदर इनडोअर प्लांट, आणि छानशी खुर्ची ठेवली होती, हे सगळे अतिशय सुटसुटीत असल्याने एकदम रीलॅक्स्ड फील येत होता. सगळ्यात सुंदर पडदे आणि अपहोलस्टरी. मजा आली बुवा बघून. 


जेवण तामिळ पध्धतीचं सुटसुटीत होतं. कर्नाटक मध्ये असलो तरी कोटबेट्टा ला बरीच तामिळ छाप आहे, कारण सगळे काम करणारे अगदी अस्खलित तामिळ बोलणारे होते. तेवढाच काय घरचा फील अगदीच होमसिक व्हायला नको म्हणून.


फायरप्लेस आणि दिवाणखाना

बाहेंरची बैठक 

कॉफी प्लांटेशन्सना चिरतारुण्याचं वरदान आहे असे मला नेहेमी वाटते. एक तर कॉफीची झाडे कधीच खूप लठ्ठ दिसत नाहीत, नाजूक अशी सुंदरच दिसतात, सगळे बंगले कितीही जुने असले तरी त्यांचा अजून बालपण आहे असेच मला सतत वाटत राहिले आहे गेली  कित्येक वर्षे. म्हणूनही कदाचित आमचे सुह्रुद गंगाधरन  सरही मला अजून तरुण वाटतात. ते ७२ वर्षाचे आहेत आणि आम्ही त्यांना गेल्या १० वर्षांपासून ओळखतो. कूर्ग म्हणजे गंगाधरन सर असेच समीकरण आहे माझ्यामनात गेल्या १० वर्षांपासून. गेल्या गेल्या त्यांना भेटायची मला खूप उत्सुकता होती. गंगाधरन सर बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन चे स्पेशल ऑफिसर आहेत, गेल्या ५० वर्षांपासून त्यांनी कॉफी इस्टेट जगली आहे खऱ्या अर्थाने. प्रत्येक झाड, प्रत्येक रोपाशी त्यांचा संवाद होत असावा, म्हणून कदाचित त्यांना प्रत्येक झाडाचे नाव, त्याचे उपयोग तोंडी माहिती आहेत. सततचे काम, त्यात ९०% चालणे ह्यामुळे ७२ वर्षाचे असूनही ते अगदी ५० वर्षाचे दिसतात, वागतात आणि बोलतातही. 
पहिल्या दिवशी भेटावे म्हणून गेलो तर रस्ता विसरलो.संध्याकाळी ५. ०० वाजेनंतर कॉफी इस्टेट मध्ये रस्त्यावर राहणे अतिशय धोक्याचे असते. त्याचे कारण म्हणजे जंगली हत्तीचा सर्वत्र मुक्त संचार :) हो खरेच आहे जंगली हत्ती आणि त्यांच्या धुमाकुळानें कॉफी इस्टेट अगदी घाबरून आहे. खूप उशीर झाल्याने रस्त्यावरच गंगाधरन सरांना भेटलो आणि तसेच परत आलो. आजूबाजूला किर्रर्र झाडी, जंगल आणि हत्ती कुठे दिसतात का ह्याचे कुतूहल.. 
सगळीकडे असे बोर्डस लावले आहेत इस्टेट मधेही आणि बाहेरही 

व्हरांडा आणि बैठक रात्र 
बंगल्यावर आलो तेव्हा एकदम लोकल जेवण तयार होतें. त्यावर ताव मारला आणि दुसर्या दिवशी कुठे जायचे याची आखणी करून घेतली. 
मला वाट होती ती सकाळची.कॉफी प्लांटेशन्स सकाळी अतिशय सुंदर दिसतात.  लवकर निजानीज केली आणि सकाळी अतिशय नयनरम्य सूर्योदय बघायला मिळाला ते हीं आमच्या रूमच्या बाल्कनीतून. 
सूर्यनारायण 

नुकताच झोपेतून उठलेला बंगल्यातील रस्ता  

कोवळं उन्हं 
सकाळी उठून कॉफीचा आस्वाद घेतला... सोहम चा जप सुरूच असतो ह्या डोंगरांचा सतत, तो ऐकायला सहसा येत नाही. आपल्या मनातला कलह इतका जास्त असतो की हे सगळं ऐकू येणे माझ्यासारख्या अतिशय सामान्य माणसाला नाही शक्य तरीही मी नेहेमी प्रयत्न मात्र करते. आणि बहुतांशी मन शांत असलं की लोकांच्या मनातलही ऐकू येते म्हणतात. मी आपली लवकर उठले आणि नुकत्याच जाग्या झालेल्या झाडांशी जरा हितगुज केले. बरीच झाडे होती,
माझ्या आजीच्या जुन्या घरी जी झाडे  होती त्यातली ३ झाडे मला आढळली. लहानपणी ह्या झाडांबद्दल मला फार वाटे. पिवळ्या फुलांचे झाड, निळ्या फुलांचे आणि लाल पाने असलेलें एक झाड. आजीचे घर पडले आणि सगळी झाडे त्यात गेली. नंतर जवळपास २० वर्षांनी मला हि सगळी झाडे भेटली तेव्हा कोण आनंद झाला म्हणून सांगू. 
तामिळ मधले कनकाबरम सारखे पण वेगळे फुल 

 आजीकडल्यासारख्या ब्लू बेल्स
आजचा दिवस प्लांटेशन्स मध्ये जाणार होता. नेचर ट्रेल आणि बायलाकुप्पे ची बुद्धिस्ट मोनॅस्त्री असा प्रोग्रॅम होता. प्लांटेशन्स मध्ये फिरताना आपणच आपल्याला पुन्हा भेटत असतो. माझी स्वतःशी तर भेट तिथे झालीच, शिवाय बरेच काही भरभरून घेऊन आम्ही प्लांटेशन्स मधून परतलो.


Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक