दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती - सुंडलचेन्नई तिरुचिरापल्ली हायवे वर ९९ नावाचे एक हॉटेल आहे.परवा दिंटिकल ला जातांना तिथे थांबलो. ऐन छोट्या भुकेची वेळ. कॉफी पण प्यायची होती. नेहेमी ग्रँड स्वीट्स किंवा अड्यार आनंद भवन मध्ये मिळणारी खाण्याची वस्तू, अशी हायवे वरच्या हॉटेलात मिळेल असे वाटलेही नव्हते. पण मस्तपैकी शेंगदाण्याचे सुंडल (साधेच), केळफुलाचे वडे, आणि कॉफी चा आस्वाद घेतला. 
वेरकडलाई सुंडल 

सुंडल हा प्रकार अतिशय सोपा, वेळेनुरूप आहे असे मला नेहेमी वाटते. ४-५ वाजता पोटात कावळे ओरडायला लागतात, तेव्हा अगदी खूप जास्त नाही आणि कमीही नाही असे "काहीतरी" खायला हवे असते. असेच काहीतरी म्हणजे सुंडल.
चणे, शेंगदाणे, चवळी, हिरवे मूग, राजमा, कुळीथ असे कुठलेही कडधान्य सुंडल मध्ये वापरता येते. अगदी साधी सोपी पद्धत आहे सुंडल करण्याची, लक्षात ठेवून कुठलेही कडधान्य आदल्या रात्री भिजत घालावीत, सकाळी त्यातून पाणी निथळू द्यावे , एका सुती कापडात बांधून ठेवावे. मूग, मोट आणि मोड येणारी कडधान्ये थोडी एक दिवस जास्त बांधून ठेवायला लागतात. पण काळे चणे, काबुली चणे, राजमा, चवळी, शेंगदाणे वगैरे ला रात्री भिजवून छानपैकी उकळून घेतले की ही मंडळी सुंडल साठी सज्ज असते. बहुतेक दाक्षिणात्य पदार्थांची पूर्व तयारी करावी लागते, त्यात सुंडल चा पण अपवाद नाही. 
केळफुलाचे वडे, सुंडल आणि फिल्टर कापी 
उकळून घेतल्यावर पाणी निथळले की एका कढईत तेलाची फोडणी करावी, त्यात मोहरी, चण्याची डाळ, आणि उडीद डाळ एक चमचाभर घालावी. मोहरीची तडतड झाली, की लाल मिरची आणि हिंग टाकावा, हळद थोडीशी टाकावी आणि वरून मस्तपैकी कढीलिंबाची पाने तोडून टाकावी. एव्हाना फोडणीचा दाक्षिणात्य वास यायला लागेल, आता त्यात सुंडल पूर्व कडधान्य लोटावे. परतून घ्यावे आणि वरून थोडे मीठ टाकावे. जोवर सुंडल वर छानपैकी ओल्या नारळाचा किस टाकत नाही तोवर त्याचा दाक्षिणात्य पणा सिद्ध होत नाही. :) असे सुंडल छानपैकी कॉफी सोबत संध्याकाळी खायला घ्यावे आणि स्वर्गानुभव घ्यावा. 
हा पदार्थ संध्याकाळच्या एखाद्या झटपट पार्टीत एकदम छान असतो. स्टार्टर म्हणून तर सुंडल नक्की असावे. कडधान्ये पचायला जड असली तरी आपण त्यांना आधी भिजऊन ठेवतो आहोत आणि नंतर छानपैकी फोडणी घालतो आहोत हे महत्वाचे. हिंगामुळे पचनाला मदत होते, तर कढीपत्त्याने पदार्थाची चव वाढते. 
दाक्षिणात्य मंदिरांमध्ये सुंडल प्रसादाकरता तयार करतात. बहुदा शनिवारी व्यंकटेशाच्या मंदिरांमध्ये सुंडल प्रसादाला असतं. पानाच्या द्रोणात सुंडल खातांना त्याची विशेष चव लागते. नवरात्रीत तर ज्या घरी नवरात्री साजरा करतात त्यांच्याकडे ९ ही दिवस संध्याकाळी सुंडल, प्रसाद म्हणून ठेवतात. 
इति श्री स्कन्दपुराणे रेवाखंडे सुंडलोध्याय: संपुर्णम! श्री व्यंकटेशार्पणमस्तु :) 

Comments

Popular posts from this blog

अविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

बाहुबली २