माणूस मोठा जरी झाला नं, तरी त्याला लहानपणी दिलेले संस्कार आणि अजून काही त्याला आवडलेल्या गोष्टी कधीच सोडू शकत नाही. बस्स थोडा वेळ मिळावा आणि राहून गेलेल्या आवडत्या गोष्टी, छंद जोपासण्याची संधी मिळावी. आजकालच्या धकाधकीच्या काळात मी छंद जोपासण्याला कोपिंग मेकॅनिसम म्हणते. हल्ली बऱ्याच गोष्टीला मी रिलेट करू शकत नाही. जसे व्हाट्स अँप, फेसबुक, आजूबाजूचे अगदी बदललेले सतत धावणारे जग. लहानपणी हे असे नव्हते, साधे सोपे आणि सरळ होते असं मला वाटतं. तेवढा वेळ पुन्हा मागे जाऊन येणे शक्य नाही हे ही माहिती आहे, पण मनाला तेवढी शांतता देता यावी ह्या उद्देशाने मी कथक शिकायला सुरु केलं. खरंतर अजून ३ वर्षे थांबली असती तर कदाचित कृष्णवी सोबतच शिकता आलं असतं. पण आपण आधी शिकावे म्हणजे तिला जरा सांगता येईल असे वाटले.
चेन्नई म्हणजे भरतनाट्यम, भरतनाट्यम म्हणजे चेन्नई असं समिकरण वर्षानुवर्षे घट्ट बसलेलं आहे. मार्गळी महिना पूर्ण भरतनाट्यम चे चेन्नईत मोठे प्रोग्रॅम्स होत असतात. म्युसिक अकॅडेमी, नारद गान सभा, कृष्ण गान सभा, मैलापुर फाईन आर्ट्स क्लब, अश्या मोठ्या आणि नामवंत हॉल्स मध्ये मोठे मोठे कलाकार परफॉर्म करत असतात. एकूण चेन्नई म्हणजे तामिळ नाडू ची सांस्कृतिक राजधानीच म्हणता येईल. भरतनाट्यम आणि दाक्षिणात्य संगीत ह्याची आणि माझी काही गट्टी जमेना. भाषा येणे सोपे आहे पण सगळ्या क्लासिकल प्रकाराशी रिलेट करणे मला फार कठीण होते. सा, रे, ग,मं ला सा, री, गा, मा म्हणणे म्हणजे फारच कठीण असे वाटे. भरतनाट्यम शिकण्याचे काही विशेष वर्ष असतात. लहानपणी ५-७ वय हे एकदम परफेक्ट असतं. इथे जरीही एका रस्त्यावर २ असे भरतनाट्यम च्या शिकवण्या असल्या तरी माझे मन काही धजेना.
शोधला तर देवही सापडतो असे म्हणतात. माझं शोधकार्य सुरूच होतं की काय करता येईल? अचानक एक दिवस देवानिया या कथक क्लास चा पत्ता मिळाला. देवानिया च्या फाउंडर, श्रीमती जिज्ञासा गिरी, या चेन्नईत गेल्या १३ वर्षांपासून कथक चे क्लास्सेस घेतायेत. भरतनाट्यम च्या बालेकिल्ल्यात कथक ह्या अतिशय उत्तर भारतीय प्रकाराला शिकवण्याचे काम हातात घ्यायला भारी हिम्मत लागते. ९ मुलींपासून सुरु केलेला हा क्लास आता १७२ विद्यार्थ्यांचा आहे. त्यात वेगवेगळ्या वयाची मुले, वेगवेगळ्या वयाच्या मुली, मध्यवयीन बायका एवढेच नव्हे तर ७२ वर्ष्यांच्या आजी सुद्धा आहेत.
यथो हस्ता तथो दृष्टी
यथो दृष्टी तथो मन: ।
यथो मन: तथो भाव:
यथो भाव: तथो रस:।
या श्लोकाने आमच्या क्लास ची सुरुवात झाली.
तटकार, चक्कर, झुमर, लडी हळूहळू एकेक प्रकार शिकत पाहता पाहता २. ५ वर्षे झाली आणि वार्षिक कथक महोत्सव अगदी जवळ येऊन ठेपला. ४ - ४ तासाच्या रिहर्सल्स, त्यात कपड्याचे माप देणे, शिवायला टाकणे, वगैरे कामांनी मला एकदम ग्रासले. खरंतर खूप मजाही येत होती. लहानपणी स्टेज वर परफॉर्म करतांना मावशीच सगळं करून द्यायची. आता सगळे स्वतः करायला लागत होते. कृष्णवी फारच खुश होती. आई स्टेज वर असणार हे तिला खूपच नवीन होतं. करत करत आमची इकडची स्वारीही माझ्या कथक क्लास ला जरा मनावर घायला लागली. स्टेज रिहर्सल चा दिवस येऊन ठेपला. नेमका मॅरेथॉन च्याच दिवशी माझी स्टेज रिहर्सल होती. कर्म कठीण काम. कारण १० किमी धावून आल्यावर, पुन्हा स्टेज रिहर्सल कशी करणार हा एक खूप मोठा प्रश्न होता. आधीच प्लॅन केल्याने फार त्रास गेला नाही. याकरता माझ्या बुलेट जर्नल ला शतशः धन्यवाद. पुन्हा लिहिनच बुलेट जर्नल बद्दल.
स्टेज रिहर्सल म्हणजे खूपच छान अनुभव. बऱ्याच गोष्टी आपण किती मिस करत असतो ह्याची जाणीव मला त्या दिवशी झाली. कलेची साधना करणे काही सोपी काम नव्हे. जे लोक करतात त्यांना शतशः नमन. कारण आपल्या रोजच्या रागाड्यातून बाहेर येऊन तो जो ऍड्रेनॅलीन रश असतो तो फील करणे काय असते हे मला त्या दिवशी कळले. नारद गान सभा हे खूप उच्च प्रतीचे स्थान आहे, तिथे एम एस सुब्बुलक्ष्मी सारख्या दिग्गज लोकांनी परफॉर्म केले आहे. ती जागा म्हणजे मंदिर असे वाटून गेले. स्टेज रिहर्सल छान पार पडली आता बस्स वाट होती प्रोग्रॅम ची.
१६ जानेवारी ला प्रोग्रॅम होता, मावशी माझ्या प्रोग्रॅम साठी भंडार्याहून आली. तिनेच माझ्यात हे कथक चं बीज रोवलं होतं. काही खूप मोठे नाही पण थोडेसे काही करता यावे ही इच्छा परमेश्वराने पूर्ण केली. मनमोहना हे आमच्या प्रोग्रॅम चं नाव. अतिशय सुंदर रित्या प्रोग्रॅम पार पडला. मला परफॉर्म करतांना काय वाटले हे अगदी शब्दातीत आहे.
It was an out of the world experience.
Comments
Post a Comment