रोडट्रीप:
चेन्नई - आंबूर
हे वर्ष अतिशय व्यस्त असे काही सुरु झाले, जानेवारी मध्ये माझा कथक चा प्रोग्रॅम होता त्याची प्रॅक्टिस, मग मॅरेथॉन पोस्टपोन होत होत अगदी प्रोग्रॅम च्या आजू बाजूलाच ठरली होती.. हे सगळे होते ना होते तेच माझ्या नणंदेचं लग्न आणि नंतर माझ्या बहिणीची डिलिव्हरी. डिलिव्हरी नुकतीच संपते आणि ती थोडी सेटल होते ना होते तोवर आमचे शिफ्टिंग चे सुरु झाले.. त्यात जवळपास १ आठवडा गेला. मी आणि कृष्णवी दोघींनी ठरवलेच होते की जश्या सुट्ट्या लागल्या तसे कुठेतरी जायचेच. कदाचित हीच अगदी बरोबर वेळ होती बाहेर निघायची आणि थोडा आराम करायची. एका दिवसात प्रोग्रॅम ठरला आणि आम्ही निघालो रोडट्रीप ला. पहिली रोड ट्रिप! दरवर्षी कृष्णवी लहान म्हणून आम्ही जवळच्या ठिकाणी जाऊन परत येत असू. पण ह्यावेळी तिनेच आग्रह धरला की बाबा दूर जाऊया. आम्ही दोघेही जीआयएस प्रोफेशनल्स असल्याने एक १० वर्षांपूर्वी कॉफ़ी, चहा एस्टेट्स चा सर्वे केला होता, आणि कूर्ग हे ठिकाण तेव्हा आम्हाला फार आवडलं होतं. विशेष म्हणजे तेव्हा तिथे राहण्याचा बंदोबस्त एका ब्रिटिशकालीन बंगल्यात केला होता. २०१० मधेही गेलो होतो कूर्ग ला पण ती ट्रिप मडिकेरी, थंलकावेरी वगैरे प्रेक्षणीय स्थळे बघण्यात गेली. काही नं ठरवता निघण्यात फार मजा असते, यावेळी एवढंच माहिती होते की कूर्ग ला जायचे..
पहिला स्टॉप ओव्हर होता होसूर..
पण खूप उशीरा निघाल्याने आंबुर ला थांबलो.. आंबूर बिर्याणी साठी अतिशय प्रसिद्ध आहे. आंबूर ची जिरगसंबा तांदुळाची केलेली बिर्याणी म्हणजे बिर्याणी प्रेमींसाठी पर्वणी. कृष्णवी आणि तिचे बाबा या दोघांनाही बिर्याणी म्हणजे जीव की प्राण. पण आंबूर ला पोचेस्तोवर ११. ३० वाजून गेले होते.. स्टार बिर्याणी हे हायवे वरचे रेस्टॉरंट आहे, आम्ही रात्री पोहोचलो म्हणून थोडेच लोक होते, पण एरवी खूप गर्दी असते .
स्टार बिर्याणी |
दुकानदाराने जरा कुणकुण करतंच बिर्याणी च्या ऑर्डर्स घेतल्या. मी नॉन व्हेज खात नसल्याने मला त्या हॉटेल च्या वातावरणाखेरीज काहीच बघण्यासारखे नव्हते :( पण...
हॉटेल च्या अगदी बाजूलाच लेदर च्या बॅग्स, जोडे, चपला आणि बाकी वस्तूंची २ दुकाने होती. विशेष म्हणजे अश्या बॅग्स मी मुंबई आणि पुण्याव्यतिरिक्त कुठे बघितल्या नव्हत्या. जाऊन बघितले तर मी एकदम उडालेच. मलबेरी, जिमी चू, अश्या नामवंत कंपनीस च्या बॅग्स अगदी परवडेबल किमतीत विकायला होत्या. मला फार आश्चर्य वाटले, कारण नुकतीच कोणीतरी मलबेरी ची बॅग १.५ लाखाला घेतली असे ऐकले होते ती ही चायना वरून आणलेली. १. ५ लाख एखाद्या पर्स साठी म्हणजे काहींच्या काहीच असे माझे प्रामाणिक मत आहे. असावी एखादी छान बॅग पण एवढी महाग...मग इथे मलबेरी पाहून मला खुप अप्रूप वाटले. दुकानदार हिंदी भाषिक होते, ते म्हणाले की जगभरात असलेले मोठे मोठे ब्रॅण्ड्स इथूनच लेदर घेऊन जातात आणि काही काही इथूनच बॅग्स बनवून घेऊन जातात. मलबेरी, जिमी चू हे त्यातले एक. आंबूर ला लेदर फॅक्टरीस आहेत. पुर्वी चेन्नई च्या क्रोम्पेट या जागी लेदर च्या फॅक्टरीस होत्या ज्या राणीपेट आणि आंबूर अश्या ठिकाणी हलवल्या गेल्या. माझ्या बहिणीच्या सासऱयांचा लेदर च्या केमिकल्स चा बिसिनेस आहे आणि त्यांची आंबूरलाच फॅक्टरी आहे हे ही मला त्याच दिवशी कळाले ;)
आपल्या देशातून बहुतेक सगळ्या देशांना लेदर चा पुरवठा होतो आणि आपण ब्रँड च्या मागे हजारो रुपये त्यामागे खर्च करतो. गो ग्लोबल थिंक लोकल ही संकल्पना अमलात आणायला हवी हे प्रकर्षाने जाणवले. आंबुर वरून होसूर ला येईस्तोवर पहाट झाली होती, होसूर मध्ये सकाळचा ब्रेकफास्ट एक्दम तामिळ पद्धतीचा होता. आमच्या डोसा प्रिय जनतेचे पोट आणि मन भरल्यावर तिथून पुढची मजल गाठायचे ठरले. पुढील मजल होती, मांड्या, चेन्नपटना आणि म्हैसूर...म्हैसूर ला थांबलो नाही, बायपास केले, पण मांड्या, चेन्न पटना हा भाग अतिशय सुंदर आहे .
होसूर मधले claresta हॉटेल |
मांड्या या शहराच्या रस्त्यावरची झाडे |
रस्त्यावरच्या हिरव्यागार वृक्षांनी मला प्रसन्न तर वाटलेच पण कर्नाटक शासनाने प्रत्येक वृक्ष जपून रस्ते आणि बाकीचे बांधकाम केले आहे ह्याचे पण कौतुक वाटले.
Comments
Post a Comment