शबरीमलय!

विजयादशमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

दक्षिण भारतात आल्यापासुन प्रत्येक चालीरीतींबद्दल दिसागणिक माझं निरीक्षण सुरु आहे अर्थात पहीलेही होतंच पण आता थोडं जास्तं..त्यानुसार इथल्या काही प्रचलित चालीरीतींबद्दल या आणि पुढील लेखांत लिहीणार आहे.

१० दिवसांपूर्वी "इकडली स्वारी" शबरीमलय ला जाऊन आली. लग्नाआधी जेव्हा पहिल्यांदा शाम म्हणाला की मी शबरीमलय ला जाणार आहे तेव्हा मला तो एक्दम काळ्या वेष्टीत खुप सार्या माळा घातलेल्या अवतारात दिसला आणि मी घाबरुन लगेच त्याला नको जाउ असं म्हणाले. शबरीमला ला जाणारी मी पाहीलेली सगळीच पब्लिक काळ्या लुंग्या घालुन अनवणी पायानेच असायची..त्यांचा तो अवतार बघुन हे अय्यप्पा स्वामी म्हणजे काही सोपं प्रकरण नव्हे असं वाटायचं मला.

पण शाम म्हणाला की काळे कपडे घालायची गरज नाही, भगव्या रंगाचं धोतर घालु शकतो आणि कार्यालयात जातांना नेहमीचे कपडॆ आणि अनवाणी न राहता बुट घालता येतॊ. कुठल्याही नेमात अश्या प्रकारे बदल माझ्यासाठी सुखावह होता.

शबरीमलय ला सहसा समुहाने जातात. त्या समुहाच्या म्होरक्याला "गुरुस्वामी" असे म्हणतात. जे पहील्यांदा जातायत त्यांना "कण्णीसामी" (छोटु स्वामी) म्हणतात. सलग तिसर्या वेळी जाणार्याला "मणिकंठन" असे म्हणतात. ज्या तारखेला जायचे ठरते त्या तारखेच्या १५ दिवस किंवा ४२ दिवस आधी गुरुस्वामी सगळ्या इतर स्वामींना रुद्राक्षाची माळ घालतात. त्या दिवसानंतर स्वामी लोकांनी ब्रम्हचर्याचे पालन करणे अपेक्षित असते. त्यांनी घरी शिजवलेलं शाकाहारी अन्नच खाल्लं पाहीजे असा नियम आहे. जी व्यक्ती स्वयंपाक करणार तिने अंघोळ करुनच स्वयंपाक करावा असे अभिप्रेत असते. याव्यतिरिक्त चटई टाकुन खाली झोपणे, कुणालाही वाईट नं बोलणे हे सगळे नियम पाळायचे असतात. याचा अर्थ सगळी उर्जा एकवटुन या यात्रेला प्रारंभ करायचा असतो.

दोन तर्हेच्या रस्त्यांनी शबरीमलय ला जाता येते. चिन्न पादै (छोटा रस्ता )आणि पेरीय पादै (लांब रस्ता). छोट्या रस्त्याने एका विशिष्ट जागेपासुन २ तासात मलय चढता येतो. मोठ्या रस्त्याने एका विशिष्ट जागेपासुन १२ तासात मलय चढता येतो. छोट्या रस्त्याने जातांना पंबा नावाच्या नदीत स्नान करुनच पुढे जाता येते. येथुन १० - ५० वर्षे वयाच्या स्त्रियांचा प्रवेश निषिध्द आहे. मोठ्या रस्त्याने येतांना एरिमेली ला उतरुन पुढे पंबा पर्यंत येऊन अंघोळ करुन पुढे जाता येते. चेन्नई हुन कोट्टायम ला ट्रेन नी जाऊन, पंबा पर्यंत गाडीने जाता येते. पंबाच्या पुढे मात्र कुठ्ल्याही वाहनानी जाता येत नाही. तिथुन पुढे किर्रर्र जंगल आहे. जंगलातल्या पायवाटा तुडवत "स्वामीये अय्यप्पो" चा गजर करत सगळ्यांना पादक्रमण करायचे असते. चेन्नईहुन जातांना इथल्या एका अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात जाऊन किंवा घरी पुजा करुन घरी डोक्यावर "इरुमुडी" धारण करायची असते. इरुमुडी म्हणजे पिशवी. या पिशवीत घरातल्या प्रत्येकाने टाकलेले मुठ मुठ तांदुळ, मुरमुरे असतात. अय्यप्पा स्वामीच्या अभिषेका करीता एका नारळात १ वाटी तुप भरुन त्याला सील करुन इरुमुडीत ठेवतात. ही इरुमुडी डोक्यावर सतत ठेउनच हा प्रवास करायचा असतो.

अय्यप्पा स्वामींचं जिथे देऊळ आहे त्याला "सन्निधानम" असे म्हणतात. इथे पोचल्यावर देवळात जाण्यासाठी १८ सोन्याच्या पायर्या चढुन जावे लागते. या सोन्याच्या पायर्या चढल्यानंतर मंदीराच्या गाभार्यात प्रत्यक्ष मूर्ती दिसते. ही मुर्ती पंचधातूंची बनलेली असुन यावर तुपाचा अभिषेक केल्यावर ती अजुनच सुंदर दिसते असा प्रत्यक्षदर्शींचा अनुभव आहे.

आजकाल मोबाईल नेटवर्क मुळे जास्तं भिती राहिली नाही. पूर्वी "शबरीमलय" ला जातोय म्हंटलं की लोक घाबरायचे. आजही जिथे हे सगळे लोक वास्तव्य करतात तिथे रात्री फ़टाके लावल्या जातात, हिंस्त्र प्राण्यांपासुन बचाव म्हणुन..

परतल्यावर इरुमुडीतल्या तांदुळाचा "पोंगल" करुन देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. मला हे सगळे पाहुन विदर्भात लोक महादेवाला जायचे आणि"महादेवाले जातो गा" म्हणुन सांगायचे तेच आठवलं. तेव्हाही लोकं महादेवाहुन परतले की मोठठा उत्सवच साजरा करीत असत. थोड्या फ़ार फ़रकाने प्रथा तीच.....दैवत आणि रुपं वेगवेगळी.. :)

पुढच्या लेखात अय्यप्पा स्वामींबद्दल थोडी माहिती टाकेन.

.

Comments

Popular posts from this blog

अविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

बाहुबली २