Skip to main content

आवर्तन

आज पुन्हा पावसाचं येणं एखाद्या जुन्या पावसासारखंच वाटलं....आजही बाहेर पडणार्या पावसाचा आवाज तस्साच येतोय जसा पूर्वी यायचा..मला आजीकडे असतांनाचा पावसाळा आठवत नाही. महालातल्या घराला मोठे अंगण नव्हते तरीही आम्ही मुले हरदासांच्या अंगणात जाउन पाऊस बघायचो...हे नक्की आठवतं..घराच्या दारापुढे पावसाचे पाणी वाहत असतांना येणारे बुडबुडे अजुनही तस्सेच आहेत..त्यांचा वाहत जायचा ओघ ही तसाच...तोच थोडा कथ्था थोडा चॊकलेटी रंग पावसाच्या पाण्याचा...काही गोष्टी कधीच बदलत नाहीत..
-------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या आजुबाजुला होणार्या गोष्टी नुसत्या एकेरी होत नसतात तर संपूर्ण आयुष्यात त्यांची आवर्तने होत असतात असं नवीन घरात आल्यापासुन असं वाटत आहे
शिफ़्ट झाल्यापासुन नव्या घराबद्दल लिहीणंच झालं नाही...लहानपणी हरदास काकुकडॆ डायनींग टेबल ला लागुन एक मोठ्ठी खिडकी होती..मोठ्ठी म्हणजे त्यावेळी माझ्या मानाने मोठी...मोठ्या, उभ्या गजांआडुन बाजुचं विश्व पाहण्यात मजा येत असे. त्यात मी अगदी मांडी घालुन बसायची..आणि काकूनी दिलेला आव्वा खायची..तशीच खिडकी आता या नव्या घराच्या पहील्या खोलीत आहे म्हणुन का कोण जाणे मला हे घर पाहताक्षणी आवडलं.
लहानपणी आजीच्या घरची विहीर, त्यावर लोंबकळणार्या जास्वंदाच्या फ़ांद्या...पिवळ्या फुलांचं झाड, गच्ची, कपडे धुण्याचा ओटा, भलंमोठं आंब्याचं झाड, तुळशी वृंदावन यासगळ्यावर माझा खुप जीव होता आणि अजुनही आहे...
आत्ताच्या नवीन घराच्या स्वयंपाकघरातही तेवढ्याच मोठ्या दोन खिडक्या आहेत. बाजुला मोठ्ठी गच्ची आणि कडेला जुन्या पध्दतीचा कपडे धुण्याचा ओटा आहे...गच्चीच्या कठड्यावरुन डोकावणारं पिवळ्या फुलांचं झाड तसंच आहे अगदी लहानपणीसारखं. बाजुलाच एक भव्य आम्रवृक्ष आणि खाली मोठ्या दरवाज्याच्या शेजारी एक छोटं आणि छान तुळशी वृंदावन आहे.
घरमालकांच्या पडवीत तुळशीला दिसेल असा कृष्णाचा फोटो आहे. आणि परसात एक आडाची जुनी विहीर..
हे सगळं पाहुन काहीच बदललं नाहीए असंच वाटलं...आपण ज्यांच्यावर जीव लावतो त्या वस्तु आपल्याला अश्याच आयुष्यातल्या कुठल्यातरी आवर्तनात भेटत असतात...याला अपवाद माणसांचा..एखाद्या आवर्तनात एखादं माणुस भेटलं आणि पुढे त्याची साथ सुटली की ती कदाचित नेहमीकरताच असते...आपणंच खुप प्रयत्न करतो शोधाशोधीचा..
-------------------------------------------------------------------------------------------------------------
परवा स्वप्नात आई दिसली...पूर्ण रात्रभर दिसत राहिली..थोड्यावेळासाठी या सगळ्या निर्जीव वस्तुंसारखी पुन्हा माझ्या आयुष्यात आई आलीए की काय असं वाटल..
सकाळी उठल्यावर अर्थातच लक्षात आलं की असं काही झालेलं नाहीए...
-------------------------------------------------------------------------------------------------------------
हे घर ही शेवटी भाड्याचंच, कधी ना कधीतरी सोडुन जावं लागणारंच तेव्हा या निर्जीव वस्तुंना सोडुन जातांना माझ्याइतकंच त्यांनाही दुःख होईल का? पुन्हा येतील या सगळया वस्तू माझ्या आयुष्यातल्या एखाद्या आवर्तनात माझ्या भॆटीसाठी?? प्रत्येक व्यक्तीकडुन अपेक्षा करण्याची माणसाची खोड तशी जुनीच पण मी तर चक्क निर्जीव वस्तुंकडुन अपेक्षा करायला लागली आहे...
माझंच मला काहीतरी करायला हवं ;)

Comments

  1. छान लिहिलस गं. आवर्तनाची कल्पना किती सुंदर आहे. खरोखरच आवर्तनाप्रमाणे, साथ सुटलेले आप्तजन परत आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर परत भेटलेत तर... डोक्यात असेच काहिसे भरकटणारे विचार सुरु होते. त्यात तुझी ही पोस्ट! अंतर्मुख केलस बघ.

    ReplyDelete
  2. अपेक्षा आणि उपेक्षा दोन्ही ही त्रासदायक असतात...
    रोहिणीच्या प्रतीक्रियेला अनुमोदन, आवर्तनाची कल्पना खरच सुंदर आहे.

    ReplyDelete
  3. आवर्तन , मी कधीच तुझ्याएवढा याबाबतीत विचार नाही केला पण आता केला आणि जाणवलं की आयुष्यात बरयाच गोष्टी अशा पुन्हा पुन्हा येत रहातात. मी दररोज सकाळी उठतो आणि पहिला मनात विचार येतो की कालचा दिवस गेला. आज एक नवीन दिवस. कालची दु:ख कालच संपली. तशीही दु:ख बेनामच असतात. कुठून येतात कुठे जातात माहीत नाही. आपण फक्त त्यांच्याबरोबर ते नेईन तसं धावायचं. पुन्हा एक नवीन दिवस. हे सारखं असंच लुप मध्ये आपल्या आयुष्यात येत रहातं, बरयाच प्रसंगाची सुद्धा आवर्तन घडतात आता ही मी किती कन्प्फूज आहे लिहीताना कदाचित ही सुद्धा स्टेज मी या अगोदर अनुभवलेली पुन्हा तेच घडतय जे या अगोदर घडलय कधीतरी...जाऊ देत, उद्याची सकाळ मला पुन्हा एकदा खूणावतेय

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटा...

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...