Skip to main content

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस
तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे.
तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती. 

कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते. 

मणी रत्नम चे सगळे चित्रपट मला आवडतात कारण म्हणजे प्रत्येक चित्रपटाला एक वेगळी उबदार छटा असते. अगदी आपल्या समोर घडत असलेली गोष्ट आहे असेही बरेचदा वाटून जाते. त्याचं मुख्य कारण म्हणजे सिनेमॅटोग्राफी, चित्रीकरण कसे केले आहे यावर चित्रपटाचा फील अवलंबून असतो. बरेचदा कथानक छान असूनही चित्रीकरणात दम नसल्याने चित्रपट तेवढा परिणामकारक वाटत नाही. मणी रत्नम चे सगळे चित्रपट कुठेतरी एक खोल परिणाम करून जातात. 

दलपती ही अश्याच एका तान्ह्या बाळाची गोष्ट ज्याची आई त्याला पिवळ्या फडक्यात गुंडाळून मालगाडीच्या एका डब्यात टाकून देते. त्याचं नाव पुढे सूर्या आणि तो एका छोट्या गावात एक डॉन म्हणून देवराज नावाच्या मोठ्या डॉन च्या हाताखाली काम करत असतो. 

पुढची कहाणी बघण्यासारखी आहे कुंती, अर्जुन आणि कर्ण म्हणजे सूर्या  तिढा दाखवला आहे. कुंतीची घालमेल तिच्या दोन्ही मुलांकरता असलेलं सारखंच प्रेम आणि तिला लहानपणापासून वाटत असणारी गिल्ट आणि तो भेटल्यावर व्यक्त नं करता येणारं प्रेम हे दाखवणं मोठं कठीण काम, पण मणी रत्नम नी एकदम लीलया उभारले आहेत सगळे सीन्स. 

तमिळ चित्रपटसृष्टी तांत्रिक दृष्टींनी अतिशय पुढारलेली होती आणि आहे. १९९१ मध्ये इतकं छान चित्रीकरण करणे, आणि लोकांनी त्याला स्वीकारणे ह्यातच सगळे काही आले. हिंदी डब केलेला दलपती चालला नाही :(

संगीत आणि इलाईराजा:

सिंफनी चा उपयोग इलैराजा यांच्या संगीतात खूप आधीपासून केल्या गेलेला आहे. मला सुरुवातीपासून त्यांचे गाणे खूप कर्णकर्कश वाटायचे. पण हळूहळू त्यांची बरीच गाणी आवडायला लागली. सिम्फनी चा इतका उत्तम उपयोग मी अजूनपर्यंत कुठे पाहिला नाही ते पण प्रादेशिक भाषेच्या चित्रपटामध्ये. 

एस पी बालसुब्रमनियम, जानकी, स्वर्णलता  यांनी म्हंटलेली गाणी दलपती ला एकदम वरच्या स्तरावर नेऊन पोचवतात. 

माझ्या आवडत्या गाण्यामध्ये 

१. राकम्मा कैय्य तट्ट 
२. सुंदरी 
३. यमुना आटरिले ईर काटरिले 

खूपच श्रवणीय गाणी आहेत ही.


 राकम्मा कैय्य तट्ट


अप्रतिम चित्रीकरण, समाजातल्या दोन अतिशय भिन्न गटांमध्ये असलेला विरोधाभास रजनी आणि शोभना यांच्या अभिनयात अगदी दिसून येतो. एका अगदी झोपडपट्टीत राहणारा सूर्या, गावात असलेल्या एका छोट्या प्रोग्रॅम मध्ये कोणत्याश्या पोरीसोबत रात्रभर नाचताना गातांना, तिथेच पहाट झाल्या झाल्या एका उच्चभ्रू घरातील भरतनाट्यम आणि संगीतात प्रवीण असणारी शोभना येतांना रजनी चे हाव भाव सगळं सांगून जातात.
हे गाणं बी बी सी च्या २००२ च्या सर्वे मध्ये सगळ्यात लोकप्रिय गाणं म्हणून नामांकित झालं आहे

मला या बँड चं  व्हर्जन पण आवडतं

https://www.youtube.com/watch?v=-ytwTa44pbY


नेहेमीच खूप काही शिकण्यासारखं आणि आत्मसात करण्यासारखं आहे ह्या चित्रपटात पण. आपली तयारी हवी. चित्रपटासारख्या ताकदीच्या माध्यमातून खूप आधीपासूनच इकडे खूप वेगळ्या विषयांवर चित्रपट आले आहेत. पुढच्या भागात कमल हसन, रजनी च्या अवल अपडीदान ह्या चित्रपटावर लिहेन. 

Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

भुलाबाई आणि भुलोजी

:) बरेच दिवस झाले अनुदिनीकडे पाहुन..म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस तसं काहीसं झालं असावं. लहानपणी नवीन फ़्रॉक, चप्पल, कंपॉस किंवा काहीही घेतलं तरी मला रात्रभर झोपेतही छान वाटत असे. तसंच काहीसं या अनुदिनीबाबतीत झालं. विषय शोधायला लागले मी आपोआप आणि उतरवत गेले जसं वाटेल तसं..काहीवेळा हातच्या कामाकडे दुर्लक्ष करुन, रविवार असाच वाया नं घालवता सकाळी उठुन अशी काहीशी माझ्याही अनुदिनी ची पाने भरली आणि त्याला योग्य ते प्रतिसादही मिळाले... एका नववधूची एका नव्या जागेत नव्या वातावरणात होणारी गम्मत..तिला तिच्या भाषेचं, तिच्या लोकांचं वाटणारं कौतुक, सणंवारं, माहेरची सतत येणारी आठवण हे सगळं भरभरुन मला इथे उतरवता आलं.. नुकतीच माहेरी जाऊन आले...माझी बर्‍याच दिवसाची इच्छा पूर्ण झाली...येतांना एकटीच आली कारण श्रीमंत आधीच परतले होते :) मग काय गाडीने जसा जसा वेग घेतला तशी तशी मी अंतर्मुख होऊ लागले.. आम्ही लहानपणी भुलाबाई बसवत असु..अजुनही विदर्भात कोजागिरीला भुलाबाई बसवतात..आणि वेगवेगळे पदार्थ प्रसादाकरिता बनवुन मोहल्ल्यातल्या पोरी गाणी म्हणतात..त्यादिवशी घरातल्या मोठ्या अपत्याला खास नविन ड्रेस दिल्या जातो. त्