Skip to main content

मंगळागौर...(भाग १)

"नाही गं येणं नाही होणार माझं मंगळागौरीला..हो इथेच करेन सगळी पुजा व्यवस्थित तू फक्त मला पुस्तक पाठव" असं म्हणून मी फोन ठेवला.

मंगळागौर..लग्नं झाल्यावर नववधूने आपल्या सुखी संसारासाठी आणि अपत्य प्राप्तीसाठी करायची पुजा. पूर्वीच्या काळी आजूबाजूच्या सगळ्या सुवासिनी जमून ही पुजा करायच्या. त्या दिवशी रात्री गाणी म्हणून, खेळ खेळून जागरणं करायचे असायचे. तेवढाच नववधूला सगळ्यांचा परिचय आणि एक संधी माहेरी येण्याची ;).

लहानपणापासून ऐकत होते, श्रावण सुरू झाला की कोण्या अमुक अमुक ची मंगळागौर झाली वगैरे. मलाही फार इच्छा होती की मस्तं थाटात साजरी करावी पहिली मंगळागौर माहेरी. पण सुट्ट्या आणि आरक्षण या दोन्ही बाबी आड येत असल्याने माझं जाणं होणारच नाही अशी मला खात्री झाली..शेवटी तो माझा सण आहे आणि मला साजरा करायलाच हवा असे मानून मी कंबर कसली..

मला खरंच भारताबाहेर राहणाऱ्यांचं अमाप कौतुक वाटतं.मी भारतातच एका वेगळ्या प्रदेशात, वेगळ्या राज्यात राहूनंही मला माझं गाव, तिथली लोकं, बाजारात मिळणाऱ्या गोष्टी इतक्या आठवतात.तर ही सगळी बाहेर राहणारी मंडळी भारताला किती मिस करत असेल ह्याची कल्पनाही करता येत नाही.

एक तर तमिळ कुटुंबात असल्याने मला त्यांना मंगळागौर म्हणजे काय हे समजावून सांगणे हे अतिशय कठिण होते (अशीच काहीशी परिस्थिती गुरुपौर्णिमेला, त्यादिवशी सासरा आणि सून यांनी एका छताखाली वावरू नये असे म्हणतात आता हे ही भाषा येत नसताना समजवून सांगणे म्हणजे माझ्या पेशन्स ची सत्त्वपरीक्षा..नशिबाने आम्ही माहेरीच होतो त्यादिवशी) तरीही हिंमत करून, नवऱ्याच्या भाषांतराची मदत घेऊन मी घरी पुजा करणार आहे असे सांगितले. घरातली मंडळी एकदम कूल असल्याने तसा फारसा फरक पडला नाही.

इकडे पूजा करायची म्हणजे देवाला अंघॊळ, वस्त्र घालून, चंदन, फुले वाहून, हातात घंटा घेऊन सरळ कापूर आरती ओवाळणे, मला तर आरत्या म्हटल्याशिवाय पूजा झाल्यासारखी वाटतंच नाही :( इकडचा झाल्यापासून माझा बाळकृष्णही कापूर आरतीवरच समाधान मानत असला पाहिजे.

करता करता शनिवार येऊन ठेपला आणि अजूनही मला मंगळागौरी व्रतकथा चं पुस्तक आलं नव्हतं, पुजा होती अवघ्या तीन दिवसांच्या अंतरावर. मग काय महाजालावर गुगललं आणि मिळालं मंगळागौरी व्रतकथा चं पुस्तक.ज्या कुण्या भल्या व्यक्तीने हे पुण्याचं काम केलंय त्याला शतशः: नमन करून मी त्यात डोकावायला सुरुवात केली...पहिले प्रिंट आऊट्स काढून घेतले. पूजेचा विधी काय किंवा नवीन तमिळ पाककृती काय, लग्नं झाल्यापासून महाजाल हे माझं रेडी रेफ़रंसिंग चं एक माध्यम आहे. त्याला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच!!

पुस्तक तर मिळालं पण त्यात दिलेली वस्तूंची यादी पहिले आणणं आवश्यक होतं. भाषा येत नसल्याने दुकानात जाऊन "सुपारी द्या हो" हे कसं म्हणायचं हा एक मोठा प्रश्न होता. खारका, बदामा, हळकुंडं यांचं ठीक आहे पण अष्टगंध, गुलाल आणि बुक्का कुठून आणि कसा जमवायचा हा तर विचारच होता. बरं सांगितलं तरी कुणाला कळेना. इथे हळद कुंकू वगैरे मिळतं पण गुलालाची एकदा चौकशी केली तर काही ही हाती लागलं नाही असा माझा पूर्वानुभव होता त्यामुळे यादीतून गुलाल बुक्का तात्पुरता वगळला.

पुढच्या पानावर काही निवडक फुलांच्या, फळांच्या झाडांची १६ १६पाने म्हणजे पत्र्या गोळा करायला सांगितल्या होत्या. फुला फळांचं एकवेळ ठीक आहे पण आघाडा, केना आठवून तर मला हसायलाच आले. कुणाला सांगू आणि काय नावं सांगू :). लहानपणी हरितालिकेला मी सगळ्या पत्र्या गोळा करून घरी घेऊन जायची. काय मजा यायची म्हणून सांगू? मी आणि माझी मावशी एक टोपली आणि त्यात सुई दोरा घेऊन निघायचो आदल्या दिवशी. लागणाऱ्या सगळ्या पत्र्या गोळा करून मगच घरी यायचो..त्यावेळी आघाड्याची पानं खूप शोधावी लागायची. एवढ्या दुर्मिळ पत्र्याच देवाला का आवडतात असं मला नेहमी वाटायचं. इथे तर आघाडा वगैरे मिळायची शक्यताच नव्हती.

१५ पदार्थांची यादी आता अगदी ७ वर येऊन ठेपली होती. हे पदार्थ कमी होत होत माझी पुजा "दोन हस्तक तिसरे मस्तक" वरच होते की काय असे वाटायला लागले होते.

वायनाचे पदार्थ मला तसे नवीन नव्हते. चोळी गरसोळीची मला हरितालिकेमुळे सवय होती. आता ती इथे लोकेट कशी करायची हा विचार करत करत माझी इथल्याच एका बाजारात भटकंती चालली होती. आजूबाजूचे मोगऱ्याच्या गजऱ्यांचे ढीग पाहून माझा बाळकृष्ण केवळ या फुलांमुळेच आनंदी असावा असं वाटून गेलं..

बरंचंसं पूजेचं साहित्य असणाऱ्या एका दुकानात मला कापसाच्या माळा आढळल्या आणि हायसं वाटलं. तिथनंच जानवं घेतलं, कापूर, वाती घेतल्या तेवढ्यात तुझ्यासाठी पुस्तकासहीत सगळं पूजेचं साहित्य ओळखीच्या काकांबरोबर चेन्नईला पाठवलं आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. असा बाबांचा फोन आला.

आता फक्त वाट आहे ती मंगळवारची..:)

क्रमशः

Comments

  1. गुड. :) डौलाने करा पुजा अन लिहा पुढचा भाग. शुभेच्छा.. :)

    ReplyDelete
  2. blog la bhet dilyabaddal dhanyavad shreya.
    mangalwari puja aahe. mala tar sagali gammatach watatey..
    baghuya kaay hotay te.
    pratisaadasathi manapasun aabhar!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...