Skip to main content

माय मराठी!!

मराठी ही अतिशय हळवी भाषा आहे असं मला नेहमी वाटतं (शिव्या जरी लक्षात घेतल्या तरी). माझ्या आणि कितीतरी हळव्या मराठमोळ्या मनांच्या व्यथा तिने आजवर व्यक्त करण्यास हातभार लावला आहे.

पहीला शब्द मी बोललेला "आदा" (आई) हा होता असं आई म्हणायची...मला हिन्दीतल्या मा, ईंग्रजीतल्या मम्मी..तमिळमधल्या अम्मा..पेक्षा आई हा शब्दच अधिक श्रवणीय वाटतो.आई नंतर बाबा..मामा, आजोबा,आजी..मावशी, काका आणि नंतर व्यवहारीक शब्दं अशी माझी मराठीतील वाटचाल सुरु झाली.

भाषा म्हंटलं की समाजातील प्रत्येक थरातील व्यक्तीचा तिच्यावर प्रभाव पडत असतो.भंडार्यात एका वेगळ्याच प्रकारे मराठी बोलली जाते त्यात हिन्दी तील काही शब्दही वापरले जातात.मी जास्तं काही सांगायला नकोच याबद्दल.पु.लं नी आधिच लिहुन ठेवलेलं आहे.लहानपणी भंडारा, नागपूर ला असल्यामुळे विदर्भातील मराठी भाषाच कानावर पडली.बरेचशे शब्द अजुनही ऐकले की त्याच लहानपणीच्या दिवसांची आठ्वण होते.ही वर्हाडी भाषा बोलण्यात मात्र एक वेगळीच मजा आहे.मी नागपुरला गेले की हमखास "का गं?" च्या ऐवजी " काऊन गं?", " कुठे जातोयस?" च्या ऐवजी"कुठे जाऊन राहीला?" असंच बोलते.वर्हाडी शब्दांची एक स्वतंत्र डिक्शनरी असावी असं मला वाटतं.नाहीतर हे शब्द असेच लोप पावतील..

माझी आई विदर्भातली आणि बाबा मराठ्वाड्याचे असल्याने दोघांचीही बोलीभाषा वेगळी होती.खुप गोड आहे मराठ्वाडी मराठी.मराठ्वाड्यातील काही शब्द मला फ़ार आवडतात. उदा. माय, लेकरु,...आई एखाद्या वेळेला रागावली की बाबा लगेच म्हणत "जाऊ दे लेकरु आहे"..त्यांची माझ्यावरची माया लेकरु या शब्दात एकवटली आहे असे मला वाटे.अजुनही ते कुठे गेली होतीस? असं नं विचारता कुठे गेली होती माय? असं विचारतात. बाबांकडले कुठ्लेही नातेवाईक माय या संबोधनाशिवाय मुलीबाळींना कधीच बोलवत नसावेत.आणि ह्या भाषेचा सगळा गोडवा अश्या शब्दातच आहे...

खान्देशातील मराठीचा आणि माझा फ़ारसा संबंध आला नाही...पुण्याला आल्यावर मात्र थोडीशी सावरुन मराठी बोलायला शिकले..आईशप्पथ!! ;) नाहीतर आम्हा वर्हाडी मानसाले मले तुले ची सवय;)

लहानपणापासुन माझ्या मित्रमैत्रिण मंडळात मराठी भाषिकांचा फ़ार कमी वावर होता.माझ्या बहीणिच्या मित्रमंडळात सगळे जोशी, देशपांडॆ, कुलकर्णी, पाटील असे लोक आणि माझ्या सगळ्या मैत्रिणि म्हणजे खान, पुरी, फ़्रांसिस वगैरे नावाच्या त्यामुळे मराठी भाषिक मित्रमंडळाला मी मुकले असं मला वाटायचं...

कहर म्हणजे पुण्यात शिकायला असतांनाही माझा एकही मित्र किंवा मैत्रिण मराठी नव्हते...तिथे असतांना अस्सल मराठी जेवणाच्या ऐवजी माझ्या दक्षिण भारतातील मित्रांच्या कृपेने मी भरपुर रसम भात चोपला आहे...:) माझी ही हळहळ जाणुनच कदाचित देवाने मला कामानिमित्त मुंबईला(ठाण्याला) पाठ्वले जिथे माझ्या मित्रमैत्रिण मंडळात मराठमोळ्या लोकांची भर व्हायला लागली...आणि मी एकदाचा निश्वास सोडला... दीड वर्षांच्या माझ्या ठाण्यातील वास्तव्यात मला खुप मराठी पुस्तके वाचता आली...मराठी नाटके, गाण्यांच्या महफ़िली अनुभवायची संधी मिळाली...

मुंबईत वावरतांना आणि तिथली टपोरी भाषा वापरतांना मराठीच्या मोठेपणाची दाद द्यावी शी वाटली..इतक्या वर्षापासुन, हजारो बोलीभाषांचा प्रभाव पडुन सुध्दा आपली माय मराठी तितकीच हळवी...तितकीच उदात्त वाटते...ह्यालाच भाषेचं सामर्थ्य म्हंटले असावे नाही का?

आणि म्हणुनच आपण मराठीला माय मराठी म्हणत असु...

Comments

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

झोपीलागी जीवा....

आताशा पुन्हा मला "झोप" फारच आवडायला लागली आहे. आताशा "पुन्हा" म्हणण्याचे कारण हे की मला समज आल्यापासूनच मला झोप प्रचंड आवडते पण मध्ये जरा गडबड झाली होती. गेली चार वर्षे मी हवी तितकी झोपली नाही असं मला मनापासून वाटतं(तसं माझ्याव्यतिरिक्त माझ्या घरात कुणालाही वाटत नाही याची मला खात्री आहे ) ;) तीझोपेचा आई बाबांना आणि मलाही शोध लागला. त्यांच्यामते (माझ्यामते नाही) मी खूप झोपायचे. ८ ते ९ तास साधारण मनुष्याने झोपावे असं विज्ञान सांगतं हे आई बाबांना कोण सांगणार? त्यांच्यामते मला अभ्यासाचं, परीक्षेचं टेन्शनच नाही असं सिद्धं झालं होतं. आणि मला रोज मला हे काय होतंय? असं वाटायला लागलं. खरं पाहिलं तर असं कुठे लिहिलंय की दहावीच्या विद्यार्थ्यांनी कमी झोपावं?? पण हे बाबा रोज मला इतके रागावायचे की मी उठल्याक्षणी आपण आठ तासापेक्षा किती जास्त झोपलो हे मोजायची. :p , तिला कुठलं तरी टेन्शन आहे म्हणून ती जास्त झोपते" असं Doctor म्हणाले, त्यामुळे मला कुणीही फार झोपते असं म्हटलं की मी सरळ माझ्यावर असलेल्या अतीव ढोंगी टेन्शन ची आठवण करून देत असे. बाबांनी मात्र लगेच त्या Doctor ला मू...