Skip to main content

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस,

२००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा..
हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता...
बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण सार्थ ठरवली..तिच्या असण्याने मला बाबांना आणि छकुला खुप आधार वाटला.ती नेहमीच आम्हा तिघांची काळजी करत असते.. माझ्या लहानपणीची चंचल मावशी जशी होती तशीच अजुनही आहे ती.
आजी ला सगळा सोहळा बघतांना तुझी आठवण आली असेलच आणि पाणीही आलं असेलच तिच्या डोळ्यात पण तिने कुणाला काही सांगितलं नाही..शेवटपर्यंत आपल्या अश्रुंना डोळ्यातच साठवुन ठेवलं होतं तिने..
साड्या घेतांना तुझ्या आवडीच्या पद्धतीच्याच साड्या घेतल्या सगळयांना..आणि तुझ्या टेलरकडुनच मी माझे कपडे शिवुन घेतले..बांगड्याही आपल्या नेहमीच्याच "भोकन्याच्या" दुकानातुन घेतल्या..त्याला आवर्जुन सांगितलं की माझी आईही इथुनच घ्यायची बांगड्या...
डाळींबी रंगाच्या बांगड्या पाहुन तुझा नेहमी बांगड्या  भरलेला गोरा गोरा हात आठवला..आणि रहावलं नाही म्हणुन सगळ्यांसोबत तुझ्यासाठीही घेतल्या "डाळींबी" रंगाच्या बांगड्या..
सगळे रमतात तशी मी ही रमले संसारात..तु केलेली प्रत्येक गोष्ट आठवत आणि तसंच करत..तू सगळं इतकं छान करायचीस की तुझ्या अनुकरणामुळे माझं सासरी अजुनही सतत कौतुक होत असतं..
बाबाही आता थोडे सावरलेत....मध्ये थोडी तब्येत बिघडली होती पण आता बरे आहेत..त्यांनी जिम लावलंय..व्यायामाचं त्यांना किती वेड होतं आठवतं ना? आणि आपण त्यांच्या दोन दोन तासाच्या फिरण्यावर कसे हसायचो? त्यादिवशी स्टिम घेतली त्यांनी आणि मला फोन केला लगेचच..मला खुप छान वाटतंय म्हणुन..मलाही त्यांना बघुन तीन महीने होत आलेत..येत्या महीन्यात येणार आहेत ते आणि छकु..
तुझ्यासाठी मोठ्ठं सरप्राईज म्हणजे छकु आता "छरहरी" झालीए..तिने १५ किलो वजन कमी केलं...तुला तिची फ़ार काळजी वाटायची नं? आता ती खुप छान दिसते..ती यंदा आली की तिला मी मस्तं वेस्टर्न फ़ॊर्मल्स घेऊन देणार आहे..तुला आठवतं आपण असेच तासन तास तिला काय छान दिसेल च्या गप्पा मारायचो..तिला लहानपणीपासुन कधीच मापाचे कपडे मिळायचे नाहीत आणि आपण हसायचो...गुड ओल्ड डेज..!!
तू गेल्यावर घर सावरलं ते तिनेच कारण मी मुंबईला होते..तिची मनस्थिती तेव्हा खुप वाईट होती पण ती ही सावरली आता..एमबीए एन्ट्रंस दिलीए तिनी यंदा..नेहमीसारखाच तिने याही वर्षी खुप अभ्यास केला आहे..तू असती तर तिला ईंग्रजीत किती मदत झाली असती असं सारखं म्हणत असते..
स्वयंपाकात बाबा पारंगतच होते पण आता छकुही झाली आहे..दिवाळीत "जावयाला" वडा पुरणाचा पाहुणचार केला तिने..छान झाली होती पुरणपोळी..तू गेल्यापासुन कसलंच अपरूप राहीलं नाहीए..आला दिवस गेला दिवस असंच होतं..पण काही दिवस साजरा करावेच लागतात..जसं आम्ही दिवाळीत केलं..बाबांना जबरदस्ती २ टी शर्ट्स घेतले..छान दिसतात ते टी शर्ट आणि ट्राउजर्स मध्ये..
हे सगळं तुला माहीत असणारंच गं..पण तरीही सांगावंसं वाटलं..अजुनही बरंच काही आहे पण ते शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही..
फ़क्तं एवढंच आवर्जुन सांगावं वाटतं की तू होतीस तेव्हाच जगण्याला अर्थ होता..मरणालाही अर्थ प्राप्त होईल कारण त्यात तुझ्या भेटीची आस असेल..
तोवर भेटत राहुच अधुन मधुन स्वप्नांमध्ये..

तुझी,
मुग्धा

Comments

  1. किती वेळा डोळ्यात पाणी आणशील ... वाचता वाचता का होईना दोन मिनीटासाठी तुझं आयुष्य जगलो आणि डोळ्यात पाणी तरारलं.

    >>फ़क्तं एवढंच आवर्जुन सांगावं वाटतं की तू होतीस तेव्हाच जगण्याला >>अर्थ होता..मरणालाही अर्थ प्राप्त होईल कारण त्यात तुझ्या भेटीची >>आस असेल..

    काय बोलू याच्यावर ?

    -अजय

    ReplyDelete
  2. फ़क्तं एवढंच आवर्जुन सांगावं वाटतं की तू होतीस तेव्हाच जगण्याला अर्थ होता..मरणालाही अर्थ प्राप्त होईल कारण त्यात तुझ्या भेटीची आस असेल..
    तोवर भेटत राहुच अधुन मधुन स्वप्नांमध्ये..

    मुग्धा डोळ्यात पाणी आणतेस गं नेहेमी.....कालच भांडले गं आईशी,लहानश्या कारणावरून, ती बिचारी दहा वेळा फोन करतेय....आधिच मनात तगमग होती त्यात तुझी पोस्ट.....

    काय लिहू गं तुला......

    ReplyDelete
  3. अजय..अरे "आई" हे सगळ्य़ांचंच जग असतं..लहानपणी तिच्याच डॊळ्यातून आपण बाहेरचं जग बघत असतो..मग आज
    जर नविन वर्षाच्या सुरुवातीला माझं जगंच माझ्याबरोबर नाही तर मी कसं हे सगळं साजरं करु?
    तिच्याशी बोलणं (जे मी सतत मिस करते) हेच या नव्या वर्षीचं माझं सेलेब्रेशन आहे..

    आणि मला नक्की असं सतत वाटत असतं की गेलेल्या व्यक्ती कुठल्या ना कुठल्या रुपात एकमेकांना जरुर भेटत असतील म्हणुन शेवटचं वाक्य लिहीलंय रे..

    हे माझं सेलेब्रेशन आहे..डोळ्यांत पाणी अजिबात आणु नकोस.."आल इज वेल" :)

    तन्वी,
    आईशी कधीच भांडत जाऊ नकोस गं..तुझ्याकडॆ ती आहे..हे लक्षात ठेव..
    टेम्प्लेट कसं वाटलं ते लिहीलंच नाहीस :(

    ReplyDelete
  4. एकदम हृदयाला स्पर्श केला तुझ्या या पोस्ट ने! गहीवरून आले एकदम!!

    ReplyDelete
  5. मुग्धा, कसलं अप्रतिम लिहिलं आहेस आणि ते अगदी आतून आलंय हे शब्दाशब्दातून जाणवतंय !!
    टोचलं आतमध्ये कुठेतरी !!

    ReplyDelete
  6. मुग्धा अगं तू डोळ्यात पाणी आणलंस...कालच आईचं इथुन परत जायचं तिकीट कन्फ़र्म केलं आणि सारखं गलबलतयं...तुझ्या आर्ततेपुढे ते काहीच नाही पण फ़ार फ़ार हुरहुर लागलीय आणि तुझी पोस्ट वाचुन तर जास्तच.....काय सांगू तुला आपली कधी ओळखही होणार नाही...
    शेवटी आई ही आईच असते...कदाचित मी माझ्या आईबद्दल कधीच काही लिहू शकणार नाही....पण सावर स्वतःलाही आणि तुझ्या कुटुंबीयांना इतकचं म्हणावंसं वाटतंय....

    ReplyDelete
  7. खूप हृदयस्पर्शी लिहिले आहे

    ReplyDelete
  8. अप्रतीम लिहिलंय .. अतिशय भावस्पर्शी...

    ReplyDelete
  9. ajay, tanvi, विनय,हेरंब,अपर्णा, वायडी ,आनंद आणि महेंद्र.. वर्षाच्या शेवटच्या दिवशी माझ्या ब्लोग ला भेट दिलीत..मला खुप खुप बरं वाटलं...
    असेच येत रहा...
    तुम्हा सगळ्यांना नवीन वर्ष सुखाचे जाओ..हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

    ReplyDelete
  10. मुग्धा, अगं डोळ्यात पाणी आणलंस की गं...

    गेल्या आठवड्यातच ख्रिसमसच्या दिवशी माझ्या लहान बहिणीचे लग्न ठरले. बैठकीला आणि सगळ्या कार्यक्रमाला मी माझ्या पप्पांना असेच मिस केले होते. दिवसभर आई आणि ताईला दिसू नये म्हणून डोळ्यांतले पाणी अडवून ठेवले. पण रात्री एकटा बेडरूममध्ये उशी भिजवत राहिलो.

    ReplyDelete
  11. Mugdha,

    Vachtana tu mala radvales anekda ...

    Me tuzi manasik avastha samju shakate , karan mesudha ya dukhatun gele aahe ... Savar swatahala ani gharchyana

    ReplyDelete
  12. mazi ani tuzi bilkul oolakh nahi ye. tula watat asel hi aahe tari kon. Mi mazi oolakh karun dete mi Pankaj Chi Companymadhil friend aahe tyanech link dili mala hi wachayala ani sangiatle nakki waach. Kharach apratim,khup bhawsparshi, agdi kaljala hat ghalel asa blog aahe ha. Jyana aai nahi ye tyanchya tar dolyat khupach pani anel pan bakichya hi saglyancha dolyat 200% pani anel ha lekh. Kitihi Dagad dil manus asel tari to ek tari themb dolyatun galel.

    ReplyDelete
  13. so touchy post...from bottom of d heart
    but as you said to ajay 'all is well'!

    ReplyDelete
  14. http://anukshre.wordpress.com/2009/10/ post vach. adhik kay lihu?

    ReplyDelete
  15. http://anukshre.wordpress.com/2009/10/31/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%96/

    ReplyDelete
  16. खरच खुपच भावस्पर्शी पोस्ट आहे...
    डोळ्यात आपोआप पाणी आल वाचता वाचता कळलही नाही.

    ReplyDelete
  17. मुग्धा, पोस्ट वाचताना डोळे कधी भरले समज़ल नाही. खूप भावस्पर्शी झाली आहे पोस्ट.

    ReplyDelete
  18. Pankaj, Prachi :) , yog, anukshre, davbindu aani manmauji...khup khup dhanyavad..Hope this new year brings all the happiness to you all..

    ReplyDelete
  19. फ़क्तं एवढंच आवर्जुन सांगावं वाटतं की तू होतीस तेव्हाच जगण्याला अर्थ होता..मरणालाही अर्थ प्राप्त होईल कारण त्यात तुझ्या भेटीची आस असेल..तोवर भेटत राहुच अधुन मधुन स्वप्नांमध्ये..

    मुग्धा काय लिहू गं.... गलबलून आले. आई हवीच गं.फार फार हुरहुर लागली तुझे आर्ततेने लिहिलेले शब्द वाचून.

    ReplyDelete
  20. काळीज गलबलून गेलं वाचताना. काय लिहू उगीच शब्दछल करावा वाटत नाही. हॅटस ऑफ टू यू..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा