Skip to main content

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया.
रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते.
तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्नानंतर च्या सुरुवातीला आमच्या घरासमोर मीच रांगोळी घालायची सकाळी उठल्या उठल्या... थोडे वर्षांनी ते बंद झाले कारण फ्लॅट सारख्या घरात शिफ्ट झालो.  त्यानंतर च्या घरात मात्र मी माझी ही  रांगोळी घालायची इच्छा मनमुराद पुरवली.
आमच्या ह्या फ्लॅट च्या समोर पण एक मावशी येऊन सुंदर रांगोळी काढून जातात सकाळी सकाळी.
ही पुली कोलम म्हणजे ठिपक्यांची रांगोळी आहे ७ ते १ असे ठिपके . अपार्टमेंट समोर काढलेली रांगोळी 
दक्षिण भारतात शैव आणि वैष्णव हे दोन भेद आहेत. शैव लोकांकडे वेगळी रांगोळी घातल्या जाते, वैष्णवांकडे वेगळी. शैव ब्राम्हण लोक म्हणजे अय्यर आणि वैष्णव म्हणजे अय्यंगार. आता का आणि कसे हे भेद निर्माण झाले याकरता विश्वरूपम सारखा एखादा चित्रपट बघायला लागेल. पण जास्त करून हा भेद अजूनही लोक पाळतात. खाणे, राहणीमान एकूणच दोन्ही गटात ब्राम्हण असण्याखेरीज काहीच सारखे नसते म्हंटले तरी चालेल. तर... रांगोळी सुध्दा दोन वेगळ्या प्रकारात घातली जाते.
- सिक्कु अथवा पुली कोलम ( ठिपक्यांची रांगोळी)
हा रांगोळीचा अतिशय साधा प्रकार आहे आणि बऱ्याच अय्यर आणि ब्राह्मणेतर समाजात ही रांगोळी काढल्या जाते. ठिपक्यांची रांगोळी लहानपणीपासून मला येते त्यामुळे काही कठीण गेले नाही पण..... आपल्याकडे कसे ठिपके जोडल्या जातात रांगोळीने, इथे सिक्कु किंवा पुली कोलम काढतांना ठिपके वगळल्या जातात.
ही पण ठिपक्यांची रांगोळी 
- पडी कोलम (म्हणजे रेघांनी काढलेली रांगोळी)
पडी कोलम मध्ये मधला चौकोन आधी काढून घेऊन त्याभोवती रांगोळी काढली जाते. मुख्यतः या रांगोळीत कमळ,शंख, चक्र, गदा अश्या वैष्णव संप्रदायात खूप मानल्या जाणाऱ्या खुणांचा वापर केल्या जातो. दारावर पडी कोलम दिसली की समजावे अयंगार घर आहे ;)
शुक्रवारी पुली कोलम काढू नये असे म्हणतात.
अजूनही पूजा वगैरे असली कि चेन्नई आणि बाकी तामिळनाडू मध्ये तांदुळाच्या पिठाला भिजवून, त्या ओल्या पिठाची रांगोळी काढली जाते. मला अजून ते काही जमले नाही. घरांमध्ये देवासमोरही तांदुळाच्या ओल्या पीठानेच रांगोळी काढली जाते. आपल्याकडे अशी एकदम पांढरी रांगोळी सहसा घातल्या जात नाही. अगदी एखादे  बोट लावतोच  कुंकवाचे. इथे मात्र नाही घालत कुंकू. मग मी ही साधीच घालते रांगोळी. कुंकू वगैरे नाही घालत.



रस्त्यावरून चालतांना एका दारावरची रांगोळी

फ्री हॅन्ड पण अयंगार टाईप रांगोळी (अशी रांगोळी माझ्या आजे सासूबाईंकडे काढली जाते) 

आमच्याकडे कामाला येणाऱ्या कामाक्षी ने दिवाळीला काढलेली रांगोळी 

कपालेश्वर मंदिरात नव्या वर्षानिमित्त काढलेली मोठ्ठीजात रांगोळी
पडी कोलम अयंगार स्पेशल, रेघांनी काढलेली रांगोळी 


पडी कोलम 


पडी कोलाम 


पुली कोलम

पुली कोलम 


पुली कोलम




मार्गशीर्ष महिन्यात रांगोळीची स्पर्धा असते. सगळ्या मंदिरांच्या जवळ असलेल्या अग्रहारासमोर (म्हणजे वस्तीत) दोन्हीकडून सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. सकाळी म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर (४ -६) या वेळेत. तिरुवल्लीकेंनी, मैलापुर या अनेक मंदिरे असलेल्या भागात तर सकाळी रांगोळ्या बघायला जायची मजा असते.
हे दृश्य मला इतके आवडले,की डोळे मिटताच समोर येते, mychennai च्या फेसबुक पेज वरून साभार. आजूबाजूची घरे म्हणजे देवळासमोर च्या आग्रहाराचा भाग आहे 

एक मामी (इथे लग्न झालेल्या सगळ्या बायकांना मामी संबोधतात) मडीसार (पारंपरिक साडी) मध्ये रांगोळी घालतांना 
रांगोळी आणि तामिळनाडू हे समीकरण अगदी घट्ट आहे. चेन्नई अजूनही आधुनिकतेच्या थोडी दूरच आहे, अजूनही इथे सगळे सण समारंभ अतिशय निगुतीने साजरा केल्या जातात. चेन्नई ची सकाळ म्हणजे सडा, रांगोळी, फिल्टर कॉफी, हातात हिंदू पेपर आणि सुप्रभातम.









Comments

Popular posts from this blog

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे ...

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी... ती आणि तो "ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी. गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते. दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे. तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघा...