Skip to main content

आज रामनवमी!

आज रामनवमी! प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस...
या दिवशी खुप छान वाटतं मला नेहमीच. नागपुरला तशी दोन राममंदिरं आहेत. एक रामनगरला आणि एक पोद्दारेश्वर मंदिर ..दोन्हीमंदिरांची शोभायात्रा म्हणजे उत्सुकतेची बाब असते दर राम नवमीला..
लहानपणी आजी मला दर रामनवमीला राम मंदिरात घेऊन जात असे.तिथली सुंदर संगमरवराची मूर्ती लहानपणीच मला खुप आवडायची. मुळात प्रत्येक देवी देवतेच्या मूर्ती पाहुन आपल्या मनात एक विशिष्ट भाव येतात. त्यानुसार मला रामाला पाहुन शांत, प्रसन्नच वाटायचं नेहमी...अश्या वयात जेव्हा शांत प्रसन्न या दोन शब्दांची माझी पुरेशी ओळखंही नव्हती.
पुढे मोठी झाल्यावर नागपूरची शोभायात्रा पहायला जाणे हा नित्याचाच कार्यक्रम असे. आई, बाबा मी आणि छकु सगळेच सोबत रामाच्या दर्शनाला जात असु. आई आपल्यासोबत फुलं, गाठी आणि गुलाल घ्यायची आणि देवाला वहायची...होळीपासुन एक गाठी रामनवमीसाठी आणि एक प्रभु रामचंद्रासाठी असं तिचं ठरलेलं असायचं.
राममंदिरात कितीही गर्दी असली तरी सगळ्यांना शांतपणे दर्शन व्हायचे आणि देवाच्या प्रसन्न मूर्तीला मनात घेऊन आम्ही घरी वापस यायचो..
रामटेकला गेल्यावर माझं आणि प्रभु रामचंद्राचं नातं एका अर्थाने दृढ झालं..नागपूर हुन रामटेकला जातांना थोड्या थोड्या अंतरावर मोठ्या मोठ्या पाट्या लावल्या आहेत..त्यावर समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक लिहिले आहेत..महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागानेच ह्या पाट्या उभ्या केल्या आहेत. त्यावेळी नितीन गडकरी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते..हे श्लोक त्या पाट्यांवर लिहील्याबद्दल मी मनोमन त्यांचे खुप आभार मानायचे...
सुरुवातीला आई बाबांना सोडुन एकटं होस्टेल मध्ये रहायचं मला खुप जीवावर यायचं..मला खुप भिती वाटायची..बस मध्ये बसल्यावर माझं मन आईजवळ्च रहायचं..रामटेकच्या शिवेला गाडी पोचली की हे श्लोक वाचण्यात येत असत..त्यानेही मनावर एका वेगळया प्रकारचा संस्कार घडत असे..
"सामर्थ्य आहे चळवळीचे..जो जे करील तयाचे..परंतु तेथे भगवंताचे अधिष्टान पाहीजे"
हा श्लोक मात्र मला नेहमीसाठीच लक्षात राहीला..
रामटेकचं मंदिर भोसल्यांच्या काळातलं आहे.या राम मंदिरात फ़क्तं श्री राम आणि सीता आहेत..लक्ष्मणस्वामींचं मंदिर वेगळं आहे.. मला नेहमी वाटायचं की रामटेकचा राम गोरा राम असावा..पण प्रत्यक्षात तिथली मूर्ती काळ्या पाषाणाची आहे.
खरंतर कुठलीही मूर्ती ही माणसानेच घडवलेली असते. देवाची प्रत्येक प्रतिमाही आपण जशी इमैजिन करतो तशीच असते..विष्णुरुप थोडे मोहक, खट्याळ असे..शिवरुप हे भोळे, वेळप्रसंगी विनाशकारी असे..श्रीरामाचे रुप...अतिशय आदर्श मुलगा, पती, राजा असे..तर श्रीकृष्ण रुप मनाला भाबेल असे..हा कदाचित देवाच्या रुपांचा माणसाच्या स्वभावानुसार मी लावलेला निकष असावा पण मला हा मनाला पटतो..तो पटण्यामागे आजी आईने सांगितलेल्या गोष्टी आणि त्यासोबत ख~या जगाची करुन दिलेली ओळख नक्कीच आहे..
केवळ एक गोष्ट म्हणुन मला राम कृष्णांची ओळख करुन दिली असती त्यांनी तर मी ही एक गोष्ट आणि त्यातलं पात्र म्हणुन विसरुन गेले असते.. पण असं नं करता त्यांनी देवाच्या प्रत्येक रुपाशी असलेलं त्यांचं नातं आमच्यासमोर उभं केलं..ते नातं एका व्यक्तीचं देवतेशी असलेलं नातं नं राहता..खर्या जगातलं नातं झालं होतं हे मला आत्ता कळतंय..
आजीला प्रभू राम तिच्या मुलासारखे वाटायचे...ठुमक चलत रामचंद्र म्हणतांना तिचा छोट्या पायांनी चालत असलेला नातू तिला दिसायचा..मोठ्या रामचंद्रात तिला तिचा मोठा झालेला मुलगाच दिसत असावा..अजुनही त्यांच्या वाढदिवसाला स्पेशल भॆटिकरता ती नं चुकता मंदिरात जाते..
आई करता ते मर्यादापुरुषोत्तम होते....त्यांच्या जन्मासाठी आठवणीने गाठी ठेवतांना तिला नक्कीच ते तिच्या खोडकर मुलासारखे वाटत असावेत..
लहानपणी तिने मला शिकवलेला पहीला श्लोक
रामा तुझे कोमल नाम घेता
संतोष वाटे बहुपार चित्ता
बापा दयाळा मज भेट द्यावी
संसार चिंता अवघी हरावी
हा होता..सोपा आणि छान..
मग नंतर जसे जसे संदर्भ येत गेले तसं तसं तिने हिंदू मायथोलोजीतल्या प्रत्येक व्यक्तीची अशीच ओळख करुन दिली..प्रत्येक गोष्टीमागे ती कशासाठी आणी काय शिकवण मिळावी म्हणुन घडली हे तिने कटाक्षाने सांगितलं..
माझ्याकरता प्रभु श्रीराम म्हणजे एक मोठा ठेवा आहेत...आईने सांगितलेल्या गोष्टींची आठवण आणि माझ्या आयुष्यातल्या काही सोनेरी क्षणाची साठवण..
श्रीराम नवमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा...!!

Comments

  1. श्रीराम नवमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा...!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

झोपीलागी जीवा....

आताशा पुन्हा मला "झोप" फारच आवडायला लागली आहे. आताशा "पुन्हा" म्हणण्याचे कारण हे की मला समज आल्यापासूनच मला झोप प्रचंड आवडते पण मध्ये जरा गडबड झाली होती. गेली चार वर्षे मी हवी तितकी झोपली नाही असं मला मनापासून वाटतं(तसं माझ्याव्यतिरिक्त माझ्या घरात कुणालाही वाटत नाही याची मला खात्री आहे ) ;) तीझोपेचा आई बाबांना आणि मलाही शोध लागला. त्यांच्यामते (माझ्यामते नाही) मी खूप झोपायचे. ८ ते ९ तास साधारण मनुष्याने झोपावे असं विज्ञान सांगतं हे आई बाबांना कोण सांगणार? त्यांच्यामते मला अभ्यासाचं, परीक्षेचं टेन्शनच नाही असं सिद्धं झालं होतं. आणि मला रोज मला हे काय होतंय? असं वाटायला लागलं. खरं पाहिलं तर असं कुठे लिहिलंय की दहावीच्या विद्यार्थ्यांनी कमी झोपावं?? पण हे बाबा रोज मला इतके रागावायचे की मी उठल्याक्षणी आपण आठ तासापेक्षा किती जास्त झोपलो हे मोजायची. :p , तिला कुठलं तरी टेन्शन आहे म्हणून ती जास्त झोपते" असं Doctor म्हणाले, त्यामुळे मला कुणीही फार झोपते असं म्हटलं की मी सरळ माझ्यावर असलेल्या अतीव ढोंगी टेन्शन ची आठवण करून देत असे. बाबांनी मात्र लगेच त्या Doctor ला मू...