डिशवॉशर बद्दल बोलू कौतुके
मग आता डिशवॉशर घेतलाय का? काय फायदा सगळी भांडी धुवूनच तर लावावी लागतात वगैरे दूषणे देऊन माझ्या घरी एकदाचे डिशवॉशर चे आगमन झाले. बरेचसे कुतूहल आणि आपण घेतलाय खरा पण भारतीय भांड्यांकरता वापरता येईल का हे काही प्रश्न मला सतत भेडावत होते. चांगले ६-७ महिने अभ्यास करून मी ब्रँड ठरवला होता आणि अगदी वापरूनही पहिला डिशवॉशर मनातल्या मनात म्हणा ना ;).
काल पुलं च्या अपूर्वाई पुस्तकात इंग्लिश माणसाबद्दल बरेच वाचले. अतिशय सुंदर वर्णन आणि त्यात त्या काळातल्या लंडन च्या जीवनशैलीमध्ये त्यांनी अत्याधुनिक उपकरणांचा केलेला उल्लेख थोडा सुखावह होता. सुखावह असण्यास कारण हे की ५० वर्षानंतर का होईना माझ्यासारखी सर्वसामान्य भारतीय गृहिणी डिशवॉशर सारखे अत्याधुनिक उपकरण घेऊ शकते. आणि वापरही करते बऱ्यापैकी. मेट्रो किंवा ट्यूब बद्दल हि बरेच काही लिहिले होते, इतक्यात चेन्नई मध्ये मेट्रो साठी खणलेल्या भुयाराजवळून बस गेल्याने एक भयंकर खड्डा पडला रस्त्याला, त्यामुळे भारताची प्रगती गृहिणींनी केलेल्या उपकरणांच्या वापरावर अवलंबून नाही हे मला खटकन लक्षात आले :)
डिशवॉशर आता वापरून २ ते २.५ वर्षे झालीत. एकूण अतिशय छान उपकरण आहे. बरेचशी भांडी मी त्यात सर्रास घासायला टाकत असते. आता आमचा छोटासा फूड डिलिव्हरी चा एक उद्योग पण सुरु झालाय, त्यात काम करतांना खूपभांडी घासायला होतात. मग डिशवॉशर माझा एक महत्वाचा टीम मेंबर आहे हे मात्र नक्की.
डिशवॉशर घेतांना थोडी काळजी घेतली कि पुढे काही त्रास होत नाही हा माझा अनुभव
- ब्रँड
- भारतात बरेच ब्रॅण्ड्स आहेत डिशवॉशर चे म्हणजे एलजी, बॉश, सिमेन्स, आय एफ बी, पण मला सर्विसच्या दृष्टीने बघितले तर बॉश एकदम उत्तम आहे. एका फोनवर तमाम टेक्निशियन मंडळी हजर असते प्रॉब्लेम सॉल्व करायला. अजून प्रॉब्लेम काही आला नाही पण मी २ दा छान सर्व्हिस करून घेतली आहे. एकदा ते येऊन सगळं समजावून सांगतात की आपण उपकरण वापरायला मोकळे. बॉश ब्रँड अगदी उत्तम.
- कुठली भांडी वापरावीत
- स्टील ची, काचेची, मातीची भांडी, क्रॉकरी, फूड ग्रेड प्लास्टिक वगैरे अगदी बिन्दास्त धुवून निघते. प्लास्टिक चा वापर मी टाळतेच शक्यतो पण तरीही.
- स्टील चे मोठाले ( ५ किलो) पर्यंत चे डबे सुध्दा मी घासायला टाकते वेळ पडेल तशी. दुधाची , चहाची वगैरे सगळ्या प्रकारे अगदी खराब झालेली भांडी सुध्दा मी धुवायला टाकते. असंख्य कप, बश्या, वाट्या, चमचे, प्लेट्स , तेल तुपाची भांडी, मुलीचा डबा, बाबाचे डबे सगळं सगळं.
- हाताने घासायची भांडी / साबण सोडा
- एवढे घासूनही प्रसंगी असतातच भांडी घासायची हे मनात पक्कं करून घेणे महत्वाचे आहे.
- कढया पण घालता येतात पण त्या अलुमिनियम च्या असल्याने लख्ख निघत नाहीत. गाळण्या पण हातानेच धुतलेल्या बऱ्या प्लास्टिक च्या असतील तर.
- पण बाकीच्या भांड्यांना बाईची गरज नाही हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचे आहे.
- फिनिश म्हणून ब्रँड येतो त्याच्या टैबलेट्स, सॉल्ट आणि रिन्स एड अश्या तीन गोष्टी लागतात. त्या आपल्या नेहेमीच्या विम आणि बाई च्या खर्चाच्या निम्मा खर्चात मिळतात. चालतात ही भरपूर. पाणी कमी लागते. आणि स्वच्छ भांडी, स्टरलाईज झालेली... अजून काय हवे.
देवाचे पात्र, समया, निरंजन वगैरे हातांनीच घासून टाकते तरीही..अजून काही डिशवॉशर नाही वापरत त्याकरता.
'पण ओव्हरऑल १००% मार्क या उपकरणाला.. बाय बाय खरकटी भांडी आणि हॅलो डिशवॉशर.
Comments
Post a Comment