उसासे..


ढगाळ वातावरण हातात चहाचा गरम प्याला, आणि ऐकावं "मी मज हरपून बसले गं", दुस-या ओळीच्या शेवटी येणार्या "गं" वर एक लांब उसासा टाकावा..हा उसासा आपलं मन हरपून बसल्याच्या भावनेनं नाही तर आशाच्या कातील आवाजाने मनात उभ्या केलेल्या आपल्या नसलेल्या आणि गाणं म्हणता म्हणता तिच्या झालेल्या श्रीरंगाच्या आठवणीनं...
असे कितीतरी उसासे टाकायला लावणारे आणि आपलं अस्तित्व जाणवुन पुढे जाणारे क्षण या सगळ्याच प्रतिभावान व्यक्तींनी मोठ्या ताकदीने उभे केले आहेत...मग आशाचं "तरूण आहे रात्र अजुनी" गाणं असो..किंवा गुलजारची कुठलीही कविता..प्रत्येक कलाकृती देवत्व लाभल्यासारखी...ती कलाकृती त्याला निर्माण करणार्यांनी जेवढी जगली त्याहीपेक्षा अधिक त्या कलाकृतींनी तिचा आस्वाद घेणार्यांना जगवलं...प्रत्येक ओळीगणिक, प्रत्येक स्वरागणिक त्या सगळ्याच कलाकृतींनी हृदयाचा ठाव घेतला आणि उसासा टाकायला भाग पाडलं..
असे कित्येक उसासे..
"रातराणीच्या फ़ुलांचा..गंध तू लुटलास का रे?" म्हणतांनाचं आवाजातलं नेमकं मार्दव..आणि तेवढ्याच एका अनामिक आर्ततेनं म्हंटलेलं "सावन के कुछ मिठे मिठे पल रख्खे है".
ह्या सगळ्या ओळी जगली असेल नं आशा?
गुलजार-आशा-आरडी या त्रयींच्या संगमातून तयार झालेली गाणी म्हणजे अगदी अंत..त्यापुढे अक्षरशः काहीच नाही..मग  "आजकल पाव जमींपर नही पडते मेरे" चा अल्लडपणा असो किंवा "ज़िंदगी है...बेहने दो..प्यासी हू मै प्यासी रेहने दो" चा जिंदादिलपणा..."रातभर काजल जलें" ची एक बेचैनी असो...किंवा " आपकी बदमाशीयोंके  ये नये अंदाज है" म्हणतांनाचा खट्याळपणा...सगळंच सगळंच कसं...गगनाला भिडलेलं, उत्तुंग..मोठं...यासगळ्यावरही एकंच तोकडा उसासा टाकण्याशिवाय आम्हा पामरांकडे काही उपायच नाही..
एखाद्या शांत दुपारी..गुलजारचं एखादं पुस्तक उगाच हातात घ्यावं...उघडावं कुठलंही पान..आणि प्रत्येक पानातली प्रत्येक ओळ पुन्हा पुन्हा जगावी...त्याचा आवाज नं ऐकुनही ऐकल्याचा भास व्हावा..त्याच्या आवाजातला खर्ज पुन्हा पुन्हा अनुभवावा...आणि बस्स...एकच उसासा टाकावा...
"तुम्हारे हाथोंमे मैने अपनी लकीर देखी है सोना" म्हणणारी तुमच्यातली प्रेयसी असो...किंवा "छोटे थे..मा उपले थापा करती थी" वाचतांना उकीडवे बसुन आईला गोव-या थांपतांना  पाहिलेली लहानशी मुलगी असो...ह्या स्वतःच्या आयुष्यातल्या भूमिका पुन्हा पुन्हा जगायच्या आणि प्रत्येक उसास्याला एक महत्व प्राप्त करुन द्यायचं..नव्हे आभारंच मानायचे...गुलजारच्या निर्मितीवरची शब्दातीत प्रतिक्रिया केवळ एका उसास्याने व्यक्तं करता येते म्हणुन..
खरंतर कुठल्याही कलाकृतीच्या निर्मितीमागे निसर्ग ही एक प्रेरणा असु शकते..जो सगळ्यांसाठीच सारखा आहे..पण सुरेश भटांनी आपल्या कवितेत गुंफ़लेली रातराणी बाकी कुणालाही तितक्या प्रेमाने गुंफ़ता आली नाही, किबहुना माझ्या मनाला तेव्ढी भिडली नाही यातंच सगळंकाही आलं..ह्या सगळ्या  कलाकारांच्या ठायी असलेली प्रतिभा हेच ते आगळंवेगळं मिश्रण...मिडास टच...
ह्या सगळ्या कलाकृतींची अजुन एक खासियत म्हणजे तुमच्या मनस्थितीशी तिचं काही घेणंदेणं नसतं.....अजिबात नाही..
त्या सगळ्यांना फ़क्तं आपल्याला भरभरुन काहीतरी द्यायचं असतं...कधी उद्विग्न मनस्थितीत असतांना, ह्या कविता, ही गाणी, थोडक्यात हे एलिमेंट्स...चार शब्द सुचवुन जातील नाहीतर डोळ्यात अश्रुंचं एक मोठं तळं तरी करुन जातील..आनंदी असाल..तर आनंद द्विगुणित करतीलंच पण त्या आनंदातही अंतरंगात डोकावून पाय जमिनीवर ठेवण्यास मदत करतील..
कदाचित म्हणुनच गुलजार असो, आशा असो, आरडी असो..किंवा सुरेश भट असो...ह्यांसारख्या प्रतिभा पुन्हा बघणे नाही....पुन्हा जगणेच नाही

Comments

Popular posts from this blog

अविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

बाहुबली २