Skip to main content

दाक्षिणात्य खाद्य संस्कृती - पोंगल



जरा उशिराच का होईना, मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. अख्खा महाराष्ट्र जिथे मकर संक्रमण आणि उत्तरायण अनुभवत असतो तिथे थोड्या दूरवर ;) म्हणजे आपल्या तामिळनाडूमध्ये कापण्या सुरु झाल्या असतात आणि पोंगल चा सण अगदी दिवाळीसारखा थाटामाटात साजरा केला जातो. उसाचे ढीग, ओल्या हळदीचे धांडे आणि शेतातून नुकताच आलेला भात यासगळ्यांनी मन आणि घर अगदी भरून जातं. पोंगल म्हणजे तामिळ लोकांची दिवाळी असे म्हणायला  हरकत नाही. दिवाळी हे लोक अगदी एकंच दिवस साजरा करतात. पण पोंगल मात्र ४ दिवसांचा असतो. भोगी , थई पोंगल, माटू पोंगल, काणूम पोंगल असे चार दिवस सगळीकडे सुट्टी असते, सगळे आपापल्या गावी जातात म्हणजे चेन्नई हुन. तर असा हा पोंगल. पोंगल हे खरेतर एका पदार्थाचे नाव आहे. पोंग म्हणजे उतू जाणे. उतू जाणे म्हणजे समृद्धीचे लक्षण मानले जाते आणि पोंगल करतांना वरचे फेसाळलेले पाणी उतू जाऊ देतात पोंगल च्या दिवशी आणि पोंगालो पोंगल असे म्हणतात. मार्गळी महिना संपून थई महिना सुरु झाला म्हणूनही पोंगल ला थई पोंगल असे म्हणतात. भोगी च्या दिवशी सकाळी भयंकर धूर होता आकाशात,  जुन्या वस्तू जाळून घर स्वच्छ केल्या जाते ह्या दिवशी  अगदी पहाटे ४ वाजता लहान मुले ढोल बडवत सगळ्यांना उठवत  रस्त्यावरून आपला ताफा घेऊन जातात. पोंगल च्या दिवशी लागणारे  सगळे सामान  भोगीच्या दिवशी बाजारात दिसू लागते.
आदल्या दिवशीच्या तयारी बद्दल तामिळ लोकांचे मला अतिशय कौतुक आहे. पोंगल च्या दिवशी मोठाल्या रांगोळ्या प्रत्येक दारासमोर काढल्या जातात ते ही आदल्या रात्रीच जेणेकरून सकाळी फ्रेश रांगोळी तयार. दुसऱ्या दिवशी त्यात पुन्हा वेळ घालवण्याची गरज नाही. अजून एक म्हणजे घरात देवासमोर काढल्या जाणारी रांगोळी तांदुळाच्या पिठाची असते, रात्रीच काढून ठेवली की ती सकाळपर्यंत फरशीवर वाळून तयार असते म्हणजे पुन्हा वेळ वाचला.  तामिळ लोकांचे  पहाटेच्या प्रहरावर अतिशय प्रेम आहे. सकाळी लवकर उठणे आणि कामे भराभर आटपणे यात त्यांचा हातखंडा आहे. पोंगल च्या दिवशी सकाळी ७ पर्यंत पूजा आटोपून ही मंडळी निवांत जेऊन सगळ्यांकडे आशिर्वादाला जाऊन पण १ वाजता वामकुक्षी ला घरी येऊ शकते. ज्यांना ऑफिस आहे ते पूजा, जेवण आटोपून अगदी ट्रेन पकडून सुध्दा ऑफिस ला जाऊ शकतात. वक्तशीरपणा आणि वेळेचा सदुपयोग ह्या दोन गोष्टी तामिळ लोकांकडून अगदी शिकण्यासारख्या आहेत.
पोंगल म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी हळद नं घालता. आता ती शिजवण्यासाठी वेगळ्या पद्धती आहेत. कालच्या पोंगल मध्ये मला उकळी आणायचीच होती म्हणून माझ्याकडे असलेल्या एका पितळेच्या कळशी ला ओली हळद बांधली, त्याला चंदनाचे बोट लावले, ओट्यावर रांगोळी काढली, हळद कुंकू वाहिले,मागे ऊस लावला, पूजा केली,आणि मग मध्ये पाणी घातले, भाजलेली मुगाची डाळ आणि तांदूळ वरून घातले. थोडी उकळी फुटली की खूप मोठ्या मनाने भरपूर गुळ घातला, ४ चमचे साजूक तूप घातले आणि शिजू दिले. शिजत असताना फेस येतो त्याला पाहून पोंगालो पोंगल असे म्हणतात. तशी समृद्धी नेहेमी असावी सगळ्यांकडे अशी प्रार्थना करतात.
वेन पोंगल म्हणजे खारा पोंगल, मुगाची हळद नं घालता  खिचडी करायची त्यात शिजतांना मीठ  टाकायचे, आणि शिजल्यावर, वरून  तुपाची, कढीपत्ता, हिंग, मिरे, किसलेले आले  घालून फोडणी घालायची, वरून छान तळलेले काजू पण घालता येतात. वेन पोंगल  सोबत सांबर आणि मेदुवडा हे कॉम्बिनेशन आहे.
पूजा करताना वेतलई ( विड्याची पाने ), पाककु (सुपारी), पु ( फुले), पळम ( केळी ) आणि नारळ यांचे फार महत्व आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सगळे देवासमोर ठेऊन सगळ्यांकडे अशीच समृद्धी चिरंतन राहू दे अशी प्रार्थना केली आणि सगळ्यांनी शक्करई पोंगल चा फडशा पाडला.




पोंगल साठी कळशी तयार 

 पूजेची तयारी 
मेदुवडा 

ओली हळद 

वडे पोंगल नैवेद्य 

मागच्या  वर्षीची कोलम (रांगोळी)








Comments

Popular posts from this blog

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने.. त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता... http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं.... "Man In The Mirror" : - I'm Gonna Make A Change, For Once In My Li...

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस, २००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा.. हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता... बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण स...

इरुवर - तमिळ चित्रपटांचा मेरुमणी

तमिळ सिनेमा हा विषय मी ब्लॉगवर कधीच लिहिलेला नाही. आता १० वर्षे झालीत मद्रास मध्ये आणि बऱ्यापैकी तमिळ पण बोलता येतं, कळतं, म्हणून ठरवले की नेहेमी भाषांतर केलेल्या या नव्या जुन्या चित्रपटाबद्दल लिहावे. तामिळ ही खूप गोड़ आणि ओघवती भाषा आहे, अर्थात कुठल्याही भाषेसारखीच. पण या भाषेचा जन्म प्राकृत भाषेमुळे झाला. लिपी अतिशय सोपी असली तरी शब्द आणि त्याचे उच्चारण कठीण आहे. थोडे अजूनही कळत नाहीच ;) काही दिवसांपूर्वीच "इरुवर" चित्रपट पाहिला. इरुवर - म्हणजे दोघे - ऐश्वर्या चा पहिला चित्रपट म्हणून फेमस आहेच पण जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर या तीन पूर्व मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. मणी रत्नम चं दिग्दर्शन, ए आर रहमान चं संगीत. अजून काय हवे? मल्याळी अभिनेता मोहनलाल ( एमजीआर), ऐश्वर्या राय ( एमजीआर ची पूर्व पत्नी आणि जयललिता ) च्या भूमिकेत, प्रकाश राज ( करुणानिधी ) च्या भूमिकेत, रेवती आणि तब्बू या करुणानिधींच्या पत्नी. १९५० मधले सेट्स आणि त्याच काळचा प्लॉट. संतोष सिवन ची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तेव्हा संतोष सिवन अतिशय नवखे असतील पण तरीही खूपच सुंदर चित...