Skip to main content

दाक्षिणात्य खाद्य संस्कृती - रसम

चेन्नई मध्ये यावर्षी जास्त पाऊस झाला नाही. त्यावर्षी खूप थंडी असते त्यावर्षी पाऊस नसतोच असे आहे. एवढी थंडी मला तरी १० वर्षात पहिल्यांदाच जाणवली. थंडी आणि आर्द्रता सोबत असल्याने डोके सुन्न झाल्यासारखे वाटते आणि त्यावर एकाच उपाय घरोघरी वापरल्या जातो तो म्हणजे "रसम". मिरे, धने, जिरे , हिंग, लसूण टाकून केलेले आंबटगोड पण झणझणीत रसम म्हणजे या थंडीच्या दिवसात हवे हवेसे वाटते. त्याबरोबर मस्तपैकी गुरगुट्या भात आणि पापड म्हणजे अगदी स्वर्गसुख. रसम हे अनेक प्रकारे केल्या जाते. प्रत्येक घरची जवळपास पद्धत वेगळी असते. मी माझ्या यजमानांकडून  रसम शिकलेय. अप्रतिम रसम करतात ते आणि त्यांनी मला लगेच शिकवलेही. एकदम पाण्यासारखा  पातळ पण अतिशय गुणी असा हा पदार्थ माझ्या सगळ्यात आवडता आहे. आमच्या घरी कोणालाही सर्दी, ताप, खोकला झाला की रसम अगदी लगेच मदतीला धावून येते. औषधी गुणधर्म आणि अफलातून चव यांचा उत्तम मेळ म्हणजे रसम. सार म्हणजे रसम नव्हे. कर्नाटकात केले जाणारे सारू आणि आंध्रात केले जाणारे पूलसु हे सगळे सारखेच जरी वाटत असले तरी त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आजी मसालेभाताबरोबर जे सार करायची ते आणि रसम यांचा दूरदूरवर काहीही संबंध नाही. हे काय पाण्यालाच तर फोडणी द्यायची असते, पाणीच तर आहे ते म्हणणाऱ्या असंख्य लोकांना "एकदा तामिळ पध्धतीचे रसम करून दाखवा बघू असे म्हणावेसे वाटते." कारण एवढ्या वर्षानंतर आताशा मला छान रसम जमायला लागले आहे असे सगळे म्हणतात स्पेशली माझे सासरे.
टमाटर रसम, वेप्पम पू रसम ( कडुलिंबाच्या फुलाचे रसम), अननस रसम, पुंडू ( लसूण ) रसम, इंजि (आले) रसम,
कांदाथीपली ( लेंडी पिपरी) रसम , जिरे रसम, मांगा ( आंबा ) रसम, इलूमिची ( निंबू) रसम , शेवग्याच्या शेंगांचे रसम अश्या अनेक प्रकारे रसम केल्या जाते आणि प्रत्येकाचा वेगळा गुणधर्म आहे.
आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो कि Milagatawny असे सूप असते ते म्हणजे मिलागू तन्नी ( पेपर रसम) असते हे विशेष सांगावे वाटते.
आज थंडी आहे आणि सगळ्यांचे घसे खराब मग मस्तपैकी पुंडू ( लसूण) रसम केले.

 थोडीशी उडिद डाळ, मिरे, लाल मिरच्या, हिंग, लसूण, धने, जिरे  मस्तपैकी भाजून घेणे. त्याचा खमंग वास सुटतो. खूप करपट नाही, अगदी सौम्य भाजायचे. गैस बंद करून, एका मिक्सर च्या भांड्यात काढायचे थंड झाले कि त्याचे पावडर करून घेऊन काढून ठेवायचे. २ टमाटर मिक्सर मधून काढून घ्यायचे, थोडे पाणी टाकायचे मिक्सर मध्ये वाटताना. इकडे गरम पाण्यात चिंच भिजू टाकायची, भरपूर पाण्यात निंबाएवढा गोळा. खूप कोळ घट्ट होऊ देऊ नये, साधारण आंबट असावा. एका पातेल्यात हे चिंचेचे पाणी, टमाटर चे पाणी उकळायला घ्यावे, त्यात वरून हिंग, हळद टाकावी, हळद अँटिसेप्टिक असते म्हणून मी हटकून टाकते नाहीतर रंग पण येत नाही रसम ला. त्यात लसूण पाकळ्या ठेचून टाकाव्या, गोडलिंब ( कढीपत्ता) टाकावा, कोथिंबीर चिरून टाकावी, आणि मस्तपैकी एक उकळी येऊ द्यावी. एक उकळी आली की घरच्यांना एव्हाना कळून चुकते कि "रसम हो रहा है"
मग आपला मिक्सर मधला वाटलेला मसाला टाकावा. मीठ टाकावे आणि अजून थोडे स्पाईसी हवे असेल तर मिरीपूड टाकावी. बस्स एक दोन  उकळ्या आल्या की गैस बंद करावा. वरून फोडणी मी शक्यतो देत नाही पण तरीही द्यायची असेल तर थोड्या तेलात, लाल मिरच्या, गोडलिंब, हिंग आणि मोहरी ची फोडणी करावी. रसम वरून घालावी. हे साधे रसम झाले पुंडू रसम.

परपु रसम 
चिंच वरणाच्या पाण्यात भिजू घालायची आणि पुढील कृती वरच्याप्रमाणे

मिलागू रसम 
वरची कृती तीच पण त्यात मिरे जास्त प्रमाणात टाकायचे.

इलूमिची रसम 
यामध्ये चिंचेचा कोळ न वापरता पाण्यात निंबू पिळून ते पाणी वापरतात. बाकी कृती तीच. निंबाचा फ्लेवर मस्त लागतो बाकी मसाल्यासोबत

वेपम पु ( कडुनिंबाच्या फुलाचे रसम)
कडुनिंबाची फुले तुपात जराशी भाजून घ्यायची. वरील कृती करून एक उकळी आली की हि फुले रसम मध्ये टाकायची. मसाला वाटून टाकायचा आणि २ उकळ्या फुटू द्यायच्या. असे हे कडुनिंबाच्या फुलाचे रसम. उन्हाळ्यात केला जाणारा हा प्रकार पोटासाठी थंड असतो. तसेही रसम पाचनकारक

कांदाथीपली ( लेंडी पिपरी) रसम
कांदाथीपली म्हणजे लेंडी पिपरी, घरच्या घरी आपल्याजवळ इतके गुणकारी पदार्थ असतात की आपल्याला बाहेरच्या औषधींची गरजच नसते खरेतर. सर्दी, खोकला यावर रामबाण उपाय म्हणजे कांदाथीपली रसम. उडिद डाळ, मिरे, लाल मिरच्या, हिंग, लसूण, धने, जिरे आणि अगदी २ कांदाथीपली भाजून घेणे आणि वरची कृती करणे. गरम गरम कांदाथीपली रसम नी एकदम सर्दी पडसे कमी होते.

अननस रसम 
सगळी कृती करून झाल्यावर फ्लेवर साठी अननसाच्या फोडी टाकायच्या. थोडा फॅन्सी पण मस्त प्रकार.

नेल्लिका रसम ( आवळ्याचे रसम) 
रसम मसाला करत असतांना त्यात आवळ्याची( आवळे धुवून त्यांच्या बिया काढून टाकायच्या आणि उभे काप करायचे, मिक्सर मधून पेस्ट करून घ्यायची) पेस्ट टाकावी आणि वरील कृती करावी . ज्यांना आवळे आवडत नाही त्यांच्यासाठी नेल्लिका रसम मस्त आहे.

आंबा ( मांगा ) रसम 
कैरी धुवून घेऊन, त्याच्या फोडी वरण करतांना प्रेशर कुक, करायच्या. चिंच नं वापरता, हे पातळ वरणाचे पाणी वापरायचे रसम करतांना. उन्हाळ्यात करायचे रसम आहे हे. पेवंदि आंबा पण चालतो याकरता.

तर असे हे औषधीसारखे गुणकारी रसम. माझा आणि माझ्याकडच्या सगळ्यांचा अतिशय आवडता पदार्थ. मला सूप करण्यापेक्षा रसम सोपी आणि जास्त जवळचे वाटते. भारतीय खाद्यसंस्कृती अतिशय समृद्ध आहे. इतके वेगळे पदार्थ वापरून एकाच पदार्थ करता येतो हे किती वाखाणण्याजोगे आहे. प्रत्येक ऋतूनुसार रसम मध्ये वेगवेगळ्या वस्तू वापरता येतात.
उन्हं जास्त झाले की वेपम पु रसम, किंवा मांगा रसम, थंडी पडली की  पुंडू रसम, किंवा  कांदाथीपली रसम.
घसा बसला सर्दी झाली की मिलागू ( पेप्पर) रसम. This is my go-to option for a simple meal.


 सांबार वडा नं खाता इकडे रसम वडा खायची पद्धत आहे. मऊ  मेदुवडा मस्त सोक करत ठेवायचा रसम मध्ये आणि मग खायचा अशी सुंदर चव लागते कि काय सांगू .

माझ्या बहिणीकडे पार्टीसाठी हे स्टार्टर ठेवले होते आणि लोकांना खूप आवडला प्रकार.


एकदम व्हर्सेटाइल पदार्थ - रसम. आवडल्यास जरूर करून बघा.













Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी)

दाक्षिणात्य संस्कृती - कोलम (रांगोळी) या पोस्ट मध्ये खाद्यसंस्कृती बद्दल नं सांगता रांगोळ्या आणि तामिळ नाडू यांच्या असलेल्या घट्ट नात्याबद्दल बोलूया. रांगोळी म्हणजे मला तरी एखाद्या स्त्री ची अभिव्यक्ती वाटते. रांगोळी काढणारा पुरुष जरी असेल तरी त्याच्या मनातल्या तरल भावना त्या रांगोळीत उतरतात. अर्थात नेहेमीच्या रोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या म्हणजे गृहिणीची अभिव्यक्ती का हे मला नाही माहिती. पण अंगण झाडणे, सडा टाकणे, आणि रांगोळी काढणे  माझ्यासाठी एक थेरेपि आहे. आजकाल अपार्टमेंट आणि मोठाल्या इमारतींमुळे अंगण हा भागच नाहीसा झालाय घराचा, पण मागे आम्ही होतो त्या घरी मोठे अंगण होते. तामिळ नाडुत सगळ्या दारासमोर रांगोळी काढल्या जाते. अगदी अपार्टमेंट जरी असेल तरी अपार्टमेंट च्या मोठ्या दारासमोर रांगोळी काढली जातेच. इथल्या गल्ल्यांमध्ये समोरासमोरील घराच्या दारासमोर तर दोन्ही वेळेला रांगोळी काढल्या जाते. सकाळी ६. ०० ते ६.३० च्या दरम्यात सगळ्या स्त्रिया या कामात मग्न दिसतात. पहिले मला फार कुतूहल वाटे. एवढ्या सकाळी उठणे आणि पहिले काम म्हणजे रांगोळी. दिवस कसा  छान सुरु होत असेल असे वाटायचे. लग्न

दलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस

तामिळ चित्रपटांमध्ये मी सगळ्यात पहिले पाहिलेला चित्रपट म्हणजे दलपती. तामिळ भाषा जरी क्लिष्ट वाटत असली तरी ती सर्वांगसुंदर भाषा आहे. आपण मराठी किंवा इतर भाषिक लोक नेहेमी दक्षिणेकडच्या ४ भाषांची सारख्या वाटतात म्हणून खिल्ली उडवत असतो पण ह्या चारही भाषा कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अतिशय समृद्ध आहेत. चारही भाषांची एक स्वतःची चित्रपट सृष्टी आहे हे महत्वाचे. बाहुबली हे एक उत्तम उदाहरण. बरेच हिंदी चित्रपट, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांवरून प्रेरित असतात हे सांगणे नं लगे. तर असाच एक १९९०'स मध्ये तयार झालेला चित्रपट दलपती म्हणजे म्होरक्या किंवा प्रमुख किंवा सेनापती.  कर्ण आणि अर्जुन ह्या धर्तीवर आधारित असलेला हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. मामुटी, रजनीकांत आणि अरविंद स्वामी, शोभना आणि सगळे उत्तम कलाकार. इलैराजा यांचे संगीत आणि संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी. असे म्हणतात की मणी रत्नम चे सगळे चित्रपट सकाळी चित्रांकित करतात. त्यावेळी अतिशय सुंदर प्रकाश असतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग ते प्रत्येक शॉट मध्ये करून घेतात. ह्या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवते.  मणी रत्नम चे सगळे

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

दोसा हा पदार्थ नं आवडणारा माणूस विरळा. माझी आणि दोस्याची ओळख आमच्या शाळेच्या आनंदमेळ्यात झाली होती. एक डोस्याचा स्टॉल होता तिथे, माझ्या बेस्ट फ्रेंड च्या काकी चा. मी नं खाताच गर्दी पाहून मला लक्षात आलं होतं तेव्हा कि काहीतरी स्पेशल आहे दोस्यात. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे आई बाबा बाहेर जेवायला घेऊन जायचे, मग खायचे काय तर डोसा, जगत नावाचे नागपूरला खूप प्रसिद्ध हॉटेल होते, अर्थात आता मॉल आणि मोठमोठ्या बिल्डींग्स असलेले नागपूर नव्हते तेव्हा उणीपुरी २ ते ३ फॅमिली रेस्टॉरंट्स. त्यात आर्य भवन एक आणि एक जगत. आई म्हणायची जी वस्तू आपण घरी जास्त करत नाही ती बाहेर खावी. म्हणून मोठ्ठा क्रिस्पि दोसा त्यात बटाट्याची भाजी, सोबत चटण्या. एकदम पोटभर व्हायचा तो मसाला डोसा. मी ९ वी, १० वी त असतांना आई घरीच डोसे करायची. पुढे कॉलेज मध्ये घेल्यावर वगैरे बाहेर खातांना डोसा हा पदार्थ बऱ्याचदा खाल्ल्या जायचा.  आता गेल्या १० वर्षांपासून चेन्नई मध्ये स्थायिक असल्याने, दोसा हा दाक्षिणात्य संस्कृतीचा किती अविभाज्य घटक आहे हे कळून आले. माझ्या घरी डोश्याचे पीठ नाही असा एकही दिवस जात नाही. जसे मराठी घरांत कणिक