Pages

Monday, February 15, 2010

Valentine Momentsतिने त्याला पाहीलं अगदी पहील्यांदा, ओझरतंच. ..मळकीच टी शर्ट घातलेला आणि घामघुम झालेला तो..तिला आवडला? कळलं नाही तिला तिचंच...
क्लासमध्ये रोज उशीरानेच होणारी त्याची एंट्री..पण त्याच्या त्या उशीराच येण्याची वाट पाहणारी ती..तो दारात आल्या आल्या तिच्या काळजाचा ठोका चुकायचा...
शेवटच्या बेंचवर बसुन सिंसिअरली क्लास अटेंड करणा~यापैकी तो, ती आणि आणखी काही मुलं...त्याच्या रेखीव बोटांना त्याच्या नकळत न्याहाळणारी ती..हरवुन बसायची स्वतःला..
त्याच्या येण्याने तिच्या मनातला गुलमोहर बहरला होता, त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण आपण आयुष्यात अनेकानेक वेळा अनुभवावा असं तिला सारखं वाटायचं..पण हे नक्की का होतंय याचा मात्र तिला अजिबात पत्ता लागत नव्हता...
त्याचा सहवास तिच्यासाठी एक समृध्द करणारा अनुभव असायचा. आपली सगळी स्वप्न आपण याच्यासोबतंच पूर्ण करु शकु असा विश्वास तिला कोण जाणे कुठुन येत असे. 
एक अशीच संध्याकाळ, सुर्याने आपल्या सुंदर रंगाची उधळण करुन फुलवलेली, ती आपल्या घराच्या गैलरीत संतूरवर वाजवलेला राग यमन ऐकत होती. वाफ़ाळत्या चहाच्या घोटाबरोबर त्याची स्वप्ने पाहण्यात रंगून गेली होती. 
दारावरची बेल वाजली तशीच ती उठली आणि बघते तर काय..तो प्रत्यक्षात समोर. त्याचा तो मुग्ध करणारा एक नेहमीचाच सुवास, नुकतंच शावर घेउन आल्यासारखे त्याचे केस..आणि तीच आर्त नजर..ती त्याला बघतंच राहीली...
एव्हाना दिवेलागण झाली होती.."गच्चीवर जायचं थेट?" ह्या प्रश्नाने ती भानावर आली. एक तर त्याचा सहवास आणि कातरवेळ.ही वेळ तो असला तरी आणि नसला तरी नेहमीच जीवघेणी असते असा विचार तिच्या डोक्यात सुरु होता. दोघे खरंतर गच्चीवर नेहमी यायचे, गप्पा मारायचे आणि थोड्या वेळाने तो परस्पर घरी निघुन जात असे. पण आजची संध्याकाळ थोडी विचित्र होती असं तिला वाटत होतं. नेहमीच्या जागेवर बसायच्या आधी त्याने तिचा हात धरला आणि डोळ्यात डोळे घालुन म्हणाला " मला तू खुप आवडतेस" तिला क्षणभर सुचेनासं झालं. "मला ही तू खुप आवडतोस" असं नं म्हणता त्याच्या डोळ्यात अधाशासारखी पाहत राहीली..जणु तिला आज त्याच्याकडुन खुप काही ऐकायचं होतं...तसं च्या तसं जसं तिच्या मनात चाललं होतं.
आता तो नुसता तो राहिला नव्हता तिचा "सखा" झाला होता. 
रस्त्यावरच्या दिव्यांची रांग बघतांना तिचं मन "एक दिन दिल की राहों मे अपने लिये जल उठेंगे मोहब्बत के इतने दिये मैने सोचा नं था" ही ओळ गुणगुणत होतं..
_________________________________________________________________________________


सकाळपासुन तॊ कुठे आहे याचा पत्ता नाही..नेहमी सकाळी एकदातरी फोन करणारा तो आज कसा काय विसरला असं वाटुन ती अधिकच अस्वस्थ झाली.
रविवारची कामं आटपत तिने त्याचे विचार थोड्याबेळापुरता का होइना बाजुला सारायचा प्रयत्न केला. 
"तेरे आने की जब खबर मेहके, तेरी खुशबु से सारा घर महके" त्याचं येणं आणि तिचं हे गाणं मुद्दाम गुणगुणणं हे काही नवीन नव्हतं..आज अचानक हेच गाणं ओठी यावं याचं तिला आश्चर्यच वाटलं. चलो,
 आप नही तो आपकी याद में ये गाना ही सही म्हणत ती खुश झाली..
या रविवारी सगळे मित्र घरी येणार होते. या दिवसाची ती मनापासुन वाट पाहत होती. हळुहळु मित्र मंडळी जमा झाली..गप्पा रंगायला लागल्या..मग कुणीतरी पिझ्झा मागवला आणि पोटोबाही झाला....खुप दिवसांनी अशी दिलखुलास मैफ़ल रंगली होती....तिच्या एका मित्राने गिटार काढले आणि झाली गाणी सुरु...
आजकाल तिच्या प्रत्येक गाण्याला त्याच्यामुळे अर्थ प्राप्त झाला होता. तिचं एरवीचं काळं पांढरं (तिच्याच शब्दात ;) ) असणारं लाईफ़ तो असला आजुबाजुला की रंगीत दिसायला लागायचं..
तो जवळ नसला की लागणारी ओढ आता तिला विलक्षण जाणवायला लागली होती. एक एक गाणं तिच्या काळजाचा ठाव घेत होतं..
कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणुन ती स्वतःला मैफ़िलीत झोकुन देण्याचा प्रयत्न करत होती..
"तुम्हारी आंखोमें हम सारी दुनिया भूल जाते है" ती म्हणायला लागली...त्याच्या डोळ्यांत साठवलेल्या तिच्या विश्वाला आठवून..नेहमीप्रमाणेच तिच्या गाण्याला सगळ्यांनी दाद दिली...पण दाद देणा~यांमध्ये तिचा सखा नव्हता..त्याचं तिला वाईट वाट्लं..
आजचा सोन्यासारखा रविवार..आणि त्याने एक फोनही करु नये..याची तिला प्रचंड चीड आली होती..तिच्या एकाही मित्रमैत्रिणीने त्याच्याबद्दल अजिबात उल्लेख नं केल्यानेही तिला वाईट वाटलं होतं..तिनेही मुद्दाम फोन करणं टाळलं..
संध्याकाळ झाली तशी तिने सगळय़ांसाठी चहा केला..रात्री सगळे सोबत जेउनच जाणार होते..त्यामुळे त्याला फोन करुन बोलवुन ही त्याच्या सोबत एकांतात बोलणं होणारंच नव्हतं. त्याला फोन नं केलेलाच बरा..असं तिला वाटलं..
कशी ही विचित्र ओढ, सगळे सोबत असतांनाही एकटं वाटणं, डोक्यात सारखं त्याच्याबद्दलचेच विचार असणं..आणि त्याचा एकही फोन नाही..कधीकधी तिला स्वतःचीच चीड यायची....तिला खुप हतबल वाटायचं.
दिवसभरचा थकवा आता जाणवायला लागला होता..रात्रीचे ११.४५ वाजले होते..सगळी मंडळी जेवुन खावुन घरी गेली..आता घरात फ़क्तं ती आणि तिची एक मैत्रिण..
तिने हातात डायरी घेतली लिहायला..आजचा दिवस तसा खरंच वेगळा होता. ..सगळे सोबत असल्यावर येणारी मजा तिने खुप दिवसांनी अनुभवली होती...एवढ्या दिवसांनंतर पहील्यांदाच त्याने तिला दिवस्भरात एकही फोन केला नाही..आणि तो भेटायला ही आला नाही..रुखरुख तर होतीच मनात पण ठिक आहे म्हणुन तिने उसासा टाकला.
तिच्या मैत्रिणीने तिला जबरदस्ती गैलरीत नेलं...बघते तर काय..खाली तो उभा होता....एवढ्यात तिचा फोन वाजला.."तुला काय वाटलं? मी विसरलो तुला? I cant live without seeing you".  ती हसली "वेडा आहेस तू" म्हणुन तिने फोन ठेवला...
सकाळपासुन लागलेली रुखरुख कधीच पळाली होती..

Friday, February 5, 2010

भटकंती...१

१ फ़ेब्रुवारीला लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं..गेलं एक वर्ष मी आयुष्यातले खुप आगळेवेगळे दिवस पाहिले ज्याचा ध्यानी मनी स्वप्नी विचारच नव्हता केला..इथे आल्यापासुन प्रत्येक दिवस एक मोठ्ठं आव्हान घेऊन यायचा. पण खुप मजा आली. रोज काहीतरी नवीन असावं असं वाटणार्या मला देवाने खुप नवीन नवीन गोष्टी करायला दिल्या  याचंच खुप समाधान वाटलं मला या लग्नाच्या वाढदिवशी..
तमिल नाडु सारख्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या राज्यात राहणे हे माझे अहोभाग्यच पण त्यासोबत  माझ्यासारख्याच आवडी असणारा नवरा मिळाला हे ही माझे भाग्यच.
आम्ही दोघेही स्थापत्य अभियंता असल्याने स्थापत्य शास्त्राचे प्राचीन नमुने आमच्यासाठी नेहमीच कुतुहलाचा विषय राहिलेले आहेत. आणि एवढी प्राचीन स्मारकांची संपत्ती लाभलेल्या या प्रदेशात भटकंती न केल्यास नवल..
इथली देवस्थाने आणि शिल्प हा आमच्या दोघांचा जिव्हाळ्याचा विषय. आम्ही गेल्या एका वर्षात भेट दिलेल्या पर्यटन स्थळांबद्दल आणि त्यांच्या इतिहासाबद्दल इथे लिहायचा प्रयत्न करतेय.
________________________________________________________________________________
तमिळ संस्कृतीत देवस्थानांना खुप महत्वाचं स्थान आहे. असं म्हणतात की तमिल नाडुत जवळपास ३३००० प्राचीन देवस्थाने आहेत.
भारताच्या दक्षिणेकडील ह्या भागावर ७ व्या दशकात पल्लवांनी ८ व्या दशकात पांड्यांनी आणि ९ व्या दशकात चोला राजांनी राज्य केलं. प्रत्येक राजवटीत राजांनी आपापल्या कारकीर्दीत बांधलेली ही वास्तुशिल्पं आणि देवस्थाने म्हणजे शिल्पकलेचे आणि स्थापत्यशास्त्राचे अत्यंत सुंदर नमुने आहेत. असं म्हणतात की या राजवटी म्हणजे दक्षिण भारतातील स्थापत्यशास्त्रासाठी आणि शिल्पशास्त्रासाठी सुवर्णकाळ होता. प्रत्येक राजवटीत बांधलेल्या वास्तुंची मांडणी वेगवेगळी आहे हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे.
पल्लव राजे राजसिम्हावर्मन आणि नरसिम्हावर्मन यांच्या काळातली शिल्पं चेन्नै पासुन जवळच असलेल्या महाबलीपुरम इथे आहेत.

ही शिल्प तीन प्रकारात विभागल्या गेली आहेत. गुहेसारखी मंदिरं, एकाच दगडापासुन तयार केलेली शिल्पं, एकाच रिलीफ़ असलेल्या दगडावर केलेले कोरीव काम, आणि दगडावर दगडं ठेवुन केलेलं बांधकाम.
एकाच दगडापासुन कोरलेल्या शिल्पात पांडवांच्या वेगवेगळ्या पंचरथांचा समावेश होतो.

 ह्या रथाला असलेल्या खांबांवर खाली सिंह कोरलेले दिसतात पण काही खांब कोरीव नाहीत. काही रथं थोडेसे अर्धवट अवस्थेतही दिसतात.


इथे एक खुप अनोखी गोष्ट पहायला मिळाली ती ही की, शिल्पकार दगड फ़ोडायला प्रत्येक मोठ्या दगडाला एका ओळीत चौकोनी छिद्र करुन त्यात त्याच आकाराचे लाकडी ठोकळे भरायचे. एका पावसानंतर हे लाकडी ठोकळे फ़ुगतील आणि दगडाला तडा जाईल असा साधा सोपा विचार त्यामागे असे..अमेझिंग...


इथलं शोअर टेंपल पाहण्यासारखं आहे. ही शोअर टेंपल ची वास्तु अगदी समुद्राकाठी आहे. असं म्हणतात की समुद्राच्या आत अशीच सात मंदिरं आहेत.हे मंदिर एकाच दगडात कोरलेलं नसुन याचे पाच मजले एकावर एक दगडं ठेवुन बांधलेले आहेत. या मंदिरात शिव ही मुख्य देवता आहे. पण विष्णुचंही छोटसं मंदिर आहे. आता या मंदिराच्या आत जायला मनाई आहे.गावाच्या मध्यभागी एकाच रिलिफ़ असलेल्या दगडावर बरंचसं कोरीव काम केलं आहे त्यात अर्जुनाची तपश्चर्या आणि पौराणिक कथांचा समावेश होतो.
 हे सगळं ग्रेनाईटवर कोरलेलं आहे, त्या दगडाला तोडणं खुप कठिण काम असल्याने कदाचित एकाच मोठ्या दगडाचा कैनवास वापरला असावा.


महाबलीपुरम मध्ये होणार्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी हा मोठा दगड मागच्या पडद्यासारखं काम करतो.. आणखीही बरीच शिल्पे आहेत इथे पण वेळ नेहमीच कमी पडतो. त्यावेळच्या लोकांची शिल्पकलेतली निपुणता थक्क करुन टाकते. कुठ्लीही मशीन नसताना केवळ हाताच्या सहाय्याने केलेलं काम बघता बघता हरखुन जायला होतं.. आणि मग आपण वळतो एखाद्या दुकानाकडॆ ज्यात असाच एखादा शिल्पकलेचा नमुना मिळेल जो महाबलीपुरम आणि तिथल्या कुशल कारागीरांची आठवण म्हणुन घरात ठेवता येईल.