Pages

Tuesday, December 29, 2009

अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय ..

प्रिय आईस,

२००९ संपायला अजुन १ दिवस बाकी आहे आणि सगळे विचारतायत कसं साजरा करणार? तू पण असंच म्हणायचीस..की अगं ३१ डिसेंबर कुठल्याही वर्षाला एकदाच येतो..तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणुन त्या वर्षाला आनंदाने निरोप द्यायचा..पण १ जानेवारीला सकाळी लवकर उठुन दिवस साजरा करायचा..हम्म!! तुझं सांगणं नेहमीच पटायचं आणि आजही पटतं..मोठ्ठं झाल्यावर सुध्दा..
हे अजुन एक वर्ष तुझ्याशिवाय गेलं..म्हणजे तुझ्या जिवंत अस्तित्वाशिवाय.. तू पुढच्या प्रवासाला लागली असशीलच गं पण तरीपण मला तुझा वावर अजुनही जाणवतो अपवाद फ़क्तं मी दिवाळीत बेसनाचे लाडु केले तेव्हाचा...मला काहीच सांगितलं नाहीस आणि ते लाडु खुपच खराब झाले...थोड्या वेळ मीच घाबरले होते की का तू असल्याचं जाणवत नाहिए? पण नंतरचा प्रत्येक दिवस तुझ्या असण्याची हमी देतच होता...
बरेच बदल झालेत यावर्षी...माझं लग्न झालं हा सगळ्यात मोठा बदल...लग्न झाल्यावर बाबांना आणि मला तुझ्या आठवणीने खुप भरुन आलं. छकु नेहमीसारखीच शांत होती..सगळ्यांनाच जाणवली तुझी कमतरता पण कुणी आम्हाला वाईट वाटेल म्हणुन बोलुन दाखवलं नाही..चंचल मावशीने "माय मरो मावशी जगो" ही म्हण सार्थ ठरवली..तिच्या असण्याने मला बाबांना आणि छकुला खुप आधार वाटला.ती नेहमीच आम्हा तिघांची काळजी करत असते.. माझ्या लहानपणीची चंचल मावशी जशी होती तशीच अजुनही आहे ती.
आजी ला सगळा सोहळा बघतांना तुझी आठवण आली असेलच आणि पाणीही आलं असेलच तिच्या डोळ्यात पण तिने कुणाला काही सांगितलं नाही..शेवटपर्यंत आपल्या अश्रुंना डोळ्यातच साठवुन ठेवलं होतं तिने..
साड्या घेतांना तुझ्या आवडीच्या पद्धतीच्याच साड्या घेतल्या सगळयांना..आणि तुझ्या टेलरकडुनच मी माझे कपडे शिवुन घेतले..बांगड्याही आपल्या नेहमीच्याच "भोकन्याच्या" दुकानातुन घेतल्या..त्याला आवर्जुन सांगितलं की माझी आईही इथुनच घ्यायची बांगड्या...
डाळींबी रंगाच्या बांगड्या पाहुन तुझा नेहमी बांगड्या  भरलेला गोरा गोरा हात आठवला..आणि रहावलं नाही म्हणुन सगळ्यांसोबत तुझ्यासाठीही घेतल्या "डाळींबी" रंगाच्या बांगड्या..
सगळे रमतात तशी मी ही रमले संसारात..तु केलेली प्रत्येक गोष्ट आठवत आणि तसंच करत..तू सगळं इतकं छान करायचीस की तुझ्या अनुकरणामुळे माझं सासरी अजुनही सतत कौतुक होत असतं..
बाबाही आता थोडे सावरलेत....मध्ये थोडी तब्येत बिघडली होती पण आता बरे आहेत..त्यांनी जिम लावलंय..व्यायामाचं त्यांना किती वेड होतं आठवतं ना? आणि आपण त्यांच्या दोन दोन तासाच्या फिरण्यावर कसे हसायचो? त्यादिवशी स्टिम घेतली त्यांनी आणि मला फोन केला लगेचच..मला खुप छान वाटतंय म्हणुन..मलाही त्यांना बघुन तीन महीने होत आलेत..येत्या महीन्यात येणार आहेत ते आणि छकु..
तुझ्यासाठी मोठ्ठं सरप्राईज म्हणजे छकु आता "छरहरी" झालीए..तिने १५ किलो वजन कमी केलं...तुला तिची फ़ार काळजी वाटायची नं? आता ती खुप छान दिसते..ती यंदा आली की तिला मी मस्तं वेस्टर्न फ़ॊर्मल्स घेऊन देणार आहे..तुला आठवतं आपण असेच तासन तास तिला काय छान दिसेल च्या गप्पा मारायचो..तिला लहानपणीपासुन कधीच मापाचे कपडे मिळायचे नाहीत आणि आपण हसायचो...गुड ओल्ड डेज..!!
तू गेल्यावर घर सावरलं ते तिनेच कारण मी मुंबईला होते..तिची मनस्थिती तेव्हा खुप वाईट होती पण ती ही सावरली आता..एमबीए एन्ट्रंस दिलीए तिनी यंदा..नेहमीसारखाच तिने याही वर्षी खुप अभ्यास केला आहे..तू असती तर तिला ईंग्रजीत किती मदत झाली असती असं सारखं म्हणत असते..
स्वयंपाकात बाबा पारंगतच होते पण आता छकुही झाली आहे..दिवाळीत "जावयाला" वडा पुरणाचा पाहुणचार केला तिने..छान झाली होती पुरणपोळी..तू गेल्यापासुन कसलंच अपरूप राहीलं नाहीए..आला दिवस गेला दिवस असंच होतं..पण काही दिवस साजरा करावेच लागतात..जसं आम्ही दिवाळीत केलं..बाबांना जबरदस्ती २ टी शर्ट्स घेतले..छान दिसतात ते टी शर्ट आणि ट्राउजर्स मध्ये..
हे सगळं तुला माहीत असणारंच गं..पण तरीही सांगावंसं वाटलं..अजुनही बरंच काही आहे पण ते शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही..
फ़क्तं एवढंच आवर्जुन सांगावं वाटतं की तू होतीस तेव्हाच जगण्याला अर्थ होता..मरणालाही अर्थ प्राप्त होईल कारण त्यात तुझ्या भेटीची आस असेल..
तोवर भेटत राहुच अधुन मधुन स्वप्नांमध्ये..

तुझी,
मुग्धा

Sunday, December 27, 2009

टॅगले कुणी मला...

उत्तरे द्यायला बराच उशीर होतोय..पण मुहुर्तच येत नव्हता निवांत बसुन लिहायचा..


Where is your cell phone?
बॅगमध्ये आहे...

2.Your hair?
आज आनंदी आहेत..

3.Your mother?
माझं दैवत...

4.Your father?
कूलेस्ट....

5.Your favorite food?
मांसाहार सोडुन काहीही...

6.Your dream last night?
 खुप सारे सांताक्लॉज बेल्स वाजवतायत...

7.Your favorite drink?
रेड वाईन...

8.Your dream/goal?
स्वतःचं फुड चेन सुरु करायची आहे...

9.What room are you in?

ऑफिसमध्ये

10.Your hobby?
गाणं म्हणणे...तसा रोज नवीन छंद जडतो मला...

11.Your fear?
एकटेपणा...

12.Where do you want to be in 6 years?
एक यशस्वी व्यावसायिक...

13.Where were you last night?
घरी

14.Something that you aren’t diplomatic?
लाईफ़...

15.Muffins?
नवर्याला आवडतात..

16.Wish list item?
हजारॊं ख्वाईशें ऐसी...

17.Where did you grow up?
भंडारा, नागपूर..

18.Last thing you did?
घरुन ऑफिसला आले..

19.What are you wearing?
सलवार कुर्ता...

20.Your TV?
तमिळ बोलत असतो सारखा...

21.Your pets?
नाहियेत...

22.Friends
आहेत बरेच..

23.Your life?
कूल....

24.Your mood?
मस्तं...

25.Missing someone?
आई...

26.Vehicle?
इंडिका झीटा..

27.Something you’re not wearing?
पैंजण..

28.Your favorite store?
स्टेशनरी...

29.Your favorite color?
कुठलाही रंग...

30.When was the last time you laughed?
काल...

31.Last time you cried?
परवा..

32.Your best friend?
नवरा,बहीण

33.One place that you go to over and over?
स्वयंपाकघर...

34.One person who emails me regularly?
कुणी नाही...

35.Favorite place to eat?
चेन्नईत कर्पगंबाल मेस...

मी कुणाला Tag करु?

Monday, December 7, 2009

ये जमीं चांद से बेहतर नजर आती है हमें..

जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें..
ये जमीं चांद से बेहतर नजर आतीं है हमें..

सुर्ख फुलोंसे मेहक उठती हैं दिल की राहें
दिन ढलें यूं तेरी आवाज बुलाती हैं हमें...

याद तेरी कभी दस्तक कभी सरगोशी से
रात के पीछ्ले प्रहर रोज जगाती है हमें..

हर मुलाकात का अंजाम जुदाई क्युं है..
अब तो हर वक्त यही बात सताती है हमें..

ये जमीं चांद से बेहतर नजर आती है हमें..


वर्गात बसुन डेस्कवर सुंदर सुंदर गाणी लिहीणार्या माझ्या मैत्रिणीसाठी..नेहासाठी...!!

Tuesday, December 1, 2009

आवर्तन

आज पुन्हा पावसाचं येणं एखाद्या जुन्या पावसासारखंच वाटलं....आजही बाहेर पडणार्या पावसाचा आवाज तस्साच येतोय जसा पूर्वी यायचा..मला आजीकडे असतांनाचा पावसाळा आठवत नाही. महालातल्या घराला मोठे अंगण नव्हते तरीही आम्ही मुले हरदासांच्या अंगणात जाउन पाऊस बघायचो...हे नक्की आठवतं..घराच्या दारापुढे पावसाचे पाणी वाहत असतांना येणारे बुडबुडे अजुनही तस्सेच आहेत..त्यांचा वाहत जायचा ओघ ही तसाच...तोच थोडा कथ्था थोडा चॊकलेटी रंग पावसाच्या पाण्याचा...काही गोष्टी कधीच बदलत नाहीत..
-------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या आजुबाजुला होणार्या गोष्टी नुसत्या एकेरी होत नसतात तर संपूर्ण आयुष्यात त्यांची आवर्तने होत असतात असं नवीन घरात आल्यापासुन असं वाटत आहे
शिफ़्ट झाल्यापासुन नव्या घराबद्दल लिहीणंच झालं नाही...लहानपणी हरदास काकुकडॆ डायनींग टेबल ला लागुन एक मोठ्ठी खिडकी होती..मोठ्ठी म्हणजे त्यावेळी माझ्या मानाने मोठी...मोठ्या, उभ्या गजांआडुन बाजुचं विश्व पाहण्यात मजा येत असे. त्यात मी अगदी मांडी घालुन बसायची..आणि काकूनी दिलेला आव्वा खायची..तशीच खिडकी आता या नव्या घराच्या पहील्या खोलीत आहे म्हणुन का कोण जाणे मला हे घर पाहताक्षणी आवडलं.
लहानपणी आजीच्या घरची विहीर, त्यावर लोंबकळणार्या जास्वंदाच्या फ़ांद्या...पिवळ्या फुलांचं झाड, गच्ची, कपडे धुण्याचा ओटा, भलंमोठं आंब्याचं झाड, तुळशी वृंदावन यासगळ्यावर माझा खुप जीव होता आणि अजुनही आहे...
आत्ताच्या नवीन घराच्या स्वयंपाकघरातही तेवढ्याच मोठ्या दोन खिडक्या आहेत. बाजुला मोठ्ठी गच्ची आणि कडेला जुन्या पध्दतीचा कपडे धुण्याचा ओटा आहे...गच्चीच्या कठड्यावरुन डोकावणारं पिवळ्या फुलांचं झाड तसंच आहे अगदी लहानपणीसारखं. बाजुलाच एक भव्य आम्रवृक्ष आणि खाली मोठ्या दरवाज्याच्या शेजारी एक छोटं आणि छान तुळशी वृंदावन आहे.
घरमालकांच्या पडवीत तुळशीला दिसेल असा कृष्णाचा फोटो आहे. आणि परसात एक आडाची जुनी विहीर..
हे सगळं पाहुन काहीच बदललं नाहीए असंच वाटलं...आपण ज्यांच्यावर जीव लावतो त्या वस्तु आपल्याला अश्याच आयुष्यातल्या कुठल्यातरी आवर्तनात भेटत असतात...याला अपवाद माणसांचा..एखाद्या आवर्तनात एखादं माणुस भेटलं आणि पुढे त्याची साथ सुटली की ती कदाचित नेहमीकरताच असते...आपणंच खुप प्रयत्न करतो शोधाशोधीचा..
-------------------------------------------------------------------------------------------------------------
परवा स्वप्नात आई दिसली...पूर्ण रात्रभर दिसत राहिली..थोड्यावेळासाठी या सगळ्या निर्जीव वस्तुंसारखी पुन्हा माझ्या आयुष्यात आई आलीए की काय असं वाटल..
सकाळी उठल्यावर अर्थातच लक्षात आलं की असं काही झालेलं नाहीए...
-------------------------------------------------------------------------------------------------------------
हे घर ही शेवटी भाड्याचंच, कधी ना कधीतरी सोडुन जावं लागणारंच तेव्हा या निर्जीव वस्तुंना सोडुन जातांना माझ्याइतकंच त्यांनाही दुःख होईल का? पुन्हा येतील या सगळया वस्तू माझ्या आयुष्यातल्या एखाद्या आवर्तनात माझ्या भॆटीसाठी?? प्रत्येक व्यक्तीकडुन अपेक्षा करण्याची माणसाची खोड तशी जुनीच पण मी तर चक्क निर्जीव वस्तुंकडुन अपेक्षा करायला लागली आहे...
माझंच मला काहीतरी करायला हवं ;)