Pages

Friday, November 20, 2009

तेरा होने लगा हुं....

एखाद्या गाण्यानी वेड लावायची ही काही पहीलीच वेळ नव्हे..याआधीही असंख्य गाणी आवडली अगदी वेड्यासारखी पुन्हा पुन्हा ऐकली, गळ्यात उतरवली, मैत्रीणींसमोर गायली, सख्यासाठी गुणगुणली. पण नव्या गाण्यांमध्ये बर्याच दिवसांनी मला हे गाणं खुप आवडलं. प्रत्येक सूर प्रत्येक शब्द अगदी थेट काळजाचा ठाव घेतो. मी हा चित्रपट पाहीला नाही.. ह्या गाण्याच्या क्लिप्स पण बघितल्या नाहीत पण कोण जाणे एक एक शब्द इतका छान गुंफ़लाय की आपल्याला आतवर कुठेतरी गाणं ऐकल्याचं समाधान मिळत राहतं..
सख्याचं आपल्या प्रेयसीला साद घालणं आणि तिचंही त्याचं प्रेम स्विकार करतांना " माझंही तुझ्यावर प्रेम आहे" हे सांगणं मला खुप भावलं.
अतिफ़ अस्लम चा आवाज आणि त्याचा प्रत्येक स्वर एखाद्या प्रेमात पडलेल्या मुलीला तिच्याच प्रियकराचा वाटावा इतका नेमका आहे. अलिशाचा आवाज एकदम सेंशुअस. गाण्याची सुरुवातच मुळी अप्रतिम...
Shining in the setting sun like a pearl upon the ocean come on feel me Girl feel me
Shining in the setting sun like a pearl upon the ocean come on heal me Girl heal me
हे ऐकुन तर सुर्यास्ताच्या वेळीचा समुद्राला सुखावणारा सूर्यच आठवतो..एखाद्या प्रियकराला, प्रेयसीसोबत व्यतीत केलेला प्रत्येक क्षण असाच सुखावणारा वाटत असावा...जसा जसा सूर्य अस्तास जातो आणि काळोख पसरायला लागतो तेव्हा जशी समुद्राला हुरहुर वाटत असावी तशीच प्रियकराला वाटत असावी....त्याचा प्रेयसीरुपी सूर्य पुन्हा क्षितीजावर येईस्तोवर :) नाही??
अतिफ़ अस्लम चं "तेरा होने लगा हु...जबसे मिला हु" इतकं प्रामाणिक वाटतं की एखाद्या मुलीने ते ऐकुनच त्याचं प्रेम स्विकारावं.
"ऐसे तो मन मेरा पेहले भी रातों मे अक्सर ही चाहत के हां सपने संजोता था
पहले भी धडकन ये धुन कोइ गाती थी पर अब जो होता है वो पहले ना होता था"...हे त्याचं तिला नं राहवुन सांगणं..आणि तिथे एका क्षणासाठी सगळं थांबणं...फ़क्तं तिच्या होकारासाठी... तिचंही अगदी खोडसाळपणे त्याला "हुआ है तुझे जो भी जो भी, मुझे भी इस बार हुआ..तो क्युना मै भी कह दु कह दु..हुआ मुझे भी प्यार हुआ..असं सांगणं....
प्रेमीयुगुलांच्यात पहीले पहीले असणारा संकोच आणि प्रेम व्यक्तं झाल्यावर येणारा खट्याळपणा अगदी नकळत आपल्या डोळ्यासमोर तरळतो....
आंखोंसे छुं लूं की बाहें तरसती है...दिल ने पुकारा है हां..अब तो चले आओ..
आओ के शबनम की बुंदें बरसती है मौसम इशारा है हां..अब तो चले आओ...
यां दोन्ही ओळी आतिफ़ अस्लम नी खुप आर्ततेने गायल्या आहेत....तिचा सहवास..खुशगवांर मौसम पण तरीही एक अंतर..यासगळ्यांत प्रियकराच्या ठायी असलेली आर्तंता अतिफ़ने आपल्या सुफ़ी आवाजात अगदी सह्ही आपल्यापर्यंत पोचवलीए...
बाहोंमे डाले बाहें बाहें...बाहोंका जैसे हार हुआ...हां माना मैने माना माना हुआ मुझे भी प्यार हुआ..असं म्हणत म्हणत अलिशा अगदी सहज खट्याळ पण हळवी प्रेमिका आपल्यासमोर उभी करते...
इर्शाद कामिल यांचे शब्द खुप छान, सोपे पण तरीही मनाला भिडणारे...
प्रितम यांचं संगीत...अप्रतिम...
थोडे शब्द..थोडं सुश्राव्य संगीत आणि सख्याची आठवण...बस्स दिन बन गया यार!!

Monday, November 2, 2009

मी हरवली आहे....पूर्वीची सकाळ वेगळी असायची. प्रसन्नतेला आपल्या कवेत घेत दिवस सुरू करायचा तोच मुळी आपल्या शर्थीवर प्रत्येक क्षण जगण्याच्या ऊर्मीसकट. वाफाळलेल्या चहाचे घोट गैलरीत निवांत उभं राहून स्वतःच्याच सोबतीत घशात रिचवायचे. खूपच भूक लागली असेल तर भल्या मोठ्या बर्गर ला आपल्या तोंडाची वाट मोकळी करून द्यायची फारशी डाएट वगैरे ची भिती नं बाळगता.

सगळ्या गोष्टीची शोधाशोध करत तयारी करायची आणि १० मिनिटे रोज उशीराच कामावर जायचं, दुसऱ्या दिवशीही तेवढंच उशीरा जायचं हे ठरवून, अजिबात वाईट नं वाटू देता. कँटीनमध्ये मस्तं पैकी जेवण हादडून "आज मूड नही है" असं रोजच म्हणत कामाला उद्यावर टाकायचं आणि नेटवर एखादं गाणं शोधून डाउनलोड करायचं, ऐकण्याची तलब आली म्हणून.

दुपारी ४ च्या सुमारास प्यायचा एक फक्कड गरम चहा..तोवर ह्याच्याशी गप्पा मारायच्या, माझं काय चाललंय यापासून तो अगदी अनभिज्ञ. त्याने पाहिलेली मी ही अशीच एखाद्या ब्रेकमध्ये.

संध्याकाळी घेऊन फिरायचं कधी गप्प, कधी शांत तर कधी समुद्रासारखं मन....कधी कुठल्या मॉल मध्ये तर कधी निवांत बगिच्यात..आणि फोन करायचा त्याला तुझी आठवण येतेय म्हणून...अतिशय आर्त होऊन..पलीकडे अशीच आर्तता जाणवली की मात्र लगेच शांत व्हायचं..कातरवेळला अशी तगमग का जाणवते हे उमगलं असं वाटुन...

घरी परततांना आजुबाजुच्या इमारतीतील घरांमध्ये लागलेले दिवे पाहुन विचार करायचा आपलंही असं असेल कधी छोटंसं घर, दिवेलागणीला असेच लागतील त्यातही दिवे. तोवर आई बाबांकडॆ मनातल्या मनात एक फ़ेरफ़टका मारुन यायचा...आईला कवेत घेऊन एक गोड पापा द्यायचा..आणि बाबांना एक गाढ मिठी देऊन यायची..छकुशी थोड्याश्या गप्पा मारायच्या...हसत खिद्ळत साजरी करायची संध्याकाळ.

पुन्हा घरी परतायचं..रात्रीच्या आभाळाकडॆ बघत बघत...चंद्र,चांदण्यांच्या टोपलीला सोबत घेऊन.."चंद्र खुप छान दिसतोय आज नक्की बघ" असं त्याला सांगत सांगत.

रात्रीच्या पोटोबाची फोनवरंच सोय करायची आणि रुममेटसोबत गप्पांत झोकुन द्यायचं स्वतःला...जेवणासाठी ब्रेक घ्यायचा आणि गप्पा कंटिन्युड....

शनिवार रविवार फक्तं फिरायचं उगाचंच, सगळया दुकानांत फेरफटका मारत. एखादं पुस्तक विकत घ्यायचं पुढच्या आठवड्याची तयारी म्हणुन...आणि त्याचा रविवारी रात्रीच फडशा पाडायचा...

एखाद्या आइसक्रिम पार्लर मध्ये जाऊन आवडतं आइसक्रीम खायचं.. मैत्रिणींच्या गाडीवर बसून रस्त्याने जाता जाता त्याचा आस्वाद घ्यायचा....

लग्नं झाल्याला काल ९ महीने झाले हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा जाणवलं की "तो" मिळाला खरा पण माझ्यातली "मी" मात्र हरवली आहे...