Pages

Friday, July 31, 2009

उत्सव..पावसाचा!

सकाळच्या प्रसन्नतेचा पहिला नैवेद्य घेताना सूर्यनारायण खुष होऊन अजूनच तेजस्वी दिसायला लागले आहेत. ढगांनीही रात्रभर आकाशाच्या अंगणात खेळ खेळून आता निरोप घेतलाय. काही उनाड ढग आहेतच तरी कट्ट्यावर बसलेली टवाळक्या करत.झाडाझाडावरील पक्ष्यांची लगबग सुरू झालीए.
आज पावसाने हजेरी नं लावल्याने सगळेच एकंदरीत खुष आहेत. कावळ्याच्या घरात मात्र अजूनही सगळे झोपलेच आहेत. कावळे काकू येऊन दारासमोर रांगोळी टाकून गेल्या. "आज पाऊस का आला नाही? अजून थोड्या वेळ झोपायला मिळालं असतं ना" असे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव होते.
नेहमीच घाईत असलेल्या खारुताईंचा मूड मात्र वेगळाच आहे. आज त्यांनी सुट्टी घेतली आहे अर्धी! मुलगी आलीए घरी बाळंतपणाला, तिच्यासाठी घराची डागडुजी करायची आहे म्हणून. नारळे काका काकूंना विचारपूस चाललीए त्यांची घराबाबतीत. नारळेंना तसा या गोष्टींचा बराच अनुभव आहे. कावळे काकूंची मुलगी बाळंत झाली, तेव्हाही ते मदतीला सरसावले होते. शेजारधर्म आजवर त्यांनी अगदॊ चोखपणे पाळलाय. कावळे काकूंचा सल्ला ही बराच मोलाचा ठरतो कारण मोहल्ल्यातील सगळ्य़ांपेक्षा वयाने आणि अनुभवाने त्या मोठ्याच आहेत.
खारूताईचा जावई मोठा कर्तबगार बर्का! एका शेंगदाणा तेलाच्या कंपनीत नुकताच रुजू झाला. त्याला छोट्या खारुची तर फारच काळजी. म्हणूनच खारुताईंवर ही जबाबदारी सोपवून गेलाय आखातात.
मैना कुटुंबात नुकतीच सकाळ झाली. नुकतंच मैना कुटुंब इथे राहायला आलंय. नवपरिणीत जोडपं आहे त्यामुळे त्यांना कसलीही मदत लागली की सगळे लगेच पुढे सरसावतात.
कोकिळा मावशींच्या मुलीला नुकतीच कुणीतरी लग्नाची मागणी घातली. त्यांनी हो ही म्हटलं असं ऐकीवात आहे. पुढे काय होणार? याकडे सगळ्यांचेच डोळे लागलेत, खारुताईंच्या घरच्या लग्नानंतर मोहल्यात होणारं हे दुसरंच लग्नं. कोकीळ कुटुंब तसं मनमोकळं असल्याने सगळ्यांनाच त्यांच्याकडच्या लग्नात मजा करता येणार आहे. सगळेच जण म्हणून वाट बघतायत.
काल परवा मोहल्यात राहायला आलेला धीवर पक्षी सगळ्यांनाच आवडून गेला. तो थोड्याच वेळ आला पण काय तोरा होता त्याचा. नुकताच परदेशातून आला होता त्यामुळे त्याला थकायला झालं होतं. घर शोधत शोधत आला होता बिचारा. नारळे काका काकूंनी त्याला घरात घेऊन त्याची नीट विचारपूस केली. केवढं बरं वाटलं त्याला. परदेशातून आल्यामुळे त्याच्याकडून बऱ्याचं नवीन गोष्टी, नवीन माहिती मिळेल असे वाटून सगळेच खूष होते.
एव्हाना सूर्यनारायणाची अर्धी कालक्रमणा पूर्ण झालीय. दुपारच्या भरगच्च जेवणानंतर अनावर झालेल्या झोपेला मान देऊन ते वामकुक्षीला निघून गेले. मैदान साफ आहे हे पाहून ढगांनी खेळायला सुरुवात केली.
कावळे काकू दोरीवर टांगलेले कपडे काढायला लगेच घराबाहेर आल्या. नारळे काकूंशी गप्पा मारत मारता सरसर येणाऱ्या शिरव्यांनी त्यांना पार भिजवून टाकलं तश्याच त्या आत गेल्या.
दुपारपासून पाऊस सतत सुरू असल्याने खारूताईचा घराच्या डागडुजीचा प्लॅन तसाच बारगळला. मैना कुटुंबही बाजारात जायचे राहून गेले. कावळे काकू नखशिखांत भिजल्यामुळे आजारी पडल्या. कोकीळ कुटुंबही हिरमुसले. आज त्यांच्या मुलीची सोयरीक होणार होती. पावसामुळे सगळेच आपापल्या घरी अडकून पडले.
नारळे काकूंनी मात्र घरीच मस्तं कांद्याची भजी, चहा असा बेत केला. आणि सगळ्यांना बोलावलं. सगळे थोडे थोडॆ भिजत नारळेंकडे आले. बाहेर जोरदार पाऊस, कांद्याची भजी आणि आल्याचा मस्तं चहा हा बेत पाहून सगळ्यांना मनापासून आनंद झाला.
नेहमीप्रमाणेच नारळे काका काकूंनी आपला शेजारधर्म पाळला आणि सगळ्या हिरमुसल्या कुटुंबांना आनंदी करून टाकले. रात्र होईपर्यंत नारळेंकडे मस्तं मैफिल सजली. गप्पा गोष्टी, कोकीळ कुटुंबाची गाणी. पावसाचा एक उत्सवच साजरा केला मोहल्लेकरांनी...; )

माझे जीवन गाणे..

गाडीत येता येता मी आज कधी नाही ते मस्तं नाट्यगीतं लावली होती...नवरोबांना भाषा जरी कळत नसली तरी माझ्या असल्या काड्यांना ते विरोध करत नाहीत (याचं एकमेव कारण म्हणजे मी रोज़ ऐकत असलेली तमिळ गाणी ;) )
जवळपास अर्धं अंतर पार केलं होतं आलो होतो. समुद्री वादळासारख्या प्रचंड ट्रैफ़िकला तोंड देत देत आमची नौका पुढे जात होती..कुमार गंधर्व "मम आत्मा गमला हा" म्हणत होते. अगदी भर वादळात विजांचा कडकडाट व्हावा तश्या त्यांच्या ताना मला भासत होत्या. बाहेर मस्तंपैकी ढगाळ वातावरण होतं.मधुनच एक एंबुलेंस गेली. ह्या एंबुलेंस नेहमी जेव्हा ट्रैफिक मधुन जातात तेव्हा मला फ़ार टेंशन येत असतं.कोण जाणे त्यातील व्यक्तीला किती त्रास होत असेल आणि इथे एव्ढं ट्रैफिक. साधी त्या एंबुलेंस ला वाट मोकळी करुन देण्याइतकी शिष्टाई लोकांमध्ये नसते.अश्या वागण्याने कुणाचा जीव जाऊ शकतो हे लोकांना कसे कळत नाही ? ती एंबुलेंस इथे २ मिनिटे, तिथे ३ मिनिटे करत करत सिग्नल वरुन पुढे गेली आणि माझा जीव भांड्यात पडला.
एवढं सगळं होईपर्यंत गाण्याचा अंतरा सुरु झाला होता.मागे उभ्या असलेल्या लोकांनी पोंगा वाजवुन वाजवुन आपले अस्तित्व जाणवुन दिले होते. मी उगाचच गाणी लावली असं वाटुन गेलं.एकतर ट्रैफ़िक, त्यातुन अनोळखी भाषेतील गाणी, ते ही नाट्यसंगीत,बिचारा माझा नवरा..;)
तेव्ढ्यात कुणी पराक्रमी माणसाने आमच्या गाडीला आपल्या बाईकने ठोस मारली. आरश्याला जोरदार धक्का मारुन तो माफ़ी नं मागता पुढे जाता झाला ;)..हे तर नेहमीचंच..रस्त्यावर तीन वेगवेगळ्या लेन्स असतांना ह्या दुचाकी वाल्यांना फ़ास्ट लेन मध्ये येऊन काय मजा येते कळत नाही.अग्दी टी.व्ही.एस चैम्प सारखी मंद चालणारी गाडी ही राईटमोस्ट लेन मध्ये चालवणारे महाभागही आहेत. त्यामुळेच कितीदा अपघात होतात. मोठ्या गाड्या अडकतात आणि टैफ़िक जाम होतो.
कहर म्हणजे कितीतरीदा लहान मुलांना घेऊन त्यांचे आईवडील ह्या फ़ास्ट लेन मधुन दुचाकी चालवताना दिसतात. अश्या वेळी अगदी गाडीतुन उतरुन त्यांना थांबवुन असे सांगावेसे वाटते की ही अख्खी डावी लेन तुमच्याच साठी आहे. उजवीकडे येऊन आपले आणि इतरांचे जीवन धोक्यात आणु नये.
गाणं संपता संपता एका सिग्नल शी गाडी थांबली, सिग्नल लागताच भली मोठी बस आम्हाला आडवी झाली..ती आपला पसारा घेऊन जाईपर्यंत पुन्हा लाल दिवा लागला..अजुन ८० सेकंद ताटकळत उभं रहावं लागलं. जर उजवीकडुन वळायचं असेल तर हे बस वाले आधीच का उजवीकडे होत नाहीत कोण जाणे?
एकदा असंच झालं, घरी परततांना सिग्नल वर एका बस ने टाटा इंडिका ला धडक दिली(उजवीकडे वळायची घाई!!). तिच्या समोर आम्ही उभे होतो त्यामुळे आम्हालाही जोरात धक्का बसला. गाडीचं मडगार्ड तुटलं. वरुन ते बस ड्रायव्हर कंडक्टर लगेच "आम्हाला ५००० पगार मिळतो त्यातुन तुम्ही जर तक्रार केली तर आमचे पैसे कापुन घेतील" वगैरे विनवणी करु लागले.
अरे! जर मिळणार्या पैशांची एवढी गरज आहे तर नीट जबाबदारीने गाडी का चालवित नाहीत ही लोकं? उगाच दुसर्याला भुर्दंड!!
एव्हाना वाहतुक जरा सुरळीत व्हायला लागली होती. सारखं वाटत होतं वेळच्या वेळी निघुन या मंडळींमुळे उशीर होतो. मी सकाळी लवकर उठले, लवकर आवरले, येता येता जर टैफ़िकमुळे उशीर झाला तर माझं काय चुकलं असं कुणाला सांगता ही येणार नव्हतं असं माझ्या मनात सगळं सुरु असतांना "माझे जीवन गाणे" लागलं...
व्यथा असो आनंद असु दे..
प्रकाश किंवा तिमीर असु दे..
वाट दिसे अथवा ना दिसुदे...
गात पुढे मी जाणे..
माझे जीवन गाणे...
बस्स!! एवढे ऐकुनच मन शांत झालं आणि पुन्हा सज्ज झाले मी "माझे जीवन गाणे" गायला ;) थोड्याशा मनस्तापानंतर...
गाडीत येता येता मी आज कधी नाही ते मस्तं नाट्यगीतं लावली होती...नवरोबांना भाषा जरी कळत नसली तरी माझ्या असल्या काड्यांना ते विरोध करत नाहीत (याचं एकमेव कारण म्हणजे मी रोज़ ऐकत असलेली तमिळ गाणी ;) )

जवळपास अर्धं अंतर पार केलं होतं . समुद्री वादळासारख्या प्रचंड ट्रैफ़िकला तोंड देत देत आमची नौका पुढे जात होती..कुमार गंधर्व "मम आत्मा गमला हा" म्हणत होते. अगदी भर वादळात विजांचा कडकडाट व्हावा तश्या त्यांच्या ताना मला भासत होत्या. बाहेर मस्तंपैकी ढगाळ वातावरण होतं.

मधुनच एक एंबुलेंस गेली. ह्या एंबुलेंस नेहमी जेव्हा ट्रैफिक मधुन जातात तेव्हा मला फ़ार टेंशन येत असतं.कोण जाणे त्यातील व्यक्तीला किती त्रास होत असेल आणि इथे एव्ढं ट्रैफिक. साधी त्या एंबुलेंस ला वाट मोकळी करुन देण्याइतकी शिष्टाई लोकांमध्ये नसते.अश्या वागण्याने कुणाचा जीव जाऊ शकतो हे लोकांना कसे कळत नाही ? ती एंबुलेंस इथे २ मिनिटे, तिथे ३ मिनिटे करत करत सिग्नल वरुन पुढे गेली आणि माझा जीव भांड्यात पडला.

एवढं सगळं होईपर्यंत गाण्याचा अंतरा सुरु झाला होता.मागे उभ्या असलेल्या लोकांनी पोंगा वाजवुन वाजवुन आपले अस्तित्व जाणवुन दिले होते. मी उगाचच गाणी लावली असं वाटुन गेलं.एकतर ट्रैफ़िक, त्यातुन अनोळखी भाषेतील गाणी, ते ही नाट्यसंगीत,बिचारा माझा नवरा..;)

तेव्ढ्यात कुणी पराक्रमी माणसाने आमच्या गाडीला आपल्या बाईकने ठोस मारली. आरश्याला जोरदार धक्का मारुन तो माफ़ी नं मागता पुढे जाता झाला ;)..हे तर नेहमीचंच..रस्त्यावर तीन वेगवेगळ्या लेन्स असतांना ह्या दुचाकी वाल्यांना फ़ास्ट लेन मध्ये येऊन काय मजा येते कळत नाही.अग्दी टी.व्ही.एस चैम्प सारखी मंद चालणारी गाडी ही राईटमोस्ट लेन मध्ये चालवणारे महाभाग आहेत. त्यामुळेच कितीदा अपघात होतात. मोठ्या गाड्या अडकतात आणि टैफ़िक जाम होतो.

कहर म्हणजे कितीतरीदा लहान मुलांना घेऊन त्यांचे आईवडील ह्या फ़ास्ट लेन मधुन दुचाकी चालवताना दिसतात. अश्या वेळी अगदी गाडीतुन उतरुन त्यांना थांबवुन असे सांगावेसे वाटते की ही अख्खी डावी लेन तुमच्याच साठी आहे. उजवीकडे येऊन आपले आणि इतरांचे जीवन धोक्यात आणु नये.

गाणं संपता संपता एका सिग्नलला गाडी थांबली, हिरवा दिवा लागताच भली मोठी बस आम्हाला आडवी झाली..ती आपला पसारा घेऊन जाईपर्यंत पुन्हा लाल दिवा लागला..अजुन ८० सेकंद ताटकळत उभं रहावं लागलं. जर उजवीकडुन वळायचं असेल तर हे बस वाले आधीच का उजवीकडे होत नाहीत कोण जाणे?

एकदा असंच झालं, घरी परततांना सिग्नल वर एका बस ने टाटा इंडिका ला धडक दिली(उजवीकडे वळायची घाई!!). तिच्या समोर आम्ही उभे होतो त्यामुळे आम्हालाही जोरात धक्का बसला. गाडीचं मडगार्ड तुटलं. वरुन ते बस ड्रायव्हर कंडक्टर लगेच "आम्हाला ५००० पगार मिळतो त्यातुन तुम्ही जर तक्रार केली तर आमचे पैसे कापुन घेतील" वगैरे विनवणी करु लागले. अरे! जर मिळणार्या पैशांची एवढी गरज आहे तर नीट जबाबदारीने गाडी का चालवित नाहीत ही लोकं? उगाच दुसर्याला भुर्दंड!!

एव्हाना वाहतुक जरा सुरळीत व्हायला लागली होती. सारखं वाटत होतं वेळच्या वेळी निघुन या मंडळींमुळे उशीर होतो. मी सकाळी लवकर उठले, लवकर आवरले, येता येता जर टैफ़िकमुळे उशीर झाला तर माझं काय चुकलं असं कुणाला सांगता ही येणार नव्हतं असं माझ्या मनात सगळं सुरु असतांना "माझे जीवन गाणे" लागलं...

व्यथा असो आनंद असु दे..

प्रकाश किंवा तिमीर असु दे..

वाट दिसे अथवा ना दिसुदे...

गात पुढे मी जाणे..

माझे जीवन गाणे...

बस्स!! एवढे ऐकुनच मन शांत झालं आणि पुन्हा सज्ज झाले मी "माझे जीवन गाणे" गायला ;) थोड्याशा मनस्तापानंतर...

Thursday, July 30, 2009

मंगळागौर...(भाग २)

माझ्या मंगळागौरी बद्दल नवर्याचा उत्साह बघुन मला नवलच वाटलं. त्याचं मला सगळीकडे घेऊन जाणं, पार्किंग वगैरे ची कुरबूर नं करता छोट्या छोट्या दुकानात खरेदी करु देणं..बापरे! माझ्यासाठी हे तर एक आश्चर्यच होतं. घरी जाता जाता अगदी अत्यावश्यक गोष्टींसाठी सुद्धा नं थांबणारे आम्ही मंगळागौरी च्या साहित्यासाठी ठायी ठायी थांबलो म्हणजे शिवशंकरानेच कृपा केली म्हणायची ;)

सोमवारी शिवामूठ होती. आमच्या ऒफ़िसच्या बाजुलाच शंकराचं भलंमोठं आणि प्रसिध्द मंदीर आहे तिथेच मी जायचं ठरवलं, संध्याकाळी ऒफ़िस झाल्यावर मंदीरात गेले. नेहमी सगळेच म्हणतात की कुठेही जातांना कुणालातरी सोबत घेऊन जात जा..

पण मला मात्र एकटंच फ़िरायला आवडतं..बोलतांना चुका झाल्याशिवाय मजा येत नाही. वाट चुकणे वगैरे सारखे प्रकार झाले नाहीत तर नोर्मल असल्यासारखे वाटत नाही. म्हणुनच मी कुणालाही बरोबर नं घेता मंदीरात गेले. आत गेल्यावर तिकीट खिडकीत बसलेल्या माणसाला सांगितले की मला तांदूळ वहायचे आहेत देवाला कसे वाहू? त्याला राईस म्हणजे काय कळेचना...प्रत्यक्ष दाखवल्यावर तो म्हणाला "अरसी?" ओ हो..सरळ जा आणि उजवीकडे वळ..मी तशी जायला लागले..

उजवीकडॆ वळल्यावर पुन्हा एका माणसाला विचारले की "अरसी कुठे वाहू देवाला?" (ह्या वेळी अरसी म्हणजे तांदुळ त्याला माहित असावे असं मी गृहीत धरलं)..एका मिनीटानंतर तो म्हणाला "ओह राईस?" इकडे वहा...मला मनातल्या मनात हसायला आले..;)

शिवामूठ झाल्यावर देवळाच्या बाहेर आले. आणि वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर गजरे घेतले. बेलाचा पण हारच घेतला(तसाच मिळतो इथे)...

मग जवळच्याच दुकानात जाऊन सगळं पुजेचं साहित्य घेतलं. याबाबतीत मात्र मी दाक्षिणात्य लोकांची दाद देते..पुजेतल्या अथ पासुन इती पर्यंत त्या दुकानात उपलब्ध होतं. पुस्तकांच्या सेक्शन मधे "गुरुचरित्र" तेही चक्क मराठीत पाहुन तर मला सुखद धक्काच बसला..एव्हाना नवरोबा आले होते..त्यांनी मला झालेलं आश्चर्य पाहुन लगेचच "मग मिळतं इथं सगळं..तु आपली उगाचच हे नाही ते नाही करत असतेस”...मी सर्वखाणे चित. :)

आता प्रश्न होता चौरंगाचा..शोधता शोधता स्टूल सारखा मिळाला एक चौरंग...त्यावरच मी धन्य जाहले...सुकं खोबरं पण बरंच शोधलं आणि मिळालं एकदाचं!

घरी जाऊन सगळं व्यवस्थित लावायचं काम पण नवरोबांनीच केलं. तेवढंच मला बरं वाटलं..

सकाळी उठुन पुजा केली, धाकधुक वाटत होती पुरण करतांना पण मस्तं झालं.. छानपैकी फुलांची आरास केली..आणि देवाला मनापासुन नमस्कार केला....

माझी तशी एकटी करण्याची पहिलीच पुजा. हा सगळा अनुभवच खुप काही शिकवुन गेला...
मनाला अजुन बळकट करुन गेला..म्हणुनच कदाचित जुनी माणसं ही व्रतवैकल्ये करत असावीत..

मनाला अजुन बळकट करुन गेला..म्हणुनच कदाचित जुनी माणसं ही व्रतवैकल्ये करत असावीत..

Wednesday, July 29, 2009

तुझे आहे तुजपाशी...

येतो असा एखादा क्षण जेव्हा तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजता, असं बर्याच वेळा होतं माझ्याबाबतीत.
सकाळ पासून मूड जरा खराबच असतो, सकाळचा पहीला चहाही नीट केल्या जात नाही, देवालाही कसाबसाच नमस्कार होतो. ऒफ़िसला जायला पावलं घरातून बाहेर पडता पडत नाहीत. रस्त्याला लागल्यावरही आजुबाजुला फ़कत बघ्यासारखं बघणं सुरु असतं अगदी तटस्थपणे. काम खुप असलं तरी करायची तसुभरही इच्छा होत नाही. मग येतो एखादा ओळखीचा फोन आणि होतात गप्पा.
"माझा आज मूड ठिक नाहीए गं." नेहमीच्या स्वरात मी सुरु होते.
"का? काय झालं मूड ठीक नसायला?" तिकडचा आवाज म्हणतो..
मी सांगते मग माझी सगळी व्यथा अगदी अथ पासून इती पर्यंत. आज बाई आली नाही पासुन, एवढ्या दूर येण्याजाण्याचा आता मला आता कंटाळा आलाय इथपर्यंत.
आतापर्यंत शांत आणि आपलासा वाटणारा आवाज आता जरा बदलायला लागतो.
"तुला नं सवय झाली आहे, सगळं चांगलं असतांना चिंतेत रहायची..आजी, आई या सगळयांना लग्नं झाल्यावर किती कामं करायला लागायची माहिती आहे नं तुला?" इथपासुन तिकडचा आवाज मला गृहिणींना रोजच किती खपावं लागतं वगैरे सांगतो...
मी आपली मान डोलावते.
"त्यामानाने तुला तर काहीच त्रास नाही." आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतॊ..अरे हो! खरंच आहे की. मी तर खुप मजेत आहे त्यामानाने.
मग लगेचच तिकडचा आवाज मुंबईच्या लोकल प्रवाश्यांचं उदाहरण देतो..आणि मला खरंच पटतं की मी उगाचच अंतराचा बाऊ करतेय..एकदा जवळ शिफ़्ट झालं तर हे अंतरही मिस करायला होईल कदाचित..
कसं असतं नं ?
तुमच्या जवळ असलेल्या भाग्याची सतत कुणीतरी जाणीव करुन द्यायला लागते नाहीतर आपण असेच भरकटत राहतो...वाईट वाटुन घेत राहतो उगाचंच...
येतो असा एखादा क्षण जेव्हा तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजता, असं बर्याच वेळा होतं माझ्याबाबतीत.

सकाळ पासून मूड जरा खराबच असतो, सकाळचा पहीला चहाही नीट केल्या जात नाही, देवालाही कसाबसाच नमस्कार होतो. ऒफ़िसला जायला पावलं घरातून बाहेर पडता पडत नाहीत. रस्त्याला लागल्यावरही आजुबाजुला फ़कत बघ्यासारखं बघणं सुरु असतं अगदी तटस्थपणे. काम खुप असलं तरी करायची तसुभरही इच्छा होत नाही. मग येतो एखादा ओळखीचा फोन आणि होतात गप्पा.

"माझा आज मूड ठिक नाहीए गं." नेहमीच्या स्वरात मी सुरु होते..

"का? काय झालं मूड ठीक नसायला?" तिकडचा आवाज म्हणतो..

मी सांगते मग माझी सगळी व्यथा अगदी अथ पासून इती पर्यंत. आज बाई आली नाही पासुन, एवढ्या दूर येण्याजाण्याचा आता मला आता कंटाळा आलाय इथपर्यंत.

आतापर्यंत शांत आणि आपलासा वाटणारा आवाज आता जरा बदलायला लागतो.

"तुला नं सवय झाली आहे, सगळं चांगलं असतांना चिंतेत रहायची..आजी, आई या सगळयांना लग्नं झाल्यावर किती कामं करायला लागायची माहिती आहे नं तुला?" इथपासुन तिकडचा आवाज गृहिणींना रोजच किती खपावं लागतं वगैरे सांगतो...मी आपली मान डोलावते.

"त्यामानाने तुला तर काहीच त्रास नाही." आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतॊ..अरे हो! खरंच आहे की. मी तर खुप मजेत आहे त्यामानाने.

मग लगेचच तिकडचा आवाज मुंबईच्या लोकल प्रवाश्यांचं उदाहरण देतो..आणि मला खरंच पटतं की मी उगाचच अंतराचा बाऊ करतेय..एकदा जवळ शिफ़्ट झालं तर हे अंतरही मिस करायला होईल कदाचित..

कसं असतं नं ?

तुमच्या जवळ असलेल्या भाग्याची सतत कुणीतरी जाणीव करुन द्यायला लागते नाहीतर आपण असेच भरकटत राहतो...वाईट वाटुन घेत राहतो उगाचंच...

Tuesday, July 28, 2009

आईचा वाढदिवस!!

रोज पहाटे उठून आई पहिले पोळ्या करायची.भात वरणाचा कुकर लावून आमच्या चहा दुधाची व्यवस्था करायची.तिचा वावर झोपेतही जाणवायचा.तिच्या हातातल्या बांगड्य़ांची किणकीण मनाला मोहून घ्यायची. चहा झाल्यावर लगेच अंघोळीला जाऊन सोहळ्यानिशी देवासाठी पाणी भरायची.मग पूजा चालू होत असे.पुजा करायच्या आधी ओट्यावरच भाजी चिरून पटकन फोडणी घालत असे.मग पूजेत बसली की मला गॅस बंद करायला लावत असे..

९.३० च्या बस ने सेमिनरी हिल्स हून गांधीबाग ला ऑफिसला जायचे असायचे आणि त्याआधी हा सगळा खटाटॊप. "देवा, आज अशीच पुजा आटपली तुमची" हे तिचे आरती झाल्यावरचे वाक्य आणि कितीही लवकर उठलं तरीही पुजा मात्र घाईतच होते गं मुग्धा असं ती नेहमी मला म्हणत असे.

संध्याकाळी घरी आल्यावर थोडावेळ बसून नीट हातपाय धुऊन दिवा लावणे,शुभंकरोती म्हणणे आणि मग स्वयंपाकाला लागणे हा तिचा नित्याचा कार्यक्रम.

सणावारी तर तिचा उत्साह आणि मेहनत कळस गाठायची.सगळं साग्रसंगीत झालं पाहिजे हा तिचा सतत आग्रह असायचा.मग काय आषाढी एकादशी,गुरुपौर्णिमा, नागपंचमी, श्रावण सोमवार, गणपती, देवीचं नवरात्र सगळे सण थाटात व्हायचे.आषाढी एकादशीला साबुदाण्याची उसळ, बटाट्याची भाजी, कांदाच कीस, शेंगदाण्याच्या कूटाची आमटी,कांदे नवमी ला मस्तापैकी कांदे भजे, नागपंचमी ला दीड, साखरभात वगैरे चा देवबाप्पाला नैवेद्य.

गणेश चतुर्थीला वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, पातळ्भाजी, काहीतरी गोड , मोदक असा सगळा नैवेद्य, देवीच्या नवरात्रात तर काही विचारायलाच नकॊ.पहिल्या दिवशी वडा पुरणाचा नैवेद्य असल्याने तिला अजिबात उसंत मिळत नसे.बरं नैवेद्य हॊईस्तोवर काही खायचे नाही ही ही एक मोठी शिक्षा...

अक्षय तृतीयेला वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, पातळ्भाजी, कुरडई, पापड, चिंचोणी चा नैवेद्य, ब्राम्हणाला जेवण वगैरे...चातुर्मासात एकच वेळा जेवणे हितकारक असते असं मी ही कुठेतरी वाचलंय.आईचा चातुर्मास म्हणता म्हणता षण्मास होत असे.कारण चातुर्मास संपल्यावर ब्राम्हणाला शिधा देऊन दक्षिणा देईपर्यंत ती एकच वेळा जेवत असे.त्याचं उद्यापन झाल्यावरही बरेचसे उपास.

नुसतं हेच नाही तर घरी येणाऱ्या जाणाऱ्याची काळजी, ऑफिसचे काम, आमच्या शाळा, अभ्यासं हे सगळे तिला करावे लागायचे.
हे सगळं अखंड २२ वर्षे चालल्यावर ती हळूहळू अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या अधीन झाली आणि आम्हाला सोडून गेली.
आज आईचा वाढदिवस. माझ्या मंगळागौरीच्या निमित्ताने आज मी ही तिच्यासारखाच पुरणासकट सगळा नैवेद्य केला. तिने चढलेला गड मी ही चढायला सुरुवात केलीय.तिच्या वाढदिवसाच्या दिवशी..

Saturday, July 25, 2009

मंगळागौर...(भाग १)

"नाही गं येणं नाही होणार माझं मंगळागौरीला..हो इथेच करेन सगळी पुजा व्यवस्थित तू फक्त मला पुस्तक पाठव" असं म्हणून मी फोन ठेवला.

मंगळागौर..लग्नं झाल्यावर नववधूने आपल्या सुखी संसारासाठी आणि अपत्य प्राप्तीसाठी करायची पुजा. पूर्वीच्या काळी आजूबाजूच्या सगळ्या सुवासिनी जमून ही पुजा करायच्या. त्या दिवशी रात्री गाणी म्हणून, खेळ खेळून जागरणं करायचे असायचे. तेवढाच नववधूला सगळ्यांचा परिचय आणि एक संधी माहेरी येण्याची ;).

लहानपणापासून ऐकत होते, श्रावण सुरू झाला की कोण्या अमुक अमुक ची मंगळागौर झाली वगैरे. मलाही फार इच्छा होती की मस्तं थाटात साजरी करावी पहिली मंगळागौर माहेरी. पण सुट्ट्या आणि आरक्षण या दोन्ही बाबी आड येत असल्याने माझं जाणं होणारच नाही अशी मला खात्री झाली..शेवटी तो माझा सण आहे आणि मला साजरा करायलाच हवा असे मानून मी कंबर कसली..

मला खरंच भारताबाहेर राहणाऱ्यांचं अमाप कौतुक वाटतं.मी भारतातच एका वेगळ्या प्रदेशात, वेगळ्या राज्यात राहूनंही मला माझं गाव, तिथली लोकं, बाजारात मिळणाऱ्या गोष्टी इतक्या आठवतात.तर ही सगळी बाहेर राहणारी मंडळी भारताला किती मिस करत असेल ह्याची कल्पनाही करता येत नाही.

एक तर तमिळ कुटुंबात असल्याने मला त्यांना मंगळागौर म्हणजे काय हे समजावून सांगणे हे अतिशय कठिण होते (अशीच काहीशी परिस्थिती गुरुपौर्णिमेला, त्यादिवशी सासरा आणि सून यांनी एका छताखाली वावरू नये असे म्हणतात आता हे ही भाषा येत नसताना समजवून सांगणे म्हणजे माझ्या पेशन्स ची सत्त्वपरीक्षा..नशिबाने आम्ही माहेरीच होतो त्यादिवशी) तरीही हिंमत करून, नवऱ्याच्या भाषांतराची मदत घेऊन मी घरी पुजा करणार आहे असे सांगितले. घरातली मंडळी एकदम कूल असल्याने तसा फारसा फरक पडला नाही.

इकडे पूजा करायची म्हणजे देवाला अंघॊळ, वस्त्र घालून, चंदन, फुले वाहून, हातात घंटा घेऊन सरळ कापूर आरती ओवाळणे, मला तर आरत्या म्हटल्याशिवाय पूजा झाल्यासारखी वाटतंच नाही :( इकडचा झाल्यापासून माझा बाळकृष्णही कापूर आरतीवरच समाधान मानत असला पाहिजे.

करता करता शनिवार येऊन ठेपला आणि अजूनही मला मंगळागौरी व्रतकथा चं पुस्तक आलं नव्हतं, पुजा होती अवघ्या तीन दिवसांच्या अंतरावर. मग काय महाजालावर गुगललं आणि मिळालं मंगळागौरी व्रतकथा चं पुस्तक.ज्या कुण्या भल्या व्यक्तीने हे पुण्याचं काम केलंय त्याला शतशः: नमन करून मी त्यात डोकावायला सुरुवात केली...पहिले प्रिंट आऊट्स काढून घेतले. पूजेचा विधी काय किंवा नवीन तमिळ पाककृती काय, लग्नं झाल्यापासून महाजाल हे माझं रेडी रेफ़रंसिंग चं एक माध्यम आहे. त्याला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच!!

पुस्तक तर मिळालं पण त्यात दिलेली वस्तूंची यादी पहिले आणणं आवश्यक होतं. भाषा येत नसल्याने दुकानात जाऊन "सुपारी द्या हो" हे कसं म्हणायचं हा एक मोठा प्रश्न होता. खारका, बदामा, हळकुंडं यांचं ठीक आहे पण अष्टगंध, गुलाल आणि बुक्का कुठून आणि कसा जमवायचा हा तर विचारच होता. बरं सांगितलं तरी कुणाला कळेना. इथे हळद कुंकू वगैरे मिळतं पण गुलालाची एकदा चौकशी केली तर काही ही हाती लागलं नाही असा माझा पूर्वानुभव होता त्यामुळे यादीतून गुलाल बुक्का तात्पुरता वगळला.

पुढच्या पानावर काही निवडक फुलांच्या, फळांच्या झाडांची १६ १६पाने म्हणजे पत्र्या गोळा करायला सांगितल्या होत्या. फुला फळांचं एकवेळ ठीक आहे पण आघाडा, केना आठवून तर मला हसायलाच आले. कुणाला सांगू आणि काय नावं सांगू :). लहानपणी हरितालिकेला मी सगळ्या पत्र्या गोळा करून घरी घेऊन जायची. काय मजा यायची म्हणून सांगू? मी आणि माझी मावशी एक टोपली आणि त्यात सुई दोरा घेऊन निघायचो आदल्या दिवशी. लागणाऱ्या सगळ्या पत्र्या गोळा करून मगच घरी यायचो..त्यावेळी आघाड्याची पानं खूप शोधावी लागायची. एवढ्या दुर्मिळ पत्र्याच देवाला का आवडतात असं मला नेहमी वाटायचं. इथे तर आघाडा वगैरे मिळायची शक्यताच नव्हती.

१५ पदार्थांची यादी आता अगदी ७ वर येऊन ठेपली होती. हे पदार्थ कमी होत होत माझी पुजा "दोन हस्तक तिसरे मस्तक" वरच होते की काय असे वाटायला लागले होते.

वायनाचे पदार्थ मला तसे नवीन नव्हते. चोळी गरसोळीची मला हरितालिकेमुळे सवय होती. आता ती इथे लोकेट कशी करायची हा विचार करत करत माझी इथल्याच एका बाजारात भटकंती चालली होती. आजूबाजूचे मोगऱ्याच्या गजऱ्यांचे ढीग पाहून माझा बाळकृष्ण केवळ या फुलांमुळेच आनंदी असावा असं वाटून गेलं..

बरंचंसं पूजेचं साहित्य असणाऱ्या एका दुकानात मला कापसाच्या माळा आढळल्या आणि हायसं वाटलं. तिथनंच जानवं घेतलं, कापूर, वाती घेतल्या तेवढ्यात तुझ्यासाठी पुस्तकासहीत सगळं पूजेचं साहित्य ओळखीच्या काकांबरोबर चेन्नईला पाठवलं आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. असा बाबांचा फोन आला.

आता फक्त वाट आहे ती मंगळवारची..:)

क्रमशः

Thursday, July 23, 2009

प्रश्न...!!

काय गम्मत आहे नाही...
दिवसापाठोपाठ रात्र..रात्रीपाठोपाठ दिवस..
न थांबता..न संपता...
कालचक्र चालतच आहे युगायुगांपासुन..
कधी हीच चाल खुप धीरगंभीर वाटते..
कधी उच्छ्ल जललहरीसारखी...
जरा कुठे विसावलं..जरा कुठे थांबलं की
आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देते
पायाखालची वाळू सरकवून..
आपण मात्र चढतच राहतॊ ..
बांधत राहतो कोळ्यासारखी घरटी..
नियतीने येऊन निस्तनाबूत करायला..
कधी कधी प्रश्न पडतॊ...
तुटण्यासाठीच बांधायचं असतं का घरटं?
मरण्यासाठीच जगायचं असतं का?
काय गम्मत आहे नाही...

दिवसापाठोपाठ रात्र..रात्रीपाठोपाठ दिवस..

न थांबता..न संपता...

कालचक्र चालतच आहे युगायुगांपासुन..

कधी हीच चाल खुप धीरगंभीर वाटते..

कधी उच्छ्ल जललहरीसारखी...

जरा कुठे विसावलं..जरा कुठे थांबलं की

आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देते

पायाखालची वाळू सरकवून..

आपण मात्र चढतच राहतॊ ..

बांधत राहतो कोळ्यासारखी घरटी..

नियतीने येऊन निस्तनाबूत करायला..

कधी कधी प्रश्न पडतॊ...

तुटण्यासाठीच बांधायचं असतं का घरटं?

मरण्यासाठीच जगायचं असतं का?

Wednesday, July 15, 2009

मंतरलेले दिवस !!

पुन्हा पाऊस ओला ओला
पुन्हा पाऊस बांधुन झुला
तिच्याकड्चे ओले
थेंब परत करतो
माझेच मला...
कॊलेज मध्ये असताना असंख्य वेळा ऐकलेली गारवाची कैसेट....अजुनही तितकीच फ़्रेश वाटते. आठवतं रामटेक..सुंदर, निरागस असं..
बारावीनंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. नागपुर जवळच्या रामटेक नावाच्या गावी. कॊलेज तसं रामटेकच्या बाहेर आहे..एक वेगळ्या वसाहतीसारखं..माझ्या आयुष्यातले मंतरलेले दिवस मी ह्या छोट्या आणि निसर्गसौंदर्याने वेड लावणार्या जागी जगले...
आमच्या कावेरी होस्टेल च्या आजुबाजुला किर्र झाडी होती..कैंपस ला जायला त्या गर्द झाडीतुन निघालेले छोटे काळे डांबरी रस्ते..पिवळ्या फुलांचा रस्त्यावर पडलेला सडा...प्रत्येक वळणावर असलेले कलवर्टस..
कैंपसचं खरं सौंदर्य खुलुन यायचं ते पावसाळयात.सागवानाच्या मोठ्ठ्या पानांवर जोरदार पडणार्या पावसाच्या थेंबाचा आवाज काळजाचा ठाव घेऊन जायचा... ही सगळी झाडं अगदी दिमाखात उभी असायची.....एखाद्या वेलीला कडेवर घेऊन....त्यांचा मोहक वेगळाच हिरवा रंग लक्ष वेधुन घ्यायचा..होस्टेलमधुन सरळ बाहेर निघालं की थोड्या अंतरावर लागायच्या आमच्या स्थापत्यशास्त्राच्या विविध विषयांच्या प्रयोगशाळा. त्याही उतरत्या छपराच्या....सुबक आणि ठेंगण्या..सगळं कसं अगदी वॊलपेपर पर्फ़ेक्ट..
होस्टेलच्या एका बाजुला प्राचार्यांचं घर आणि दुसर्या बाजुला सगळ्या लेक्चरर्स ची घरं..आमच्या होस्टेलचा रस्ता प्राचार्यांच्या घरासमोरुन जाऊन कैंपस च्या रस्त्याला जाऊन मिळत असे..त्या जंक्शन नंतर मात्र मुलांना प्रवेश नव्हता. तसंही मुला मुलींनी गप्पा मारु नये..७.०० च्या आत घरात(होस्टेल्मध्ये ;) ) वगैरे नियम होते..आणि म्हणुनच कदाचित माझ्या तिथ्ल्या वास्तव्यात मी इतकी मजा केली....एखादी गोष्ट करु नको म्हंटल्यावर करण्यात वेगळाच आनंद असतो नाही??
पहिलं वर्ष होमसिकनेस मध्ये गेलं..पण दूसर्या वर्षी मात्र मजा यायला लागली. एक नवा ग्रुप मिळाला. मग सुरुवात झाली बाहेर हिंडा फिरायला...
तसं रामटेकला जास्त हिंडा फिरायला "हैपनिंग" असं खूप काही नाही....
आहे एक सुंदर राममंदीर आणि कालिदास स्मारक.
श्रीराम वनवासात असतांना तिथे आले आणि सगळ्या असुरांना संपवुन टाकायची त्यांनी शपथ घेतली त्याला "टेक" असे म्हणतात म्हणुन त्या गावाला रामटेक हे नाव प्राप्त झाले. आणि महाकवी कालिदासांनी रामटेकलाच "मेघदूत" या काव्याची रचना केली..आता ज्या ठिकाणी कालिदासांना मेघदूतासारखे काव्य सुचले ती जागा किती सुंदर असावी ह्याची आपल्याला कल्पना आली असेलच..
कॊलेजपासुन जवळपास ६ ते ७ किमी अंतरावर आहे हे राम मंदीर..गडावर असल्याने त्याला गडमंदीर असेही म्हणतात.
गड चढतांना घाट लागतो..घाटाच्या कड्याखाली दरी नसुन एक अंबाळा नावाचा तलाव आहे....तलावाच्या आसपास जुनी मंदीरे आहेत.
हे मंदीर म्हणजे अभ्यास करुन करुन मेटाकूटीला आलेल्या आमच्यासारख्यांसाठी एक हाईड आऊट होतं..(तिथेही जाण्यास होस्टेलच्या मुलींना लेखी परवानगी लागत असे)..भोसल्यांच्या काळात बांधलेलं हे मंदीर अतिशय सुंदर आहे..रामाची मूर्ती "सावळी" आणि सीतेची मूर्ती "गोरीपान" आहे. मंदीरातुन बाहेर आलं की १० पायर्या चढल्यावर सीतेचा झरोखा आहे..ही जागा म्हणजे एक्दम हायलाईट...
इथे सदैव भरभरुन वारा वाहत असतो..आजुबाजुच्या सगळ्या परीसराचे दर्शन या झरोक्यातुन घडते....
खाली प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं की मन शांत होते आणि या झरोक्याने डोळ्यांचे पारणे फिटते...पावसाळयात तर सारा परिसरच नयनरम्य...
खाली उतरतांना मात्र माकडांच्या मस्तीला तोंड द्यावेच लागते..
माझी सगळ्यात आवडती आणि जिव्हाळ्याची "पाकातली बोरं" परततांना मिळत असल्याने मला वर चढण्यापेक्षा खाली उतरणे अधिक आवडायचे ;).पायर्यांवर असलेल्या दुकानातला मसालेदार चिवड्याला तर तोडच नाही..चट्पटीत, चमचमीत...एक नंबर...!!!
पुन्हा कॊलेजमधे परतायचे मात्र जीवावर यायचे..एकदा का मोठे गेट ओलांडले की आत जाता जाता कैंपसच्या सौंदर्याला बघुन पुन्हा धीर यायचा..
काही गोष्टी नेहमीच असतात नाही आपल्या बरोबर...एक हे निळंनिळं आकाश आणि दुसरा निसर्ग...व्हायला हवी ती जाणीव त्यांच्या अस्तित्वाची..:)
पुन्हा पाऊस ओला ओला

पुन्हा पाऊस बांधुन झुला

तिच्याकड्चे ओले

थेंब परत करतो

माझेच मला...

कॊलेज मध्ये असताना असंख्य वेळा ऐकलेली गारवाची कैसेट....अजुनही तितकीच फ़्रेश वाटते. आठवतं रामटेक..सुंदर, निरागस असं..

बारावीनंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. नागपुर जवळच्या रामटेक नावाच्या गावी. कॊलेज तसं रामटेकच्या बाहेर आहे, एक वेगळ्या वसाहतीसारखं.माझ्या आयुष्यातले मंतरलेले दिवस मी ह्या छोट्या आणि निसर्गसौंदर्याने वेड लावणार्या जागी जगले...

आमच्या कावेरी होस्टेल च्या आजुबाजुला किर्र झाडी होती.कैंपस ला जायला त्या गर्द झाडीतुन निघालेले छोटे काळे डांबरी रस्ते,पिवळ्या फुलांचा रस्त्यावर पडलेला सडा,प्रत्येक वळणावर असलेले कलवर्टस..

कैंपसचं खरं सौंदर्य खुलुन यायचं ते पावसाळयात.सागवानाच्या मोठ्ठ्या पानांवर जोरदार पडणार्या पावसाच्या थेंबाचा आवाज काळजाचा ठाव घेऊन जायचा. ही सगळी झाडं अगदी दिमाखात उभी असायची,एखाद्या वेलीला कडेवर घेऊन.त्यांचा मोहक वेगळाच हिरवा रंग लक्ष वेधुन घ्यायचा.होस्टेलमधुन सरळ बाहेर निघालं की थोड्या अंतरावर लागायच्या आमच्या स्थापत्यशास्त्राच्या विविध विषयांच्या प्रयोगशाळा. त्याही उतरत्या छपराच्या....सुबक आणि ठेंगण्या..सगळं कसं अगदी वॊलपेपर पर्फ़ेक्ट..

होस्टेलच्या एका बाजुला प्राचार्यांचं घर आणि दुसर्या बाजुला सगळ्या लेक्चरर्स ची घरं.आमच्या होस्टेलचा रस्ता प्राचार्यांच्या घरासमोरुन जाऊन कैंपस च्या रस्त्याला जाऊन मिळत असे.त्या जंक्शन नंतर मात्र मुलांना प्रवेश नव्हता. तसंही मुला मुलींनी गप्पा मारु नये..७.०० च्या आत घरात(होस्टेल्मध्ये ;) ) वगैरे नियम होते..आणि म्हणुनच कदाचित माझ्या तिथ्ल्या वास्तव्यात मी इतकी मजा केली....एखादी गोष्ट करु नको म्हंटल्यावर करण्यात वेगळाच आनंद असतो नाही??

पहिलं वर्ष होमसिकनेस मध्ये गेलं..पण दूसर्या वर्षी मात्र मजा यायला लागली. एक नवा ग्रुप मिळाला. मग सुरुवात झाली बाहेर हिंडा फिरायला...

तसं रामटेकला जास्त हिंडा फिरायला "हैपनिंग" असं खूप काही नाही....

आहे एक सुंदर राममंदीर आणि कालिदास स्मारक..

श्रीराम वनवासात असतांना तिथे आले आणि सगळ्या असुरांना संपवुन टाकायची त्यांनी शपथ घेतली त्याला "टेक" असे म्हणतात म्हणुन त्या गावाला रामटेक हे नाव प्राप्त झाले. आणि महाकवी कालिदासांनी रामटेकलाच "मेघदूत" या काव्याची रचना केली..आता ज्या ठिकाणी कालिदासांना मेघदूतासारखे काव्य सुचले ती जागा किती सुंदर असावी ह्याची आपल्याला कल्पना आली असेलच..

कॊलेजपासुन जवळपास ६ ते ७ किमी अंतरावर आहे हे राम मंदीर..गडावर असल्याने त्याला गडमंदीर असेही म्हणतात.

गड चढतांना घाट लागतो..घाटाच्या कड्याखाली दरी नसुन एक अंबाळा नावाचा तलाव आहे....तलावाच्या आसपास जुनी मंदीरे आहेत..

हे मंदीर म्हणजे अभ्यास करुन करुन मेटाकूटीला आलेल्या आमच्यासारख्यांसाठी एक हाईड आऊट होतं..(तिथेही जाण्यास होस्टेलच्या मुलींना लेखी परवानगी लागत असे)..भोसल्यांच्या काळात बांधलेलं हे मंदीर अतिशय सुंदर आहे..रामाची मूर्ती "सावळी" आणि सीतेची मूर्ती "गोरीपान" आहे. मंदीरातुन बाहेर आलं की १० पायर्या चढल्यावर सीतेचा झरोखा आहे..ही जागा म्हणजे एक्दम हायलाईट...

इथे सदैव भरभरुन वारा वाहत असतो..आजुबाजुच्या सगळ्या परीसराचे दर्शन या झरोक्यातुन घडते....

खाली प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं की मन शांत होते आणि या झरोक्याने डोळ्यांचे पारणे फिटते...पावसाळयात तर सारा परिसरच नयनरम्य...

खाली उतरतांना मात्र माकडांच्या मस्तीला तोंड द्यावेच लागते.. माझी सगळ्यात आवडती आणि जिव्हाळ्याची "पाकातली बोरं" परततांना मिळत असल्याने मला वर चढण्यापेक्षा खाली उतरणे अधिक आवडायचे ;).पायर्यांवर असलेल्या दुकानातला मसालेदार चिवड्याला तर तोडच नाही..चट्पटीत, चमचमीत...एक नंबर...!!!

पुन्हा कॊलेजमधे परतायचे मात्र जीवावर यायचे..एकदा का मोठे गेट ओलांडले की आत जाता जाता कैंपसच्या सौंदर्याला बघुन पुन्हा धीर यायचा..

काही गोष्टी नेहमीच असतात नाही आपल्या बरोबर...एक हे निळंनिळं आकाश आणि दुसरा निसर्ग...व्हायला हवी ती जाणीव त्यांच्या अस्तित्वाची..:)

Check out my slideshow!!

क्लिकोग्राफी

Tuesday, July 14, 2009

चलते चलते....

ऑफिसला यायला मला नेहमीच १.५ तास लागतॊ...मनावर कधिमधी आलेले मळभ झटकण्याचे काम मी या वेळात करते
.गाडितुन जात असतांना आजुबाजुला असणार्या दुकानाचे, लोकांचे एक चित्र बनत जाते आणि मनावर हळुच्कन उमटतात त्याचे पडसाद...
ऑफिसला यायला मला नेहमीच दीड तास लागतॊ...मनावर कधीमधी आलेले मळभ झटकण्याचे काम मी या वेळात करते.गाडीतुन जात असतांना आजुबाजुला असणार्या दुकानाचे, लोकांचे एक चित्र बनत जाते आणि मनावर हळुचकन उमटतात त्याचे पडसाद...

मॉन्सुनमुळे असणारं ढगाळ वातावरण, रस्त्यावरची वर्दळ खरोखर मनाला भावुन जाते..नारळाच्या झाडांची सकाळची प्रसन्न चर्या मन सुखावुन जाते. मला प्रत्येक नारळाचं झाड एखाद्या युगपुरुषासारखं वाटतं..सगळ्यांना भरभरुन देणारं आणि काही ही मोबदला नं मागणारं..

ढगाआड असल्यामुळे सूर्यदेवांबद्दल उन्हाळ्यात माझ्या मनात असलेला राग आता कमी झालाय :) त्यांनी असेच राहुन स्वतःचा आणि दुसर्यांचा ताप वाढवु नये असं वाटल्याशिवाय राहत नाही..

रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलातील मोठमोठाले काळे तापलेले तवे, त्याच्यावर पाणि टाकले की येणारा चर्रर्र असा आवाज आणि वाफ़.....वाफ़ ओसरली की तव्यावरुन गोल फिरणारी दोश्याच्या पीठाची वाटी...एखाद्या चहा, कॉफीच्या टपरीवर गिर्‍हाईकाची वाट पाहत असलेली बापुडवाणी इडली...हे सगळं कुठेतरी मनात घर करुन जातं..

प्रत्येक घरासमोर टाकलेला सडा आणि ठिपक्यांना वगळुन काढलेली सुंदर रांगोळी..जणु कटु आठवणींना वगळल्यास आयुष्यात येणारी सुबकता दर्शवते...

गल्लीतल्या एखाद्या देवळासमोरच्या दुकानात असलेले मोगरा- तुळशीचे गजरे मन कितीही खिन्न असले तरी सहज प्रसन्नता आणतात...समोरुन जाणारे एखादे कपाळावर भरपुर विभुती लावलेले, पांढरशुभ्र धोतर (वेष्टी) आणि जानवं घातलेले कृश बांध्याचे आजोबा....त्यांनी आजवर पाळलेल्या शिस्तीचा धडा देवुन जातात....

रस्त्याच्या अगदी मधोमध पोलीसकाका रस्ता ओलांडणार्यांच्या मदतीला धावुन येतात आणि आम्हाला गाडी थांबवावी लागते..बाजुलाच असलेल्या बसमधील गर्दी मात्र पाहवत नाही..बसच्या खिडकीतुन जरा आत डोकावले की दिसतात काही चेहरे..काही माझ्याच सारखे, काही वेगळे...समोरच्या सीट वर डोकं टाकुन पेंगुळलेले,

फोनवर बोलत असलेले, गाणी ऐकत असलेले असंख्य ओळखीचे पण अनोळखी चेहरे...

कापडाच्या, सोन्याच्या दुकांनांत चालु असलेली साफ़ सफ़ाई, पुजा..सबंध दिवस दुकान नीट चालु दे अशी प्रार्थना करणारे धनाढ्य मालक यांच्यावरही नजर जाते..

एव्हाना सगळे रस्ते दुचाकी चारचाकीने तुडुंब भरले असतात.रस्त्यावरचे सिग्नल आपले काम अगदी चोखपणे बजावत असतात..लोकांची मनं त्यांच्या आधीच ऑफिसमधे जाऊन बसलेली असतात...सगळेच वाहतुकीच्या जाळ्यातुन सुटण्याच्या प्रयत्नात..

नकळत दूरवर एक कटाक्ष जातो सोनेरी चकाकणार्या वाळुकडे ...अथांग निळ्या समुद्राकडे....आणि मन नकळत अभिवादन करतं त्याच्या उदात्ततेला.

लगेच आठवतो तो "जगन्नियंता". जो बघतोय ही सगळी घडामोड..इथे प्रत्यक्ष जरी येऊ शकत नसला तरी सगळ्यांना देतो जगण्याची उमेद त्यानी घडवलेल्या प्रत्येक गोष्टीतून..त्यानी घडवलेल्या प्रत्येक माणसाकडुन....

Sunday, July 12, 2009

निळु फ़ुले..

लहानपणी प्राण, प्रेम चोपडा, अमरीश पुरी..यांच्याइतकीच मला निळु फ़ुलेंची भिती वाटायची..त्यांचे हावभाव, डोळे, बोलण्याची लकब सगळेच एका अस्सल खलनायकाप्रमाणे असायचे..
दोन महिन्यापुर्वी सा रे ग म प च्या लिटील चॆम्प्स नी त्यांची घरी जाऊन भेट घेतली..तेव्हा त्यांना पाहीले ते शेवटचेच...
त्यांच्या आत्म्याला शांती मिळॊ हीच सदीच्छा..!!
लहानपणी प्राण, प्रेम चोपडा, अमरीश पुरी..यांच्याइतकीच मला निळु फ़ुलेंची भिती वाटायची..त्यांचे हावभाव, डोळे, बोलण्याची लकब सगळेच एका अस्सल खलनायकाप्रमाणे असायचे..

दोन महिन्यापुर्वी सा रे ग म प च्या लिटील चॆम्प्स नी त्यांची घरी जाऊन भेट घेतली..तेव्हा त्यांना पाहीले ते शेवटचेच...

त्यांच्या आत्म्याला शांती मिळॊ हीच सदीच्छा..!!

Friday, July 10, 2009

मनं माझे...

मनं नाही थार्‍यावर

मनं नाही अवाक्यात

गुंफ़ियेल्या आठवणी

तुझ्या प्रितीच्या मनात

*****************

मनं सारखे धावते

मनं सारखे हरते

मनं आठवुनं तुला

कधी हसते रडते..

*****************

मनं अवखळ भारी

मनं चोरटे खट्याळ

मनं डोळ्यातले पाणी

मेघ भरले आभाळ...

*****************

मनं पांढरा कागद..

मनं रंगाचा कुंचला

मनं रंगते रंगात..

जसे रंगवावे त्याला..

*****************

मनं असे शांत कधी

गंभीर ही रागदारी..

मनं कधी असे मुग्ध..

कधी लटके ठुमरी..

*****************

मनाची ही कैक रुपे..

तर्‍हा वेगळीच त्याची

थांग त्याचा लावायला.

बुद्धी तोकडी मुग्धाची..

Friday, July 3, 2009

संध्याकाळ (देवद्वार छंद)

परतला सूर्य

सरला दिवस

बदलते कुस

संध्याकाळ

--------------

पक्षी परतती

झाडे ही पेंगती

अंधार जगती

होतं आला..

--------------

अश्या सांजवेळी

लागे हुरहुर

माजते काहुर

मनामध्ये

देर आए दुरुस्त आए..:)

आज सकाळच्या द हिंदु पेपर च्या पहिल्या पानावरच "loving isnt a crime" हे दर्शविणार्या तरुणाचा फोटो आलाय...आणि खरंच प्रेम करणं हा गुन्हा नव्हेच...

20090703A_001101

समलिंगी संबंधांना मान्यता देऊन हायकोर्टाने मानवी अधिकारांप्रती आपले कर्तव्य चोख बजावले आहे...ह्या निर्णयाने समाजाला घाबरुन वागणार्या गे ,लेस्बिअन, ट्रान्सजेंडर लोकांना आता मोकळेपणाने वावरण्याची संधी दिली आहे.

आजवर होत आलेला मानसिक छळ, कुचंबणा, समाजासमोर ही बाब जाहिर झाल्यास काय होईल याची भिती, त्यातुन होणार्या आत्महत्या या सगळ्या समस्यांचं ,ह्या निर्णयानं, थोड्या फ़ार प्रमाणात का होईना..निराकरण होईल असं वाटतंय...

आता गरज आहे ती त्यांना आपल्यात मोकळेपणाने वावरु द्यायची...

ह्या निर्णयासाठी प्रयत्नशील असणार्या सगळ्यांचे मनापासुन अभिनंदन..

Thursday, July 2, 2009

जाब!

जीवा पुन्हा धाडधाड करत घराबाहेर निघुन गेला. त्याची आई मात्र एका खुर्चीवर बसुन राहिली.हे त्याचे नेहमीचेच होते. स्वतः वरच राग करायचा, आदळापट करायची, आणि बाहेर निघुन जायचे. आई मात्र काहिही बोलत नसे. तो बोलत असला की तशीच बसुन राही. तो गेला की सर्वशक्तीनिशी कामाला लागत असे. आजमात्र जीवाने बोललेले शब्द जिव्हारी लागले होते... --------------------------------------------------------------------------------------------------------------------------

५० वर्षांआधी जेव्हा उमाचे लग्न झाले तेव्हा ती जेमतेम १७ वर्षांची होती..लग्नं होऊन ती अनेक स्वप्ने घेऊन सासरी आली होती.नवरा खुप शिकलेला ,हुशार, एका बॆंकेत नोकरीला होता. स्वभावाने बरा होता. त्याला वाचनाची फ़ार आवड होती..नेहमी तो काही न काहीतरी वाचतच राहत असे. उमाचे नुकतेच खेड्यातुन शहरात स्थलांतर झाले होते. .त्याच्या या वाचनाच्या वेडाबद्दल तिला खुप अप्रुप वाटत असे.त्याच्या मानाने तिची राहणी अगदीच गावंढळ होती.तॊ कुठल्याही लग्नाकार्याला, किंवा कार्यक्रमाला तिला घेऊन जात नसे. पहिल्या वर्षातच उमाला बाळाची चाहुल लागली होती. उमाच्या नवर्याने रीतसर तिला पहील्या बाळंतपणासाठी माहेरी धाडले होते..

अवघ्या नऊ महीन्याच्या काळात तॊ तिला एकदाही बघायला आला नाही की त्याने उमाची विचारपुस केली नाही. ऊमाला त्याला भेटावेसे वाटायचे पण त्याच्या कामाची तिला जाणीव होती.. नवव्या महीन्याच्या सुरुवातीलाच उमाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तेव्हाही काहीतरी कारण सांगुन त्याने येणे टाळले होते.उमाला आता मात्र राहवले नाही. पण ती काहीच करु शकत नव्हती. मुलीची अशी अवस्था पाहुन उमाच्या वडिलांना राहवले नाही आणि ते आपल्या जावयाकडे , त्यांना घेऊन यायला म्हणुन गेले. बाबा "त्यांना" घेऊन यायला गेले आहेत हे ऐकुन उमाला फ़ार आनंद झाला. तिच्या शिणलेल्या चेहर्यावर प्रसन्नता आली.कित्येक दिवसांपासुन तिला त्यांना बघायचे होते. त्यांच्या संसारवेलीवर उमलले फुल त्यांना दाखवायचे होते. आल्या आल्या ते तिला कुशीत घेतील, तिचा पापा घेतील, माझ्याकडे कृतार्थ नजरेने बघतील असे वाटुन तर तिला अधिकच अधिर व्हायला झाले होते.

दरवाज्यात बाबांना बघुन ती जरा सावरुन बसली. ते आले असावेत असा तिने अंदाज लावला. बाबा खुप दु:खी दिसत होते. त्यांनी सांगितले की उमा आता परत सासरी कधीच जाऊ शकणार नव्ह्ती. तिच्या नवर्याचं लग्न ठरलं होतं एका श्रीमंत मुलीशी. बाबांनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला तर उमाच्या नवर्याने जीवानिशी मारण्याची धमकी दिली. एव्ढे सगळे बोलून ते बाकावर कोसळलेच.... उमाला काय होतंय हे समजण्याआधीच घेरी आली आणि ती बेशुध्द झाली... -------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लहानगी गोदा हळुहळु मोठी होऊ लागली होती. एवढे दिवसात उमाचा नवरा गोदाला बघायला सुध्दा आला नव्ह्ता..जशीजशी गोदा मोठी होऊ लागली तशीतशी तिचा वाचनाचा व्यासंग वाढु लागला होता..उमाला ह्या गोष्टीमुळे तिचे कौतुक वाटत असे...गोदा आपल्या वडीलांसारखीच हुशार होती..शाळेतही तिचा नेहमीच पहीला नंबर येत असे.. सगळे चांगले चालु होते.

गोदाचे लहानपण बघता बघता उमा आपले पुर्वायुष्य विसरु लागली होती..इतक्यात एक दिवस "ते" आले.. उमाच्या मनात त्यांना पाहून एक आशा निर्माण झाली..

इतक्या वर्षांनंतर सुध्दा त्यांच्यात अजिबात बदल झालेला नव्हता. तोच इन न केलेला कडक इस्त्रीचा शर्ट, शर्टाला सुट होईल असा पॆंट, पायात साध्या चपला आणि हातात एक पुस्तक हा त्यांचा वेष अजुनही तसाच होता. ते आले तेव्हा गोदा शाळेत गेली होती, बाबा कामाला आणि आईसुध्दा देवळात गेली होती.. उमाने त्यांना बसायला सांगितले, आत जाऊन त्यांच्यासाठी पाणी आणले. त्यांनी लगेचच उमासमोर एक कागद पुढे केला आणि तिची सही मागितली. उमाने त्यांच्यावर कुठलीही शंका नं घेता त्याच्यावर सह्या केल्या.उमाने चहासाठी विचारताच नको म्हणाले आणि फ़ार काही नं बोलताच निघुन गेले.

ते गेल्यावर उमाला क्षणभर विश्वासच बसला नाही की ते आले होते. तिने एवढे दिवस त्यांची वाट बघितली होती. कारण त्यांनी दुसरे लग्न जरी केले असले तरी ते पहिले उमाचे पती होते. त्यांचं रीतसर लग्न झालं होतं.ते आले तर त्यांच्यासाठी काय करायचे हे ही तिने योजुन ठेवले होते. ते आल्यावर मात्र उमा हरखुन गेली होती..त्यांची भेट दोन घडीची का असेना ती उमाला अजुन काही दिवसाकरीता एक आधार देऊन गेली. तिने या भेटीबद्दल कुणालाच काही सांगितले नव्हते.

एके दिवशी उमाने नर्सिंग चा कोर्स करावा असे बाबांनी सुचवले. पैशाबद्दल बाबा काही बोलत नसले तरी उमाला आपण स्वतः कमवावे असे वाटू लागले होते. गोदाही आता स्वतःची कामे स्वतः करु लागली होती. उमाने कोर्स ला जायला सुरुवात केली.. काही दिवसातच लोकं उमाला सिस्टर उमा म्हणुन ओळखु लागले होते. शासकीय दवाखान्यात उमाला नोकरी लागली होती..आता ती आपल्य़ा वडिलांना आर्थिक मदत करु लागली होती. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कामाच्या व्यापात जरी असली तरी उमा "त्यांना" विसरली नव्ह्ती. कधी कधी तिला अचानक ते आठवत आणि तिचं मन अधिर होत असे. त्यांच्या जवळ जावे,मला तुमची गरज आहे असे सांगावे असे तिला कित्येकदा वाटे. त्यांचा स्पर्श आठवून तिचे मन बंड करुन उठत असे. अश्यातच एके दिवशी ते आले....आज मात्र त्यांचा मूड काही वेगळाच होता. आल्या आल्या त्यांनी उमाला डोळे भरुन बघितले..तिच्या केसांना सावरले..उमा कित्येक दिवसापासुन त्यांची वाट पाहत होती..ते येतील असा तिला विश्वास होता. हळुच त्यांनी उमाला आपल्या जवळ घेतले..उमाही त्यांच्या मिठीत विसावली. तिची एवढ्या दिवसांची क्षुधा त्रुप्त झाली..... ते गेल्यावर उमा हरखली होती...नव्या येणार्या पुढच्या प्रत्येक दिवसाला ती आत्मविश्वासाने सामोरे जाणार होती.....तिने त्यांच्यावर केलेल्या प्रेमाचे सार्थक झाल्यासारखे तिला वाटत होते..........

काही दिवसातच तिला नविन पाहुण्याची चाहुल लागली.....आई, बाबांच्या विरोधाला न जुमानता तिने त्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता... -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- गोदाला तिच्या वडीलांचे सुख कधीच मिळाले नाही...आणि लहानग्या जीवालाही नाही....पण दोघांनाही त्यांचे वडील कोण आहेत, कुठे आहेत हे माहित होते. गोदा मोठी झाली..खुप शिकली.तिने आय.ए.एस ची परीक्षा अगदी लिलया पास केली होती. नुकतीच तिची डिस्ट्रीक कलेक्टर म्हणुन पोस्टींग झाली होती...

जीवा ही शिकला. त्याने बर्याच नोकर्या केल्या..पण कुठेही स्थिरावला नाही. त्याला कुणीही त्याच्या वडिलांबद्दल विचारले की प्रचंड चीड येत असे....एकीकडे तेच आपल्या जन्माला कारणीभूत आहे असे वाटुन त्याला सारखे वाईट वाटत असे. त्याच्या मित्रांच्या वडिलांकडे पाहुन त्याला आपल्या वडिलांची घृणा येत असे......

लग्नाचे वय होऊनही त्याने लग्न केले नव्हते...लोकांना तोंड दाखवायची सुध्दा त्याला लाज वाटायची...त्यांच्या प्रश्नांना लहानपणापासुन तोंड देऊन त्याला आता त्याचे जीवनच नकोसे झाले होते.. त्याचा स्वभावच चिडचिडा झाला होता.. त्याच्या वडिलांनी विल तयार केले तेव्हा त्यांनी उमाला दिलेला डिवोर्स आणि त्यानंतर जन्मलेल्या जीवाचा त्यावरचा हक्क यावर बरेच्से वाद निर्माण झाले होते.. जीवाला हे कळल्यापासुन तर तो अधिकच चीडला होता.... -------------------------------------------------------------------------------------------------------------------------

उमाच्या डोळ्यातुन एवढे वर्ष साठवुन ठेवलेले दुःख घळाघळा वाहु लागले होते......आज तिची सगळी शक्ती नाहीशी झाली होती..... तिने आयुष्याशी केलेला करार संपुष्टात आला होता.........

जीवाने आज आपल्या आईला जाब विचारला होता....

जाब...त्याला जन्म दिल्याचा...!!!

Wednesday, July 1, 2009

ती आणि तो

आजुबाजुच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे बघता बघता काही गोष्टी मात्र मनात राहुन जातात. अश्याच काही लोकांबद्दल ..त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल केलेल्या नोंदी...

ती आणि तो

"ती" एक २७ वर्षांची निखळ निरागस मुलगी. दुसर्यांना मदत करण्याची तिची प्रवृत्ती मला फ़ार आवडत असे. घरची अतिशय लाडकी.

गेल्या ७ वर्षांपासुन तिचं त्याच्या वर प्रेम होतं. मुलगा ही छान, मुंबई सारख्या शहरात व्यवस्थित स्थायिक झालेला. काहीही कमी नव्ह्तं.. प्रेमाच्या आणा भाका घेऊन झाल्या. सगळीकडे हिंडुन फिरुन झालं..सगळ्यांना कल्पना होतीच त्यांच्या प्रेमाची. फ़क्तं एकच गोष्ट होती खटकण्यासारखी..ती म्हणजे दोघेही एका जातीचे नव्ह्ते.

दोघांच्या घरुन ह्या गोष्टीवर प्रचंड विरोध होईल हे सर्वश्रुत होते. हळुहळु तिला मोठीमोठी स्थळं येऊ लागली. दोघा तिघांनी तर मागणीच घातली होती.आई बाबाही तिला लग्नाचा आग्रह करु लागले होते. आणि ती त्याला लग्न करण्यास आग्रह करु लागली. तिने हे सगळे घरी सांगितल्यावर तिला खुप बोलणी खावी लागली होती. त्याच्या प्रेमाखातर हे ही सहन करु असे तिला वाटायचे.

तिला वाटायचे आपल्यासारखेच त्यानेही घरी सांगावे आणि त्या दोघांनीही घरच्यांची समजुत घालावी. तिने त्याला असे कितीतरीदा बोलुन दाखवले होते. पण तो अतिशय निश्चल असायचा.

तो घरी गेला की कधीच तिचा फोन उचलत नसे. तेवढे दिवस ती त्याच्या मित्रांकडुन त्याच्याशी संपर्क साधत असे. परत आला की त्याचं वागणं बदलायचं. थोड्या दिवसांनी पुर्वपदावर यायचा. तिला पहिल्याप्रथम त्याचं हे वागणं जरा विचित्र च वाटलं. पण नंतर मात्र तिने "खुप रागवत असतील आई बाबा, त्याचं टेंशन येत असेल बिचार्याला" असं म्हणून स्वतःचीच समजुन काढली..

तिने घरच्यांच्या वारंवार वाढत असलेल्या दबावा बद्दल सांगितले की तो तिला विश्वासात घेऊन तिच्याशीच लग्न करण्याचे वचन देत असे. आई बाबांची अतिशय लाडकी असल्याने त्यांची समजुत घालता येईल याचा तिला विश्वास होता. त्यामुळे ती निर्धास्त होती...स्थळं आली की त्यांना कसे कलटवायचे हे ही त्याने तिला शिकवले होते. हळूहळू तिने सगळ्या स्थळांना नकार दिला...अशातच दोघांचीही जवळीक वाढु लागली होती.

आता मात्र तिच्यावरचं घरच्यांचं दडपण वाढु लागलं. तिला आई बाबांनी मारहाणही केली..पण प्रेमाखातर हे ही असे मानुन ती परत गप्प राहीली. घरच्यांचं दडपण शिगेला पोच्ले होते. ती कुठल्याच मुलाला होकार देत नव्हती आणि आतातर तिच्या वयाची मुलेही मिळेनाशी झाली होती. आई बाबांना तिच्या आयुष्याची काळजी लागुन राहीली होती. त्यातच बाबांची तब्येत खराब झाली आणि तिला घरी यावे लागले. नशिबाने तिच्या लग्नाचा विषय कुणीही काढला नाही.

तिने मुंबईत परत आल्यावर त्याला सगळी परिस्थिती सांगितली.पण तो मात्र नेहेमीप्रमाणेच निश्चल.. त्याला लग्नाबद्दल बोललं की काही नं काही कारण काढुन नाटकं करणं चालुच..नेहेमी सांगायचा की मी घरी आपल्याविषयी बोलायला जातोय आणि पूर्णतः बदलुन यायचा..

इकडे आई बाबांचे प्रेम,त्यांची चिंता, त्यांचा आग्रह, आणि दुसरीकडे तो..त्याचं प्रेम, त्यांनी घेतलेल्या प्रेमाच्या शपथा, त्याने तिची वेळप्रसंगी घेतलेली काळजी, ती आनंदात रहावी म्हणून केलेले प्रयत्न.. या अश्या मानसिक आणि शारिरीक त्रासाने ती अगदी अर्धी होऊन गेली होती.

शेवटी तिने शहानिशा करण्याचा निर्णय घेतला. तिला कळले की अख्ख्या दोन वर्षांपासुन त्याने लग्नाबद्दल एकही शब्द काढला नव्ह्ता. आणि त्याच्या घरचे लोक त्याच्यासाठी आनंदात स्थळं शोधत होते..आणि वरुन त्याने "तिचा साखरपुडा झालाय" असं घरी सांगितले होते. तिला हे ऐकुन तर काही सुचेनासेच झाले..आपल्यावर निस्सीम प्रेम करणारा मनुष्य हाच का असा तिला प्रश्न पडला. आपण कुठे कमी पडलो असे वाटुन तिला रडु आवरेनासे झाले.

तिने त्याला फोन केले, भेटायचा प्रयत्न केला पण तो कुठे गायब झाला कुणास ठाऊक? तिने त्याच्या मित्रा कडुन त्याला समजवायचा प्रयत्न केला पण काही फ़ायदा झाला नाही. त्याने तिच्या सगळ्या ईमेल्स तिच्या अकाऊंट मध्ये जाऊन उडवुन टाकल्या. तिच्याशी आणि त्याच्याशी मैत्री किंवा ओळख असणार्या सगळ्या लोकांशी संबन्ध तोडुन टाकले...आपला फोन नंबर बदलवुन टाकला.

आता असेल तो मोकळा...कुणा दुसर्या सावजाच्या शोधात...