Pages

Sunday, June 28, 2009

दे नेवर रिअली केअर्ड अबाउट हिम!!

काल व्हिएच १ चेनेल वर सगळे विडिओज बघितले..आजवर मी त्याचे एक दोन विडिओज च पाहिले होते..जे काही त्याच्याबद्दल माहित होते ते फ़क्त वर्तमानपत्राद्वारे, बातम्यांद्वारे.. सगळे लोकं म्हणतायत त्याप्रमाणे माझी आणि ईंग्रजी गाण्यांची ओळख मायकल च्या गाण्यांनी नाही झाली..मी कदाचित खुप लहान होते जेव्हा त्याचे अल्बम्स रिलिज झाले...पण तो लक्षात राहीला त्याच्या मुंबईच्या वारी ने..

त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची संख्या पाहुनच तो नक्कीच काहितरी स्पेशल असावा असे मात्र वाटुन गेले.. त्याचं "दे डोन्ट रिअली केअर अबाउट अस" गाणं मात्र लक्षात राहीलं.. काल पाहीलेलं एबीसी हे त्याने वयाच्या ११ व्या वर्षी गायलेलं गाणं तर केवळ अप्रतिम..वयाचं ११ वर्ष जेव्हा मुलं स्टेजवरही जायला घाबरतात, तिथे हा अगदी आरामात परफ़ोर्म करत होता...नाचत होता..अगदी लिलया गात होता...

http://www.youtube.com/watch?v=MYx3BR2aJA4&feature=related

त्याचं मी काल पाहिलेलं त्याचं प्रत्येक गाणं मला पुन्हा एकदा या कलाकराची नव्याने ओळख करुन देत गेलं....

"Man In The Mirror" : -

I'm Gonna Make A Change,

For Once In My Life

It's Gonna Feel Real Good,

Gonna Make A Difference

Gonna Make It Right . . .

As I, Turn Up The Collar On My

Favourite Winter Coat

This Wind Is Blowin' My Mind

I See The Kids In The Street,

With Not Enough To Eat

Who Am I, To Be Blind?

Pretending Not To See

Their Needs..

हे गाणं ऐकुन मला त्याच्यावर केलेले लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप केवळ खोटे वाटले.. एव्हढा विचार करणारा माणुस हे असलं काही करु शकेल याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही बसला...

thriller:-

Its close to midnight and something evils lurking in the dark

Under the moonlight you see a sight that almost stops your heart

You try to scream but terror takes the sound before you make it

You start to freeze as horror looks you right between the eyes,

Youre paralyzed

cause this is thriller, thriller night

And no ones gonna save you from the beast about strike

You know its thriller, thriller night

Youre fighting for your life inside a killer, thriller tonight

मायकल जॆक्सनला त्याच्या बाबांनी लहानपणी खुप त्रास दिला..असं मी विकीपिडिया वर वाचलं होतं..ते अक्षरशः मायकल आणि त्याच्या भावांना मास्कस घालुन घाबरवत असंत..उलटं टांगुन मारत असंत असं त्यात लिहिलं होतं..वरच्या गाण्यात त्याच्या भयानक अनुभवाची प्रचिती येते..

"Beat It" :-

They told him don't you ever come around here

Don't wanna see your face, you better disappear

The fire's in their eyes and their words are really clear

So beat it, just beat it..

या ही गाण्यात तो कृष्णवर्णीय असल्याने त्याला प्रत्येक गोष्टीत केला गेलेला मज्जाव reflect होतो..

"Stranger In Moscow":-

I was wandering in the rain

Mask of life, feelin' insane

Swift and sudden fall from grace

Sunny days seem far away

Kremlin's shadow belittlin' me

Stalin's tomb won't let me be

On and on and on it came

Wish the rain would just let me

How does it feel (How does it feel)

How does it feel

How does it feel

When you're alone

And you're cold inside

Here abandoned in my fame

Armageddon of the brain

KGB was doggin' me

Take my name and just let me be

Then a begger boy called my name

Happy days will drown the pain

On and on and on it came

And again, and again, and again...

Take my name and just let me be

ह्या गाण्यातले शब्द ही त्याचं एकटेपणच सांगतायत असं मला वाटतं...

ही आणि अशी असंख्य गाणी.गाणी लिहिण्याकरीता, त्यांना चाल लावण्याकरीता आणि ती गाणी लोकांच्या मनाला भीड्तील अशी गाण्याकरीता माणसावर विश्वनियंत्याचा वरदहस्त असायला लागतो. माणसाची संवेदना ही तितकीच महत्वाची असते.

ग्लैमर च्या दुनियेत मात्र सगळे गणित वेगळेच होऊन बसते. ही सगळी प्रसार माध्यमे एखाद्या मायकल सारख्या कलाकाराला पुन्हा जोमाने उठण्याचे बळ का देऊ शकत नाही हे मात्र एक कोडे आहे. असं जर असतं तर आपण ब्रिटनी स्पीअर्स, मायकल सारख्या अनेक कलाकारांची आयुष्ये वाचवु शकलो असतो..आणि त्यांच्या कलेचा मनमुराद आनंद लुटु शकलो असतो नाही का?

Thursday, June 25, 2009

We will miss you Michael!!

pure-devotion-white-roses

एखाद्या कलाकाराच्या आजुबाजुला असलेले वलय इतके जबरदस्तं असते की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करुच शकत नाही..तुम्हाला त्याची दखल घ्यावीच लागते..असाच कलाकार होता होता मायकल जॅक्सन.

त्याच्या आत्म्याला शांती मिळो हीच सदीच्छा!!

Wednesday, June 24, 2009

आई...

कधी कधी आईची एवढी आठवण येते नं की काही सुचतच नाही...आज मी तिची आठवण कागदावर उतरवायचा प्रयत्न केला आहे..

आई..रंग सारे
दुनियेतले
फ़िके झाले
तुझ्या नसण्याने

शब्द सारे
लेखणीतील
सुन्न झाले
तुझ्या नसण्याने

चांदणे डोकावले
नेत्र हे ओलावले...
भोवती सगळे स्तब्ध झाले
तुझ्या नसण्याने..

कुठेयस तु?
कुठे गेलीस तु?
आक्रोशही..मूक झाला..
तुझ्या नसण्याने..

असशील तेथे रहा जपुनी..
इथे आहे तुझे कुणी.. असे समजुनी..
क्षण हे...फ़क्त एक प्रमाण झाले
तुझ्या नसण्याने..

Tuesday, June 23, 2009

केळाची सुकी भाजी (वाळक्काय पोरियल)

चेन्नईत आल्यावर माझा केळाशी जवळचा संबंध आला. इथे केळ हे रोज जेवणानंतर नियमित खाल्ल्या जाते(आमच्या घरी तरी) .खाण्यासाठी सोनकेळाचा(छोट्या केळाचा) जास्त वापर केला जातो. केळाच्या फ़ुलाची आणि झाडाच्या खोडाची सुध्दा भाजी केली जाते.केळीच्या पानाबद्दल तर काही बोलायलाच नकॊ..
मी सध्द्या दाक्षिणात्य पाककलेच्या बालवाडीत आहे असं इथल्या मंडळींचं मत आहे. त्यानुसार मी शिकलेली ही सोप्पी भाजी. कमी तेलातली ,स्वादिष्ट आणि कमी वेळात तयार होणारी..
करुन बघा आणि सांगा कशी झालीए ते...

जिन्नस


  * १ कच्चे केळ
* १ चमचा धणेपूड
* १ चमचा जीरेपुड
* १ चमचा तिखट
* १ हिरवी मिरची
* कोथिंबीर..
* १/२ चमचा तेल
* चवीपुरता मीठ

मार्गदर्शन


  * केळाला सोलून घेऊन त्याचे पातळ चिप्स सारखे काप करावे.
* हे काप तिखट, मीठ, धणे पुड जीरे पूड घालून पाच ते दहा मिनीटाकरीता मुरू द्यावे.
* कढईत १ चमचा तेल गरम करावे
* त्यात १/२ चमचा मोहरी घालावी, कढीलिंबाची ४-५ पाने घालावी, हिरवी मिरची उभी चिरून टाकावी..
* नंतर हे केळीचे काप घालावेत.
* वरून थोडा कोथिंबीर पेरावा...

P1030837
* झाकण लावून ५ मिनीटे शिजू द्यावे...

P1030840

टीपा


  * ही सुकी भाजी सांबार भातासोबत छान लागते.
* नुसतीही खाता येते...

Monday, June 22, 2009

खारूताईचा उद्योग...

झुंजुमुंजु झालं की ही खारुताई बाजुच्या नारळाच्या झाडावर येते , तिच्या उद्योगाला टिपण्याचा हा प्रयत्न...

P1030854

----------------------------------------------------------------------------------------------------------------

P1030855

----------------------------------------------------------------------------------------------------------------

P1030856

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

P1030857

--------------------------------------------------------------------------------------------------------------

P1030858

Friday, June 19, 2009

अवियल

जिन्नस

 • १५० ग्रॅ. मद्रास सुरण

 • ६-७ फ़रसबी

 • १ बटाटा

 • १ गाजर

 • १ शेवग्याची शेंग

 • २ वाटया दही किंवा ताक

 • ३-४ हिरव्या मिरच्या

 • १/२ बोटाएवढं आलं

 • १ चमचा जीरं

 • ४ चमचे नारळाचा किस..

 • कढिपत्ता

 • १/२ चमचा नारळाचे किंवा गोडे तेल

 • हळद

मार्गदर्शन

 • सुरण धुऊन त्याचे उभे मध्यम बारीक काप करावेत.

 • फरसबी बारीक चिरून घ्यावी.

 • बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा नेहमी प्रमाणे चिराव्या.

 • गाजराचे उभे काप करावेत.. (अर्ध्या बोटाएवढे)

 • कढई ता नेमके पाणी घेऊन या सगळ्या भाज्या उकळायला ठेवाव्यात...

 • हिरव्या मिरच्या, जिरे, आलं, नारंळ . मीरे आणि चवीप्रमाणे मीठ यांची पेस्ट तयार करावी..

 • भाज्या उकळल्यावर, थोडे पाणी कढईत ठेवून बाकीचे(जास्त असल्यास) टाकून द्यावे..

 • तयार केलेली पेस्ट कढईत घालावी आणि २ मिनिटे हालवावे

 • दह्याचे ताक करावे आणि त्यात थोडीशी हळद घालावी.

 • हे ताक कढईत टाकावे..

 • वरून दोन ते तीन कढीपत्त्याची पाने घालावीत

 • २ चमचे साधे किंवा नारळाचे तेल घालावे.

 • २ मिनिटांनंतर आचे वरून काढावे..

टीपा

 • अवियल हा मलयाली पदार्थ आहे.

 • गरम भाताबरोबर किंवा फुलक्याबरोबर या पदार्थाची गट्टी छान जमते.

 • यात तोंडली, वांगी, दुधी भोपळा अश्या अनेक भाज्या टाकता येतात.

 • वर लिहितांना मद्रास सुरण असे लिहिले आहे कारण दोन प्रकारचे सुरण महाराष्ट्रात मिळते. साध्या सुरणाला चिरून चिंचेच्या पाण्यात घालून ठेवतात‌ घश्याला खाज येऊ नये म्हणुन...

 • आपण महाराष्ट्रातही कोहळ्याची, किंवा दुधीची दह्याची भाजी करतो.. पण वरून हिंग, मिरची, हळद अशी फोडणी घालतो..

 • तसाच हा पदार्थ आहे.. पण ह्यात असलेल्या हिरवी मिरची, आलं आणि जिऱ्याच्या स्वादाने ही भाजी चमचमीत लागते..

 • नारळाच्या तेलाने थोडासा केरळचा फील येतो..

Wednesday, June 17, 2009

जगी सर्व सुखी.....

नु़कतीच एका मराठ्मोळ्या संकेतस्थळावर कुणीतरी लिहिलेली पोळी बद्द्लची व्यथा वाचली,आणि मला "जगी सर्व सुखी असा कोण आहे" हे रामदास स्वामींचे म्हणणे पुन्हा एकदा पटले(नेहमीच मी या त्यांच्या श्लोकाला पडताळुन पाहत असते. कुणीही कुठेतरी "मी खुप सुखी आहे" असं म्हणावं आणि त्यांचं हे म्हणणं थोडंतरी खॊटं ठरावं असा त्यामागचा माझा उद्देश असतो...)

खरंतर पॊळी भाजी वरण भात या पदार्थांनी मला "टाटा" करुन चार महीने झाले..
कुठ्ल्याही नववधुला अगदी लगेचच स्वय़ंपाक करता येणे अशी सासरी फ़ारशी अपेक्षा नसतेच..पण जेव्हा घरात दोघेच असतात तेव्हा मात्र त्या जेवणापायी झोप उडाल्याशिवाय राहत नाही..मग भात करायचा असो...किंवा पोळ्या...

माझेही अगदी असेच झाले...पण पोळीच्या बाबतीत न होता भाताच्या बाबतीत..आहे की नाही गम्मत?
मला भात करता येत नाही असं मुळीच नाही.पण तमिळ कुटुंबात आल्यावर इतक्या सगळ्या वेगवेगळ्या खाण्याच्या पद्धती पाहुन मला जे यायचे ते ही येईनासे झाले...अगदी भातासारख्या भातानेही फितुरि केली अरेरे
प्रत्येक भाज्यांचे वेगवेगळे प्रकार, तीन ते चार प्रकारचा रसम, चार पाच प्रकारचा सांबार, खुप सार्‍या प्रकारचे भात या सगळ्यांनी मी तर हादरुनच गेले होते.वरुन " मला रोज डब्बाच दे, बाहेरचं खाल्लं ना की पोटात गडबड होते" अशी नवरोबाची निर्वाणीची विनंती..बापरे!!

पण आता मैदानात उतरल्यावर माघार घेण्य़ात काहि अर्थ नव्हता....

पहीले तर मला सगळ्या भाज्यांचे प्रकार लक्षात घेणे आवश्यक होते आणि त्यासाठी भाज्यांची नावे.इकडच्या लोकांना विंग्रजी कळतं पण तरीही जरा फ़ील डोळा मारा यावा याकरीता भाज्यांची नावंही शिकावी असं ठरवलं.माझ्या सगळ्य़ात आवडत्या बटाट्यापासुन सुरुवात केली.मराठीत "बटाटा", हिंदीत "आलू" आणि तमिळ मधे ऊर्लकळंगल.बापरे....पहिल्याच बॉलवर गुगली टाकल्यावर फ़लंदाजाची कशी अवस्था होत असेल हे मला लगेचंच कळलं.

एवढ्या गॊंडस भाजीचं असं असुराच्या नावासारखं नाव ऐकुन तर माझे यापुढ्चे सगळेच प्लान बारगळतील असे वाटले पण तरीही मी आपला मराठी बाणा न सोडता मैदानात पाय रोवुन उभे राहण्याचा निर्धार केला.
बटाट्याचं तमिळ नाव खरंच कित्ती सोप्पं आहे अश्या आविर्भावात मी भाजी करायला घेतली.

बटाटे उकडायला कुकरच्या भांड्यात ठेवले,भात वरण करायला तांदुळ आणि डाळ धुवुन घेतले..आणि कुकर लावला.. इतक्यात "तु तांदूळ भिजु नाही घातलेस?कमीत कमी १५-२० मिनीटे तांदूळ भिजत घालत जा म्हणजे चांगले शिजतील.आपण पार बॉईल्ड राईस खातो ना" . इति नवरो... आता हे काय नविन? असे मनातल्या मनात म्हणत मी प्रश्नार्थक चिन्ह घेउन त्याच्यापुढे उभी राहीले.

आजवर कधीच भात लावतांना तांदुळ भिजवले नव्हते आणि तसं केल्याने सकाळच्या घाईचे २० मिनीटे वाया जाणार हा विचार करुनच मला चीड येत होती.पण "आलिया भोगासी.."म्हणुन त्या दिवशी उर्लकळंगल स्मित ची भाजी,थाडा(नं शिजलेला) भात आणि फोडणीचं वरण असं सगळं घेऊन आमची स्वारी ऑफ़िसात धावत पळत पोचली एकदाची...

डब्यात भात हा प्रकार मला तसा जरा नविनच होता.मी आयुष्यात कधी डब्यात भात नेला नाही.पण आता अगदी पर्याय नव्हता.सुरुवातीला दोन तीनदा पोळ्या न्यायचा प्रयत्न करुन मी पोटावर अत्याचार केले.पण नंतर मात्र भातापुढे माझा नाईलाज जाहला...

लंच च्या वेळी मी बटाट्याचं नक्की काय केलं होतं ते कुणालाच कळेना.कुणी म्हणे पोरियल आहे का? कुणी अजुन काही.भात बघुन तर प्रत्येक कलिग जमेल त्या सुचना देऊ लागला.
मला आईच्या हातच्या चिन्नोरच्या पट्कन शिजणार्‍या मऊ मऊ भाताची खुप आठवण आली..डोळ्यात एक दोन थेंबांनी हजेरीही लावली..पण शत्रुवर विजय मिळाल्याखेरिज डोळ्यातुन पाण्याचा टिपुसही येऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा केली असल्यामुळे..पाण्याचे थेंब गालावर नं ओघळताच परत गेले...स्मित

लगेचच एका हिंदी येणार्‍या कलिगला विचारलं "ही पोरियल काय भानगड आहे?" त्याने सुकी भाजी म्हणुन सांगितलं आणि माझ्या भाजीचं रुपडं सुक्या भाजीसारखंच दिसत होतं हे ऐकुन मला थोडं बरं वाटलं.मग त्यानीच डाळ टाकुन केलेल्या भाजीला "कुटू", सुक्या भाजीला "पोरियल" , चिंच टाकुन केलेल्या भाजीला किंवा रस्सा भाजीला "कोळंब" असे म्हणतात अशी माहिती पुरवली.हुश्श!! असं होय...मी केव्हढी घाबरले होते...असं मला मनातल्या मनात वाटले...

मग मी लगेचंच "पोरियल" असं गुगलुन पाहिलं तर काय समस्त तमिळ पाककृतीची संकेतस्थळं हात जोडुन गुगलवर उभी होती....आहा!! अशी ठंडक पडली म्हणून सांगु या दिलात...
मग काय? धडाधड पाककृतीचं प्रिंट आऊट घेउन घरी गेले...

रात्री जनरली मी दोसाच खातो असं म्हणत नवरों..नी माझी विकेटच उडवली.इथे मात्र मी आपले पोळीचे हत्यार वापरले.लगेचच गरमा गरम पोळ्या केल्या आणि सकाळी केलेल्या घॊळाला नलीफ़ाय केले..
पहीलाच दिवस असा गेला हे पाहुन मला रात्री नीट झोपही लागली नाही (भर परिक्षेतही मी रात्री मस्तं झोपा काढल्या आहेत...पण हे प्रकरण जरा भारी होतं;) )

दुसरे दिवशी सकाळी उठुन तांदुळ भिजत घातले....प्रिंट आऊटकडे बघुन टमाटर भाताची तयारी करायला लागले...
२ वाट्या तांदूळ,
२ टमाटर चिरुन त्यांची प्युरी करा वगैरे...तोवर माझा भात लावुन झाला होता..प्युरी करुन झाली आणि बघ्ते तर काय...भात आणि टमाटरची प्युरी एकत्रच शिजवा असं लिहिलं होतं...
अरे देवा!! म्हणजे आजही पुन्हा तसलाच घोळ....अरेरे मग काय...डब्ब्यात काही नं घेताच ऑफ़िसला प्रस्थान करावे लागले...

आता मात्र २ विकेट जाऊन खुपशे रन करायचे अशी अवस्था झाली होती..नवरो..ही "येईल गं हळुहळु" वरुन "मीच करतो उद्याचा स्वयंपाक" वर आला होता.आता मात्र मला खरंच वाईट वाटायला लागले होते.
तिसर्‍या दिवशी नवरो..ने छान पैकी वांग्याची फ़्राय भाजी, भात आणि सांबार केले आणि त्यादिवशीच्या डब्याचा प्रश्न सोडवला. रात्री मात्र मी पोळ्यांची कास अजिबात सोडली नाही.

अश्याप्रकारे हाश्श हुश्श करत एक दोन आठवडॆ गेले.दोन तीन आठवड्यानंतर मी सांबार करायला शिकले..साध्या भाताच्या पलिकडे चुकुनही पाहीले नाही.हळुहळु संकेतस्थळांवरील काही पाककृतीच मी करु शकते हे ध्यानात आले..आणि त्या दृष्टीने मी प्रिंट आऊट्स घ्यायला लागले..

बटाट्यानंतर कुठ्ल्याही भाजीच्या नावाच्या भानगडीत पडायचं नाही ह्याची शपथ घेतली..आणि भाज्यांच्या वेगवेगळ्या नावाचा अर्थ समजुन घेउन त्याला मराठी पदार्थात बसवायचा प्रयत्न केला...जसं कुटू म्हणजे "डाळभाजी", पोरियल म्हणजे सुकी भाजी वगैरे. तेव्हा कुठे आता मी जरा सरावलेय...

कठीण समयी मदतीला धावून येणार्या पॊळीची जागा आता शिष्ठ दोस्याने घेतली आहे...नवरो..नी"आज प्लीज तुझ्या हातच्या पोळ्या कर ना" अशी विनंती केली की च पोळ्या करते..(आपल्या पोळीला विशेष स्थान असावं म्हणुन डोळा मारा )

आज डब्ब्यात मोर कोळंब (कढी सारखं काहीतरी) , वांग्याची भाजी आणि साधा भात आणला होता..
लंच टाईम नंतर नवरो..चा फोन आला..म्हणाला आजचा मेनु एकदम फ़क्कड...पैकी च्या पैकी मार्क..तेव्हा आठ्वला पहिल्या दिवशीचा थाडा भात.आता मात्र डोळ्यात साठ्वुन ठेवलेल्या दोन थेंबांना मी वाट मोकळी करुन दिली.

Saturday, June 13, 2009

माय मराठी!!

मराठी ही अतिशय हळवी भाषा आहे असं मला नेहमी वाटतं (शिव्या जरी लक्षात घेतल्या तरी). माझ्या आणि कितीतरी हळव्या मराठमोळ्या मनांच्या व्यथा तिने आजवर व्यक्त करण्यास हातभार लावला आहे.

पहीला शब्द मी बोललेला "आदा" (आई) हा होता असं आई म्हणायची...मला हिन्दीतल्या मा, ईंग्रजीतल्या मम्मी..तमिळमधल्या अम्मा..पेक्षा आई हा शब्दच अधिक श्रवणीय वाटतो.आई नंतर बाबा..मामा, आजोबा,आजी..मावशी, काका आणि नंतर व्यवहारीक शब्दं अशी माझी मराठीतील वाटचाल सुरु झाली.

भाषा म्हंटलं की समाजातील प्रत्येक थरातील व्यक्तीचा तिच्यावर प्रभाव पडत असतो.भंडार्यात एका वेगळ्याच प्रकारे मराठी बोलली जाते त्यात हिन्दी तील काही शब्दही वापरले जातात.मी जास्तं काही सांगायला नकोच याबद्दल.पु.लं नी आधिच लिहुन ठेवलेलं आहे.लहानपणी भंडारा, नागपूर ला असल्यामुळे विदर्भातील मराठी भाषाच कानावर पडली.बरेचशे शब्द अजुनही ऐकले की त्याच लहानपणीच्या दिवसांची आठ्वण होते.ही वर्हाडी भाषा बोलण्यात मात्र एक वेगळीच मजा आहे.मी नागपुरला गेले की हमखास "का गं?" च्या ऐवजी " काऊन गं?", " कुठे जातोयस?" च्या ऐवजी"कुठे जाऊन राहीला?" असंच बोलते.वर्हाडी शब्दांची एक स्वतंत्र डिक्शनरी असावी असं मला वाटतं.नाहीतर हे शब्द असेच लोप पावतील..

माझी आई विदर्भातली आणि बाबा मराठ्वाड्याचे असल्याने दोघांचीही बोलीभाषा वेगळी होती.खुप गोड आहे मराठ्वाडी मराठी.मराठ्वाड्यातील काही शब्द मला फ़ार आवडतात. उदा. माय, लेकरु,...आई एखाद्या वेळेला रागावली की बाबा लगेच म्हणत "जाऊ दे लेकरु आहे"..त्यांची माझ्यावरची माया लेकरु या शब्दात एकवटली आहे असे मला वाटे.अजुनही ते कुठे गेली होतीस? असं नं विचारता कुठे गेली होती माय? असं विचारतात. बाबांकडले कुठ्लेही नातेवाईक माय या संबोधनाशिवाय मुलीबाळींना कधीच बोलवत नसावेत.आणि ह्या भाषेचा सगळा गोडवा अश्या शब्दातच आहे...

खान्देशातील मराठीचा आणि माझा फ़ारसा संबंध आला नाही...पुण्याला आल्यावर मात्र थोडीशी सावरुन मराठी बोलायला शिकले..आईशप्पथ!! ;) नाहीतर आम्हा वर्हाडी मानसाले मले तुले ची सवय;)

लहानपणापासुन माझ्या मित्रमैत्रिण मंडळात मराठी भाषिकांचा फ़ार कमी वावर होता.माझ्या बहीणिच्या मित्रमंडळात सगळे जोशी, देशपांडॆ, कुलकर्णी, पाटील असे लोक आणि माझ्या सगळ्या मैत्रिणि म्हणजे खान, पुरी, फ़्रांसिस वगैरे नावाच्या त्यामुळे मराठी भाषिक मित्रमंडळाला मी मुकले असं मला वाटायचं...

कहर म्हणजे पुण्यात शिकायला असतांनाही माझा एकही मित्र किंवा मैत्रिण मराठी नव्हते...तिथे असतांना अस्सल मराठी जेवणाच्या ऐवजी माझ्या दक्षिण भारतातील मित्रांच्या कृपेने मी भरपुर रसम भात चोपला आहे...:) माझी ही हळहळ जाणुनच कदाचित देवाने मला कामानिमित्त मुंबईला(ठाण्याला) पाठ्वले जिथे माझ्या मित्रमैत्रिण मंडळात मराठमोळ्या लोकांची भर व्हायला लागली...आणि मी एकदाचा निश्वास सोडला... दीड वर्षांच्या माझ्या ठाण्यातील वास्तव्यात मला खुप मराठी पुस्तके वाचता आली...मराठी नाटके, गाण्यांच्या महफ़िली अनुभवायची संधी मिळाली...

मुंबईत वावरतांना आणि तिथली टपोरी भाषा वापरतांना मराठीच्या मोठेपणाची दाद द्यावी शी वाटली..इतक्या वर्षापासुन, हजारो बोलीभाषांचा प्रभाव पडुन सुध्दा आपली माय मराठी तितकीच हळवी...तितकीच उदात्त वाटते...ह्यालाच भाषेचं सामर्थ्य म्हंटले असावे नाही का?

आणि म्हणुनच आपण मराठीला माय मराठी म्हणत असु...

Thursday, June 11, 2009

दहीवाली...

रस्त्यावरुन जाता जाता दिव्यांची रांग बघताना माझ्या मनात लहानपणापासुन मनात साठवुन ठेवलेले सगळे लोकं नकळत येतात...आणि थोड्या वेळाने अगदी नाहिसे होतात...मग पुन्हा कधितरि असेच आठ्वतात, म्हणुन आज त्यांच्याबद्दल लिहावं वाटतंय...काही लोकं उगाच आठ्वणीत राहतात...त्यापैकीच हे काही...
सगळ्यात पहीली आठ्वण ही आमच्या घरी येणार्या दहीवालीची तिला माझा विशेष लोभ होता.मी लहान असतांना आजीकडे रहायचे...पार सहावीपर्यंत.घरात मामा, मावशी, आजी आजोबा आणि मी असे पाच जणं असायचो. वाड्यात आजोबांचे दोन भाऊ आणि त्यांची मुले असे मिळुन आम्ही १५ जणं रहायचो...माझी आई या सगळ्या भावंडात मोठी असल्याने तिचं सगळ्यांच्या आधी लग्नं झालं...आणि मी झाले.घरी सगळ्या मामा मावश्य़ांपेक्षा लहान असल्याने माझे खुप लाड होत.घरात प्रत्येक येणार्या जाणार्याला माझं खुप कौतुक वाटायचं..दिसायलाही गुट्गुटीत होते(आजही आहे) त्यामुळे लोकांना माझा लोभ येणं साहजिकच होतं. अंगणात बरेच लोकं यायचे...दहीवाली, बोरंवाली, केळंवाली वगैरे..
तर..ही दहीवाली जरा म्हातारी होती.तिचं गाव होतं टवेपार..(भंडारा शहराजवळच आहे हे गाव) .ती तिथुन पायी यायची,डोक्यावर टोपलं घेऊन.१ रु ला पावशेर दही द्यायची...तिच्या टोपल्यात खुप सारं तणीस असायचं..आणि दोन मडके...काळ्या रंगाचे...एकात गोड दही आणि एकात आंबट..दही द्यायला ती शेर(माप) वापरायची...मडक्यातुन दही काढायला वापरायची तुटलेली पळी.
आमच्या घराला छपरी होती..ती अंगणात, छ्परीवरच्या कौलांच्या सावलीच्या बाहेर बसायची..आणि मी सावलीच्या आत."रानादेवी आणा तुमची वाटी" असं तिने म्हंटलं की माझी ठरलेली वाटी मी तिच्या समोर करत असे.त्यात साखर टाकुन खाण्यात काही औरच मजा होती ....मग मध्ये मध्ये ती माझ्यासाठी तिच्या शेतातली बोरं, करवंदं, तुरीच्या शॆंगा असा आव्वा पण आणायची....
दही मोजत असतांना मी कितीतरीदा तिला न्याहाळले आहे...
तिच्या हातात कुठ्ल्यातरी धातुचे कडे असायचे ,अगदी टिपीकल....पायात वहाणा...त्या वहाणांना दोन पटटे आणि एक अंगठा..त्यातुन दिसणारी थकलेली पाऊले...तिची उठा बसायची एक विशिष्ट लकब होती...डोक्यावर टोपले ठेवायला ती कापडाची गुंडाळी वापरत असे..अशीच गुडाळी मी कितीतरीदा करुन डोक्यावर ठेवुन पाहिली आहे... टोपलं उतरवतांना आणि चढवतांना तिला कुणाचा तरी आधार लागायचा....माझी उंची कमी असल्याने मी कधिच तिला मदत करु शकत नव्ह्ते...
तिचं ते हिरवं, जाड काठांचं लुगडं, मोठ्या चंदेरी काठाचं पोलकं...डोक्यावरचा पदर सावरण्याची पद्धत...हातातले कडे.. डोक्यावरचं टोपलं...तिच्या नकळत माझ्याशी बरेच काही बोलुन जात असे....
काल परवाच मामा म्हणाला की "दहीवाल्या आजीबाई वारल्या" तेव्हा आठ्वली...""बाई, दही वं" ही तिची दणदणीत हाक...

Wednesday, June 10, 2009

मोठा पाऊस!!!

पाऊस झाला काल चेन्नईत..ऒफ़िस मधुन निघाले आणि मस्त शिरवा आला... पण काय माहीत जरा उदासच वाटत होती स्वारी...पावसाचे थेंब पडत होते गाडीच्या काचेवर पण ते खुप उदास वाटत होते...एरवी हसता खेळता येणारा पाऊस असा उदास पाहुन माझ्या लहानपणीच्या निखळ निरागस पावसाची आठवण आली...अगदी मनापासुन..
आज पाऊस पडत होता पण वेळेचं, वाहतुकीचं, लोकांचं भान असलेली मी अगदी रुक्षपणे त्याच्याकडॆ बघत होते... कदाचित हेच कारण असावं त्याच्या उदास असण्याचं..
लहानपणी अगदी आमच्यातलाच एक वाटणारा पाऊसही आता मोठा झाल्यासारखा वाटला...माझ्यासारखाच..!!
त्यालाही आज भान असल्या सारंखं वाटत होतं लोकांचं, वेळेचं..म्हणून लगेचंच थांबला...लोकांची गैरसोय होतेय हे बहुदा लक्षात आले असावे त्याच्या;)
लहानपणी किती मज्जा असायची नाही पावसाची...कागदाच्या होड्या आणि चिखलात खेळ....घरी आईने केलेले कांदे भजे...आणि टि.व्ही वरील..एखादा आवडता कार्यक्रम...
आता मात्र ए.सी ऒफ़ीस च्या चार भिंती बाहेरचे पावसाचे अस्तित्व...ऒफ़िसातुन सुटल्यावरच जाणवते...याचं एकमेव कारण म्हणजे काचबंद खिडक्या ...
पावसाचं आणि खिडकीचं ही काही नातं असावं कारण जेव्हा जेव्हा हा पाउस बरसतो तेव्हा तेव्हा खिडकी अजुनच आकर्षक वाटायला लागते..आणि खिडकीतुन बघताना...बरसणारा पाउस अजुनच मोहक वाटायला लागतो...
तसंच काहीतरी नातं पाणीपुरी, भजे, तपरीवरचा गरम चहा या मंडळींचं पावसाशी असावं...पाऊस सुरु असतांना यातील एखाद्या तरी गोष्टीचा आस्वाद घ्यावाच नाहीतर अगदी सुने सुने वाटायला लागते...
लहानपणीचा पावसाची भिजलेल्या मातीशी, कागदाच्या होडयांशी..चिखलाशी..आईच्या रागवण्याशी,फ़ारच गटटी होती..
आजकालचा मोठा पाऊस म्हणजे उनाड झालाय...
मातीचे रस्ते...अंगणे..हे सगळे नाहीशेच होत असल्याने मातीच्या सुवासाशी त्याचं काहीच नातं राहीलं नाहीए...
लहान मुलेही आताशा कागदाच्या होड्या वगैरे बनवत नाहीत..त्यामुळे..कागदाच्या होडीची खुप आठ्वण जरी येत असल तरी होडी मात्र त्याच्या भेटीला सहसा येत नाही....
चहाच्या टपरीशी, पाणीपुरीशी आणि भज्यांशी मात्र त्याची मैत्री टिकुन आहे....कधी कधी तो ही आठ्वत असेल...माझ्या सारखेच त्याचे बालपण....!!!!

Monday, June 8, 2009

मराठी पाऊल पडते पुढे?

काल सा रे ग म प चा एपिसोड बघितला... सगळ्याची गाणी छान झाली...मला अमृताचं "गुणी बाळ असा" गाणं आवडलं..ते तिने गायले म्हणुन नव्हे तर मुळ गाणंच छान आहे..
मधुराचं "ही वाट दूर जाते"... छानं च गायली...पण आताशा हे सा रे ग म प ही बोअर व्हायला लागलं आहे...
गाणी म्हणण्याचा कार्यक्रम मग त्यात जुजबी माहीती न देता परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेली मंडळी उगाचच्या गोष्टीवर का बोलतात हे मल न उलगडलेले कोडे आहे.. मलाही प्रत्येक गाण्याच्या मागे असलेल्या गमतीजमती माहीती करुन घ्यायला आवडते पण मग त्यासाठी एखादा वेगळा कार्यक्रम असावा (इतिहास..गाण्याचा) वगैरे नावचा डोळा मारा
खरंतर आता सगळेच प्रोग्राम्स, सगळ्याच मालिका अगदी रटाळ वाटतात विशेषतः झी मराठीवरच्या..अगदी बोटावर मोजण्याइतकेच प्रोग्राम्स..मालिका तर सगळ्याच प्रेडिक्टेबल..सकाळच्या घाईत कुणाला वेळ आहे "गुड मॉर्निंग महाराष्ट्र" बघायला...कुठलीही छान गाणी जर लावलीत तर गृहीणी...कामावर जाणारी लोकं सगळेच काम करता करता गाणी ऐकु शकतात..जेव्हापासुन हे चैनल सुरु झाले आहे तेव्हापासुन गुड मॊर्निंग महाराष्ट्र सुरु आहे पण त्यात काहीही बदल नाही...आणि हे तरी ठीक...ई टि व्ही वाल्यांनी तर कहरच केला..सकाळ्च्या वेळेला कुणी घर सजावटीच्या वस्तु कश्या तयार कराव्यात हे बघेल का? हे सगळे पाहुन माझ्या नवरेबुवांना हसु आवरणे कठीण जाते..
सुर ताल आता जख्ख म्हातारे झाले आहे त्याऐवजी कुठ्ल्या दुसर्या कार्यक्रमचे आयोजन का केले जात नाही? हे तर कळतच नाही..यांच्याकडे प्रतिभावंत लोकांची कमी आहे की नक्की काय प्रॉब्लेम आहे हे माहीती नाही...मुळात प्रेक्षकाची काय गरज आहे हे कुणालाही कळत नाही..
अरे जर स्टार प्लस चैनल वर रटाळ मालिका चालु आहेत तर मराठी चॅनल वाल्यांनो तुम्हीतरी तुमचा स्तर टिकवा...आणि प्रेक्षकांना काही तरी नवीन द्या..जुन्या दर्जेदार मालिका आठवल्या तर असं वाटतं की काळाच्या ओघात मराठी माणुस आपली प्रतिभा गमावुन बसलाय की काय?
अगदी मोजता येतील इतकेच चित्रपट...त्यातील सुमार गाणी..सगळे संगीत दिग्दर्शक कुठे गेलेत काय माहीती?...(सारेगमप मधे परिक्षक म्हणुन डोळा मारा)
महाराष्ट्रातील संगीत म्हणजे काहीच कुटुंबांची मक्तेदारी नव्हे हे लोकांना कधी कळणार कोण जाणे ..माझ्यामते सगळ्याच जुन्या नव्या गायकांनी या कलेला योग्य तोच न्याय दिला आहे...आणि जसा सकाळी उगवलेला सुर्य संध्याकाळी मावळतोच..तसेच कलाकाराचे आहे..
प्रत्यक्ष कलाकाराला त्याच्या कारकिर्दीबद्दल एवढे अप्रुप नसावे...आपणच सारे त्याचं भांडवल करतो असं मला वाटतं...जितके गाण्याचे कार्यक्रम आहेत तितके कवी सम्मेलनं, संगीत दिग्दर्शनाची प्रतियोगिता का असत नाही...प्रतिभेला चालना,मोठं व्यासपीठ कोण मिळवुन देणार? ही आजची गरज आहे...नाहीतर आपण आयुष्यभर "मराठी पाऊल पडते पुढे" आळवत बसु...आणि बाकीच्या प्रांतातील लोकं मात्र कित्येक पावलांनी मराठी माणसापेक्षा पुढे असतील..